नाशिक : भूगर्भातील पाणीसाठा वाढविण्यासाठी भूगर्भाचा अभ्यास, संशोधन करणे महत्त्वाचे आहे. महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण जास्त आहे, योग्यस्थळे निश्चित करून भूगर्भात या पाण्याची साठवण झाल्यास गावागावांतील पाणीप्रश्न सुटून उन्हाळ्यातील टँकरची संख्या कमी होऊन जिल्हा पाणीदार होण्यास मदत होईल.
लोकसहभागातून मिशन भगीरथ प्रयास अभियान यशस्वी करावे, असे आवाहन जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांनी केले. (District Panidar with Mission Bhagirath Prayas Water expert Rajendra Singh nashik news)
गंगापूर रोड येथील रावसाहेब थोरात सभागृहात महात्मा गांधी रोजगार हमी योजना, जिल्हा परिषद आयोजित ‘मिशन भगीरथ प्रयास’ उपक्रमातंर्गत गुरुवारी (ता. २३) झालेल्या कार्यशाळेत या कामांचा जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह, पालकमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला.
खासदार हेमंत गोडसे, आमदार ॲड. माणिकराव कोकाटे, डॉ. राहुल आहेर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) नितीन मुंडावरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांच्यासह जिल्ह्यातील सरपंच उपस्थित होते.
आशिमा मित्तल यांनी प्रास्ताविक केले. उपक्रमाची माहिती देणारे सादरीकरण डॉ. अर्जुन गुंडे यांनी केले. जिल्हा परिषदेमार्फत सुरू करण्यात आलेला मिशन भगीरथ उपक्रम स्तुत्य असून, शाश्वत प्रयत्नातून भूगर्भातील पाणीसाठा वाढविण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात याव्यात, असे राजेंद्र सिंह यांनी सांगितले.
हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!
सिंचनाचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत
पालकमंत्री दादा भुसे म्हणाले, की मिशन भगीरथ प्रयास उपक्रमातून पिण्याच्या पाण्यासोबतच, शेती व सिंचनाचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार आहे. तसेच, मनरेगाच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती होणार असून, दुष्काळ काळात होणारे गावकऱ्यांचे स्थलांतर थांबणार आहे.
लोकांनी स्वत:च्या गावाच्या विकासासाठी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतल्यास गावाचा चेहरामोहरा बदलू शकतो. गावातील ज्येष्ठ मंडळींच्या मार्गदर्शनातून पिण्याच्या पाण्याच्या विहिरींची जागा निश्चित करण्यात यावी, असेही त्यांनी या वेळी सांगितले.
जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांनी समर्पित भावनेतून कोणताही शासनाचा निधी न घेता केलेल्या कार्यातून राजस्थानमधील गावांचे चित्र बदलले आहे. जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांचे मार्गदर्शन व प्रेरणा जर नाशिक जिल्ह्यास लाभली, तर निश्चितच मिशन भगीरथ प्रयास उपक्रम यशस्वी होण्यास मदत होणार असल्याचे श्री. भुसे यांनी सांगितले.
७०५ कामांचे नियोजन
जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ‘मिशन भगीरथ प्रयास’ अंतर्गत साधारण २०० गावांतून ७०५ कामांचे नियोजन करण्यात आले असून, या कामांसाठी शासनाकडून निधीची उपलब्धता करण्यात येणार आहे. यातील १८ कामांचा प्रत्यक्षात प्रारंभ झाला आहे.
उल्लेखनीय काम, दहा लाख बक्षीस
जिल्हा परिषदेचा मिशन भगीरथ प्रयास उपक्रमातून जिल्ह्यातील दुष्काळी गावे भविष्यात निश्चितच पाणीदार होतील, असा विश्वास व्यक्त करीत लोकसहभागातून हा उपक्रम यशस्वी करावा.
त्याचप्रमाणे या उपक्रमात उल्लेखनीय काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना शासनाच्या निधीसोबतच जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून दहा लाख रुपयांचा अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची घोषणा पालकमंत्री दादा भुसे यांनी केली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.