निमित्त : महाराष्ट्र चेंबरचा सुवर्ण महोत्सव...

Maharashtra chamber of commerce
Maharashtra chamber of commerceesakal
Updated on

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अॅन्ड अॅग्रीकल्चरच्या नाशिक शाखेने सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण केलं आहे. व्यवसाय, उद्योग आणि शेती या तिन्ही क्षेत्रामध्ये महाराष्ट्र चेंबरनं केलेलं कार्य अतिशय उल्लेखनीय आहे. कोणत्याही शहराचा, परिसराचा सर्वांगीण विकास व्हायचा असेल, तर तो चहूबाजूनं व्हायला हवा. विशेषतः जोवर विकासाला अर्थशास्त्राचं परिमाण लाभत नाही, तोवर विकासाच्या केवळ गप्पा होत राहतात. महाराष्ट्र चेंबरशी जोडल्या गेलेल्या व्यापारी, उद्योजक आणि शेतीमधील तज्ज्ञांनी केवळ गप्पा न करता विकासामध्ये प्रत्यक्ष योगदान देण्याचे काम अत्यंत प्रामाणिकपणे आणि सातत्यानं केलं आहे. पन्नासाव्या वर्षात पदार्पण करत असताना भूतकाळातील काही सुवर्णमयी क्षणांचा मागोवा घेत आता पुढची दिशा ठरवण्याचा महाराष्ट्र चेंबरनं केलेला प्रयत्न अत्यंत स्तुत्य म्हणावा लागेल.

Maharashtra chamber of commerce
दीपक पांडे, कैलास जाधव आणि राजकीय विश्व...

विकासाला जोवर राजकारण विरहीत पाठबळ मिळत नाही, तोवर खऱ्या अर्थानं शहरांचा विकास होणे शक्य नसते. नाशिक आणि संपूर्ण उत्तर महाराष्ट्राच्या संदर्भात सांगायचं झाल्यास विकासाच्या अनेक शक्यता इथे सुप्तावस्थेत आहेत. या शक्यतांना आता बळ मिळू पाहतंय. मुंबई-पुणे-नाशिक हा सुवर्णत्रिकोण आजवर केवळ गप्पांचा आणि व्याख्यानांचा विषय ठरत होता, पण तो आता खऱ्या अर्थानं साकारणार आहे. नाशिकची भौगोलिक स्थिती देशाच्या नकाशावर अत्यंत मोक्याच्या ठिकाणी आहे. मुंबई-पुणे आता तुंबलंय, तिथे विकासाच्या शक्यता कमीकमी होत आहेत. त्यावेळी नाशिक आणि उत्तर महाराष्ट्र घेत असलेली भरारी उल्लेखनीय आहे. त्यामुळे महाराष्ट्र चेंबरची भूमिका अत्यंत मूल्यवान ठरणार आहे. एकमेकांना सहाय्य करत आणि विकासाची शिदोरी सोबत घेऊन निघालेली ही मंडळी पुढच्या काळात निश्चित अशा ध्येयापर्यंत पोहोचणार आहेत. नाशिक हे उत्तर महाराष्ट्राचं ''ग्रोथ इंजिन'' बनत असताना जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नगर या शहरांना-जिल्ह्यांना देखील त्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष लाभ मिळणार आहे. उद्योगाची कास धरुन आजवर शिल्लक असलेला अनुशेष भरुन काढण्याची वेळ आता आली आहे. रस्ते, हायवे, रेल्वे, विमानसेवेच्या दृष्टीनं देशाच्या नकाशावर पोहोचलं आहे. नजिकच्या काही वर्षांत नाशिकमधून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरु झाल्यास आश्चर्य वाटायला नको. व्यवसाय, उद्योग आणि शेतीसाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात क्षमता संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात आहेत. अनेक प्रकारचे क्लस्टर्स या संपूर्ण विभागात उभे राहू शकतात, किंबहुना चेंबरच्या सदस्यांनी आणि मार्गदर्शकांनी ही गोष्ट हेरली आहे.

Maharashtra chamber of commerce
आदिवासींचे ज्ञान आणि सज्ञानी सरकार....

नोकरीच्या मागे न लागता उद्योजकता वाढीस लागायला हवी, या दृष्टीने स्टार्टअप्ससाठी इन्क्युबेशन सेंटर सुरु करण्याचे चेंबरने ठरविलं आहे. महिला उद्योजकांसाठी स्वतंत्र क्लस्टर उभारण्याचा अध्यक्ष ललित गांधी यांचा मनोदय महिला वर्गासाठी नवी आशा निर्माण करणारा आहे. शिवाय प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी विकासाचा दृष्टिकोन घेऊन स्वतंत्र फोरम निर्माण करण्याचा निश्चय ही देखील संपूर्ण राज्यासाठी जमेची बाजू ठरेल. या माध्यमातून कायमस्वरुपी स्किलींग सेंटर आणि कायमस्वरुपी एक्सलंसी सेंटर उभारण्याची चेंबरची तयारी आहे. सातत्यानं प्रयत्नशील राहणे ही महाराष्ट्र चेंबरची खासियत आहे. उत्तर महाराष्ट्र चॅप्टरच्या माध्यमातून पुढील वर्षभरात अनेक नाविन्यपूर्ण कार्यक्रम उद्योजकता वाढीसाठी करण्यात येणार आहेत. हे कार्यक्रम कल्पक आहेत, शिवाय ज्येष्ठ मार्गदर्शकांची साथ हे या कार्यक्रमांची जमेची बाजू असेल. राज्यामधील चेंबरच्या कार्यात नाशिक आणि उत्तर महाराष्ट्राचे स्थान अतिशय भक्कम स्वरुपाचे आहे, ही देखील महत्त्वाची आणि उल्लेखनीय बाजू आहे. या सगळ्या क्षमतांचा विकास साधण्यासाठी कसा उपयोग करुन घेता येईल, ही बाब आव्हानात्मक असेल.

जिल्ह्यांमधली असो वा राज्यांमधली स्पर्धा ही निकोप विकासाच्या संदर्भात असायला हवी. ''इज ऑफ डुईंग बिझनेस'' अंतर्गत आपल्या जिल्ह्यात आणि राज्यात खरोखर वेगाने परवानग्या दिल्या जातात का, हा प्रश्न उपस्थित केला, तर त्याचं उत्तर नकारात्मक आहे. उद्योगधंदे वाढीसाठी प्रशासनामध्ये अजून सकारात्मकता आलेली नाही. त्यासाठी भरपूर प्रयत्न करावे लागणार आहेत. चेंबरने या कामीही लक्ष देण्याची आवश्यकता आहे. ही स्थिती बदलण्यासाठी काय करावं लागेल, याचा स्वतंत्र रोडमॅप असायला हवा, त्यासाठी स्वतंत्र टीम तयार करायला हवी, जी सतत प्रशासकीय अधिकाऱ्यांचं काऊंसिलिंग करत राहील. जे अधिकारी सकारात्मक आहेत, त्यांचाही यथोचित गौरव करायला हवा, जेणेकरुन चांगल्या कामासाठी स्पर्धा प्रशासनात निर्माण होईल.

Maharashtra chamber of commerce
''यांचं असं का होतं ते कळत नाही....''

महाराष्ट्रासह देशाच्या औद्योगिक विकासाची पायाभरणी करणाऱ्या वालचंद हिराचंद यांच्यासारख्या दिग्गजांचा वारसा महाराष्ट्र चेंबरला लाभला आहे, आणि तो समर्थपणे पुढे नेण्याचे काम सध्याच्या पदाधिकाऱ्यांकडून, सदस्यांकडून होत आहे. नाशिकसोबत उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रासोबत राज्य नव्या जोमाने पुढच्या काळात व्यवसाय, उद्योग आणि शेतीच्या क्षेत्रात देश पातळीसह जागतिक पातळीवर चमकेल, अशी आशा या सुवर्णमहोत्सवाच्या निमित्तानं नक्कीच निर्माण झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.