Nashik News : पाणीटंचाईवर मार्ग काढण्यासाठी पालकमंत्री दादा भुसे यांनी बोलावलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीकडे जिल्ह्यातील आमदारांसह अधिकाऱ्यांनी मंगळवारी (ता. ६) पाठ फिरविली. त्यामुळे पालकमंत्र्यांना चर्चेविनाच अवघ्या पाच मिनिटांत ही बैठक गुंडाळावी लागली.
आधीच ही बैठक स्थगित करण्यात आली होती. (District MLA turn their backs to shortage review meeting nashik news)
फेब्रुवारीतच जिल्ह्यातील टँकरच्या संख्येने शतक पार केले आहे. उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाई जाणवणार असल्याने त्याची तीव्रता दिवसागणिक वाढत चालली आहे. धरणांमधील उपयुक्त साठा हळूहळू तळाला जात असून, टँकरची मागणीही वाढत आहे.
टंचाईच्या या समस्येचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री भुसे यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील सर्व आमदार आणि संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती; परंतु आमदार सीमा हिरे व ॲड. माणिकराव कोकाटे यांच्याव्यतिरिक्त एकही आमदार या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत.
बहुतांश अधिकाऱ्यांनीही या बैठकीकडे पाठ फिरविल्याने हॉलमध्ये तुरळक गर्दी होती. यामुळे पालकमंत्र्यांची पुरती निराशा झाली. कुणी लग्न समारंभ, तर कुणी परदेश दौऱ्यावर असल्याने बैठकीला उपस्थित नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे उपस्थित जलसंपदा, महावितरणच्या काही अधिकाऱ्यांना पाच मिनिटांत सूचना करून भुसे यांनी ही बैठक आटोपती घेतली.
दरम्यान, महावितरणविरोधात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदारांनी तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींच्या निरसनासाठी पालकमंत्र्यांनी महावितरणच्या प्रश्नांबाबतही बैठक बोलावली होती; परंतु तक्रार करणारे आमदारच बैठकीला अनुपस्थित असल्याने ही बैठकही होऊ शकली नाही.
वीजपुरवठा खंडित करू नका
रब्बी हंगाम अंतिम टप्प्यात आला असून, तग धरलेली थोडीफार पिके तरी शेतकऱ्यांच्या हाती लागली पाहिजेत. पिकांना पाणी देण्यासाठी वीजपुरवठ्याची आवश्यकता असते. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत वीजपुरवठा खंडित होणार नाही, याची खबरदारी घ्या, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
शेतकऱ्यांकडून सक्तीने वीजबिलांची वसुली करू नका, अशा सूचना करतानाच संबंधित यंत्रणांनी पाणीपुरवठा करताना एकमेकांशी समन्वय साधावा, असे आवाहनही त्यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.