Nashik Drought News : तालुक्याच्या कुठल्याही भागात जा, शेकडो एकरांतील शेतातील उभा मका वाळलेला, करपलेला आणि पाचोळा झालेला दिसतेय. किंबहुना, आता पाऊस आला तरी मक्याचे पीक हाती लागूच शकत नसल्याची परिस्थिती असल्याने सर्वाधिक क्षेत्र गुंतलेल्या पिवळ्या सोन्यातून शेतकऱ्यांना २५० ते ३०० कोटींचे नुकसान निश्चित आहे.
दुष्काळाची भयावह दाहकता निर्माण झाली असून, जनावरांसह पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याची स्थिती आहे. तालुक्यात खरिपाची ७५ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. यातील तब्बल ४१ हजार ३६८ हेक्टरवर मक्याचे पीक शेतकऱ्यांनी घेतले आहे. (Drought conditions in yeola nashik news)
मागील अर्ध्या वर्षापासून हक्काचे व पैसे देणारे पीक म्हणून मका तालुक्याला पर्याय मिळाल्याने क्षेत्रात विक्रमी वाढ झाली आहे. मात्र गेल्या तीन महिन्यांत एकही मुसळधार पाऊस झाला नसून उन्हाळ्यासारखे दिवस अनुभवायला मिळाल्याने सर्वाधिक नुकसान मक्याचे होत आहे.
थोडेफार पाणी असलेल्या शेतकऱ्यांनी ठिबक, तुषार सिंचनाद्वारे मक्याला पाणी दिल्याने पाच-सहा हजार हेक्टरवरची मका हिरवीगार आहे. मात्र तब्बल ३५ हजार हेक्टरवरची मका आता पाचोळा होऊन शेतात उभा आहे.
हे नुकसान उघड्या डोळ्यांनी पाहताना बळीराजाचे डोळे पानावत आहेत. त्यामुळे दर वर्षीच्या तुलनेत यंदा २० ते २५ टक्के मक्याचे उत्पादन निघणार आहे. हक्काचे पीकच हाती लागणार नसल्याने शेतकऱ्यांसमोर पुन्हा एकदा कर्जबाजारी होण्याचे संकट उभे ठाकले आहे.
नुकसानीचे तत्काळ करा पंचनामे
मानोरी बु. येथील प्रगतिशील शेतकरी साहेबराव शेळके यांनी दोन एकर शेतात सोयाबीनच्या उभ्या पिकात जनावरे सोडली असून, सत्यगाव येथील सतीश दराडे यांनीदेखील अपुऱ्या पावसामुळे मेटाकुटीला येऊन सोयाबीन पिकात जनावरे सोडली आहे. तर मका, सोयाबीन आदी पिके सुकून चालली असल्याने पिंपळगाव लेप येथील प्रगतिशील शेतकरी एकनाथ रेंढे यांनी आपल्या दीड एकर सोयाबीन पिकावर ट्रॅक्टरच्या सहाय्याने नांगर फिरविला आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
तालुक्यात असे शेकडो शेतकरी पिकात जनावरे सोडत आहेत अन् नागर चालवत आहेत. पाचोळा होण्यापेक्षा जनावरांच्या पोटात पिके जातील, अशी मनाची समजूत घालत शेतकरी हा पर्याय स्वीकारत आहेत. तालुक्यात अनेक ठिकाणी पिके पाण्याअभावी करपून गेली असल्याचे विदारक दृश्य सध्या दिसत आहे.
विहिरीही कोरड्याठाक पडत असल्याने पिकांना पाणी देणे शेतकऱ्यांना दुरापास्त झाले आहे. हजारो हेक्टरमध्ये पिकांचा सांगाडा उभा असल्याने आताच तत्काळ दुष्काळ जाहीर करून, पिकांचे पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.
मका, सोयाबीन संपल्यात जमा
शनिवारपासून जिल्ह्याच्या विविध भागात पाऊस हजेरी लावत आहेत. अर्थात तोही विशिष्ट भागातच पडताना दिसतोय. या पावसामुळे पिके जगतील, हा फक्त आशावाद उरला आहे. पंधरा दिवसांपूर्वी फुलोऱ्यात असताना मका व सोयाबीनला पावसाची गरज होती.
मात्र तेव्हा पाऊसच नाल्याने दोन्ही पिके फुलोरा, बीटी, शेंगा न लागताच करपली असून, शेतातच पाचोळा झाल्याने ७० टक्क्यांहून अधिक क्षेत्रातील सोयाबीन व मक्याला या पावसाचा किंचितही फायदा होणार नसल्याचे शेतकरी सांगतात. वेळ निघून गेल्याने या दोन्ही पिकांचे ७० ते ८० टक्के नुकसान ठरलेले आहे. त्यामुळे उत्पन्न देणारे मुख्य पिकेच हातची गेल्याने शेतकऱ्यांतून संतापही व्यक्त होत आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.