नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघातील अतिशय प्रतिष्ठेच्या बनलेल्या निवडणुकीसाठी येत्या सोमवारी (ता.३०) मतदान होत आहे. सुरुवातीला राजकीय उलथापालथीचा रंग दिला गेलेल्या या निवडणुकीत अपक्ष सत्यजित तांबे यांनी कोणत्याही चर्चांना महत्त्व न देता आपला प्रचार सुरू ठेवत संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला.
महाविकास आघाडीच्या शुभांगी पाटील यांनीही उशीरा सुरवात करत मतदारांपर्यत पोचण्याचा प्रयत्न केला. आता खरी कसोटी ही उमेदवारांची नसून पदवीधर मतदारांची आहे.
एक अनुभवी आमदार विधानपरिषदेत पाठविण्यासाठी ते तांबेंना पसंती देतील की शुभांगी पाटील यांना, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. महाविकास आघाडीसाठीही ही निवडणूक म्हणजे एका नव्या लढ्याची आणि अस्तित्वाची लढाई असेल असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाल्यापासून विविध अंगांनी चर्चिली गेली. आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी कॉंग्रेसचा अर्ज न भरता मुलासाठी मागितलेला कॉंग्रेसचा एबी फॉर्म वेळेत न मिळाल्याने सत्यजित यांनी केलेली अपक्ष उमेदवारी आणि भाजपने अलिप्त राहत पडद्यामागून केलेल्या हालचाली आणि उमेदवारी न मिळाल्याने ऐनवेळी महाविकास आघाडीकडे गेलेल्या शुभांगी पाटील.
या साऱ्यात कधी नव्हे एवढे महत्त्व या निवडणुकीला आले. नाशिकची ही निवडणूक राज्यात सर्वाधिक चर्चेची बनली.
यापूर्वी ही निवडणूक अगदीच एकतर्फी म्हणावी अशी झाली आहे. अर्थात यात नगर जिल्ह्याचाच, पर्यायाने आमदार डॉ. सुधीर तांबे आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे वर्चस्वही कारणीभूत राहिले आहे. यंदा ही जागा भाजपला कशी मिळेल, यासाठी प्रयत्न सुरू होते. त्यापार्श्वभूमीवर सत्यजित तांबे यांची अचानक पुढे आलेल्या उमेदवारीने सारीच समीकरणे बदलून गेली.
उमेदवारीच्या पहिल्या दिवसापासून सत्यजित यांनी आपण ही निवडणूक का लढत आहेत याविषयी अगदी मोजक्या शब्दात पण ठामपणे मतदारांसमोर भूमिका मांडली आहे. काँग्रेसच्या युवक आघाडीचे राज्याचे प्रमुख म्हणून त्यांनी नाशिक विभागात जमविलेले संघटन हे स्वतःच्या पक्षातील असले तरी एक युवा नेता म्हणून त्यांनी स्वतःला सिद्ध केले आहे, ही त्यांची जमेची बाजू आहे.
सुमारे २२ वर्षे ते सामाजिक जीवनात कार्यरत आहेत. शिवाय वडिलांच्या आमदारकीच्या निवडणुकीची सारी सूत्रे यापूर्वी तेच हलवित असल्याने कुस्तीच्या मैदानाचे नियम, डावपेच आणि ऐनवेळी आघाडी कशी घ्यायची याचे सारे बाळकडू त्यांना आधीच मिळालेले आहे. मैदानात उतरणे आणि ते मारून तेथून बाहेर पडणे असे दोन्ही डाव युद्ध जिंकण्यासाठी अवगत असावे लागतात.
अन्यथा चक्रव्यूहात सापडलेल्या अभिमन्यूसारखी अवस्था होते. सत्यजित मात्र हे सारे डावपेच शिकून आधीच तयार झालेले होते. त्यामुळे त्यांना मैदानात उडी घेताना फारशी तयारी करावी लागली नाही, हे त्यांच्या प्रचार तंत्रावरून प्रकर्षाने दिसून येते. शिवाय पदवीधर मतदारांमध्ये एक व्यक्ति म्हणून असलेले त्यांचे वलय हेही त्यांना प्रचारात पुढे घेऊन गेले.
तंत्रे आत्मसात असल्याने अवाढव्य मतदारसंघात संपर्क करणे त्यांना सहजसाध्य झाले. पक्षाचे तिकिट न मिळाल्याने असो की वैयक्तिक संबंध यामुळेही कॉंग्रेसमधील अनेक जण त्यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहिले, हे देखील या निवडणुकीचे एक वैशिष्ट्य म्हणावे लागेल.
महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांना त्यामानाने तयारी करायला तसा वेळ कमीच मिळाला. त्यांनी आधापासून थोडीफार तयारी केली असली तरी ती निवडणुकीच्या मैदानात लढण्याऐवढी नक्कीच नव्हती.
त्यामुळे पहिल्या दिवसापासून त्यांना अऩेक आघाड्यांवर धावपळ करावी लागली. महाविकास आघाडीचा पाठिंबा मिळविण्यात आणि नंतर त्यांच्या पाठिंब्याने यंत्रणा तयार करण्यात त्यांचा बराच कालावधी खर्च झाला, तरीही त्यांनी सुरवातील एकतर्फी वाटणाऱ्या निवडणुकीत काहीअंशी रंग नक्कीच भरला आहे.
नाशिक विभागाची निवडणूक ही नगर आणि नाशिक या दोन जिल्ह्यांभोवतीच केंद्रीत राहते. याचे कारणही उघड आहे, या दोन जिल्ह्यातच सर्वाधिक मतदार आहेत. आणि त्यातही नगर जिल्ह्यात सर्वाधिक आहेत. त्यामुळे या दोन जिल्ह्यातील मतदारांपर्यंत पोचणे, हे उमेदवारांसाठी आव्हान होते, ते अर्थात सत्यजित तांबे यांना होमपिच असल्यामुळे सोपे झाले.
शुभांग पाटील यांनीही नाशिकवर अधिक लक्ष केंद्रीत केलेले दिसून आले. नगरमध्येही त्यांनी महाविकास आघाडीमार्फत प्रचार यंत्रणा राबविली.
त्यामुळे ही निवडणूक जशी सत्यतजित तांबे यांच्यासारख्या युवा नेत्यासाठी प्रतिष्ठेची बनली, तशीच निवडणुकीचा अनुभव नसलेल्या आणि महाविकास आघाडीच्या पाठिंब्यावर निवडणूक लढविणाऱ्या शुभांगी पाटील यांच्यासाठीही कसोटीची आहे.
खरं म्हणजे एका अर्थाने ही निवडणूक महाविकास आघाडीची देखील कसोटी ठरणार आहे. दुसरीकडे भाजपने उमेदवार दिलेला नसला तरी या मतदार संघावरील आतापर्यंतचा कॉंग्रेसचा शिक्का पुसला गेला आहे, हा त्यांच्या आगामी रणनीतीचा भाग असू शकतो.
त्यामुळे एकूणच पक्षीय पातळीवर न वाटणारी मात्र पडद्याआडून पक्षीय पातळीवर प्रचंड उत्सुकतेची अन अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेली ही निवडणूक म्हणूनच पदवीधरांची आणि महाविकास आघाडीची कसोटी ठरेल, असं म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही.
सत्यजित तांबे यांना यश मिळाल्यास अपक्ष उमेदवाराने महाविकास आघाडीला पराभूत केल्याचा मोठा संदेश या निमित्ताने राज्यभर जाईल, यात तीळमात्र शंका नाही.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.