नाशिक : शेतकऱ्यांच्या हितासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार (central government) सातत्याने विविध प्रयत्न, उपाययोजना करीत आहे. राज्यात टोमॅटोचे (tomatoes price) भाव घसरत असताना, महाविकास आघाडीच्या (mahavikas aghadi) सरकारने उपाययोजना करणे अपेक्षित होते. मात्र, तसे झाले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना (farmers) आर्थिक फटका बसू नये, म्हणून बाजार प्रोत्साहन योजना (मार्केट इन्सेंटिव्ह स्कीम) अंतर्गत केंद्र सरकार ५० टक्के खर्च सोसायला तयार आहे. आता राज्य सरकारने विलंब न करता केंद्र सरकारला योजनेसाठी प्रस्ताव सादर करावा, असे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी शुक्रवारी (ता. २७) येथे सांगितले. ‘सकाळ-संवाद’ कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
टोमॅटो निर्यातीला मात्र कुठलीही बंदी नव्हती - केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार
डॉ. पवार म्हणाल्या, की टोमॅटोच्या घसरलेल्या भावाप्रश्नी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांच्याशी संवाद झाला. त्या वेळी त्यांनी निर्यातीला कुठलीही बंदी नसून शेतकरी निर्यात करू शकतात. मुळातच, नाशिक जिल्हा कृषिप्रधान असल्याने या भागाचे प्रतिनिधित्व करीत असताना, कांद्यापासून शेतमालाच्या विविध प्रश्नांचा पाठपुरावा केला आहे. केंद्र सरकारकडून त्यास प्रतिसाद मिळाला आहे. नाशिकच्या ‘सकाळ’च्या सातपूर कार्यालयाला डॉ. पवार यांनी सदिच्छा भेट दिली. ‘सकाळ’च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक डॉ. राहुल रनाळकर यांनी डॉ. पवार यांचे स्वागत केले. भाजपचे ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी, शहराध्यक्ष गिरीश पालवे, संघटनमंत्री पवन भगूरकर, जगनअण्णा पाटील आदी उपस्थित होते.
केंद्राचे २३ हजार कोटींचे पॅकेज
देशापुढे कोरोना महामारीच्या रूपाने गंभीर परिस्थिती असताना विभागावर मोठी जबाबदारी आलेली आहे. अशात पंतप्रधानांचे कामकाजावर बारकाईने लक्ष असते. त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मिळत असल्याचे समाधान डॉ. पवार यांनी व्यक्त केले. त्या म्हणाल्या, की कोरोना महामारीच्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी केंद्र सरकार सक्षम असून, सर्व आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर २३ हजार कोटी रुपयांचे विशेष पॅकेज जाहीर केले आहे. त्याअंतर्गत देशभरातील प्रत्येक जिल्ह्यात लहान मुलांवर उपचार करण्यासाठी पिडॅट्रीक युनिट उभारणी आणि सुसज्ज आयसयूसह अन्य पायाभूत सुविधांचे सक्षमीकरण करण्यासोबत कंत्राटी स्वरूपातून आवश्यक मनुष्यबळाची पूर्तता केली जात आहे. केंद्राच्या विशेष पॅकेजतंर्गत महाराष्ट्राला पहिला हप्ता दिला आहे.
जनतेकडून जनआशीर्वादला उत्स्फूर्त प्रतिसाद
ग्रामीण, आदिवासी भागातून, जनसामान्यातून प्रतिनिधित्व करताना मंत्रिपदापर्यंत पोचलेल्या आम्हा सर्वांची ओळख सभागृहाला पंतप्रधान करून देणार होते. मात्र, विरोधकांच्या गदारोळामुळे त्यांना परिचय करून देता आला नाही. ज्या जनतेतून आपण आलोत, त्यांचाच आशीर्वाद घेत पुढील काम करण्याची संकल्पना पंतप्रधानांनी मांडली. त्यानुसार दिल्लीतून परतल्यानंतर घरी न जाता जनआशीर्वाद यात्रेतून जनतेशी संवाद साधला. हा अनुभव आनंदाची अनुभूती करून देणारा होता. जनतेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, असेही त्यांनी सांगितले.
सुरगाणा पॅटर्नसाठी ‘सकाळ’चे योगदान
डॉ. पवार म्हणाल्या, की कोरोना काळात आयुर्वेद शाखेच्या माध्यमातून सुरगाणासारख्या आदिवासीबहुल भागात केलेले काम वाखाणण्याजोगे आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ही उपचारपद्धती उपयुक्त ठरेल. यासंदर्भात आयुष मंत्रालयाशी समन्वय साधला आहे. ‘सकाळ’ने दुसऱ्या लाटेवेळी सुरगाणा पॅटर्नसाठी दिलेले योगदान मोलाचे आहे.
डॉ. भारती पवार म्हणाल्यात..
-कोरोनासोबत चिकूनगुनिया, डेंगीचा जिल्ह्यात वाढता धोका
-जिल्हा प्रशासनासोबत बैठक घेत आवश्यक उपाययोजनाच्या दिल्या सूचना
-जिल्हा रुग्णालय, संदर्भसेवा रुग्णालय बळकटीकरणावर आगामी काळात भर
-कोरोना प्रतिबंधक लशीबाबत होतेय जनजागृती, सुरवातीला विरोध दर्शविलेल्या पंजाबमधूनही आता मोठी मागणी
-आयुषमान भारत योजनेंतर्गत वेलनेस सेंटर ग्रामीण भागांची आरोग्यव्यवस्था करतील सक्षम
-देशातील दहा कोटी कुटुंबातील ५० कोटी नागरिकांना आयुषमान भारतचे कवच
-योगाचे वाढते महत्त्व भविष्यातही आरोग्य क्षेत्रात बजावेल महत्त्वाची भूमिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.