सिन्नर : सगळीकडे दिवाळी आणि लक्ष्मीपूजनाची धामधुम असताना त्यांचे कुटुंबीय मात्र नेहमीप्रमाणे वाट बघत होते. आपला घरधनी किमान लक्ष्मीपूजनासाठी तरी सवड काढेल ही अपेक्षा फटाक्यांच्या धुरात अस्ताला गेली.
चोवीस तास ऑन ड्युटी असणाऱ्या जवळपास सर्वच पोलीस कुटुंबीयांच्या घरात ही परिस्थिती लक्ष्मीपूजनाच्या दिवशी होती.
कर्तव्याला प्राधान्य देत लोकांचा सण निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी स्वतःच्या घरातील माणसांना देखील वेळ देऊ न शकणाऱ्या पोलीस दादांसाठी या निमित्ताने एक सॅल्यूट नक्कीच करावाच लागेल. (Diwali of police family without policeman Due to On Duty absent usual for Lakshmi Puja 2023 nashik)
सर्वच ठिकाणी ड्युटीचे तास ठरलेले असताना संरक्षण आणि पोलीस दलात कार्यरत असणाऱ्याना मात्र 24 तास सज्ज राहावे लागते. सणासुदीचा काळ हा अत्यंत जोखमीचा असल्याने या काळात सर्वच ठिकाणी पोलिसांवर विशेष जबाबदारी असते.
कर्तव्याशी प्रामाणिक राहण्यासाठी या जबाबदारीचे ओझे बाळगताना स्वतःच्या कुटुंबात मात्र सणावाराला उपस्थित राहता येत नाही.
सर्वसामान्यांचे सण उत्सव आनंदात साजरे करण्यासाठी स्वतःच्या कुटुंबापासून दूर राहणाऱ्या पोलिसांप्रती आणि प्राण तळहातावर घेऊन देशरक्षणासाठी सीमेवर तैनात असणाऱ्या जवानांसाठी या दिवाळीत प्रत्येकाने आभार व्यक्त केले पाहिजेत.
मात्र सण उत्सवाचा आनंद लुटत असताना समाजाकडून याकडे दुर्लक्ष केले जाते. आणि ही खंत आहे पोलीस कुटुंबातील सदस्यांची.
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर काही पोलीस कुटुंबांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केल्यावर आपला घरधनी लक्ष्मीपूजनाला स्वतःच्या घरी थांबण्याऐवजी कर्तव्याला प्राधान्य देत इतरांचे सण उत्सव निर्विघ्न पार पडावेत म्हणून नेमून दिलेल्या कार्यक्षेत्रात रात्री उशिरापर्यंत गस्त घालत असल्याची प्रतिक्रिया एका पोलीस पत्नीने दिली.
ही प्रतिक्रिया देताना आमचे नाव प्रसिद्ध करू नका अशी विनंती त्यांनी केली होती. इथून मागची देखील प्रत्येक दिवाळी अशीच वाट पाहण्यात गेली. अपवादानेच एखाद्या दिवाळीला घरधनी लक्ष्मीपूजनाला उपस्थित राहिल्याचे तिने सांगितले.
तर दिवाळी सणाला बाबा वेळेवर कधीच घरी येत नसल्याचे मुलांचे म्हणणे होते. मनापासून सवय झालीय. बाबांप्रमाणेच त्यांचे इतरही सहकारी दिवाळीच्या दिवशी बंदोबस्त असतात.
त्यामुळे मनाची समजूत घालत त्यांच्या गैरहजेरीत आम्ही सण साजरा केला. मात्र बंदोबस्त आटोपून बाबांच्या घरी येण्याकडे लक्ष होते, असे या मुलांनी सांगितले.
"पोलिसांना सध्या बारा तास ड्युटी करावी लागते. इतर ठिकाणच्या तुलनेत ही ड्युटीची वेळ अधिकच आहे. त्यात एखादा आपत्कालीन प्रसंग घडला तर नाही म्हणता येत नाही. ड्युटी संपली म्हणून जबाबदारी झटकता येत नाही. एखादा सहकारी सुट्टीवर गेला असल्यास स्वतःची ड्युटी पार पाडून त्याच्या जागी काम करावे लागते. रात्रभर जागरण झाले तरी दिवसा पुरेशी विश्रांती घेता येत नाही. साप्ताहिक सुट्टी देखिल केवळ नावाला असते. पोलिसांचे ड्यूटीचे तास कमी करून त्यांचा मानसिक फिटनेस जपणे आवश्यक आहे."- एका पोलिस पत्नीची प्रतिक्रिया
"सणासुदीला इतरांप्रमाणेच आपणही कुटुंबासोबत वेळ घालवावा असे आम्हाला पण वाटते. पण कर्तव्यसमोर इतर बाबींना कमी महत्त्व दिले जाते. दिवाळीचा सण आनंदात साजरा व्हावा यासाठी रात्री उशिरापर्यंत गस्त घालने अनिवार्य असते. अशा वेळी कुटुंबापासून दूर रहावे लागते. कुटुंबात अगोदर चिडचिड, भांडणे व्हायची. आता कुटुंबांतील सर्व सदस्यांना परिस्थीती समजते. त्यांना पण सवय झाली आहे अशी प्रतिक्रिया आहे एका पोलिस अंमलदाराने दिली."
- एका पोलिसाची प्रतिक्रिया
ड्युटीची वेळ निश्चित नसल्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये ताणतणाव वाढत आहेत. त्यात सणासुदीच्या दिवसात कुटुंबापासून दूर राहावे लागते. बायको समजुन घेईल पण मुलांचे काय ?
बाबा सणाला घरी असावेत हे प्रत्येक मुलाला वाटते मग पोलिसांची मुले त्यांच्यापेक्षा वेगळे नाहीत. ड्युटीची वेळ अनिश्चित असल्यामुळे साहजिकच तणाव दूर करण्यासाठी अनेक पोलीस व्यसनाचा आधार घेतात.
रक्षणकर्ता व्यसनाधीन बनणार असेल तर ही बाब गांभीर्याने घेणे आवश्यक आहे. मागच्या काळात राज्याच्या गृहमंत्र्यांनी पोलीस ठाण्याचे संख्याबळ वाढवण्याची घोषणा केली होती.
पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील लोकसंख्या विचारात घेऊन हे मनुष्यबळ वाढवण्यासाठी तातडीने उपाययोजना केली पाहिजे. अन्यथा कामाचा अतिरिक्त तणाव पोलिसांच्या मानसिकतेत नकारात्मक बदल घडवेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.