Nashik Agriculture News : जिल्ह्यातील दुष्काळाची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय समितीने बुधवारी (ता. १३) मालेगाव तालुक्यात पावसाअभावी करपलेले मक्याचे क्षेत्र, कापसाच्या वाळलेले कांडक्या, बाजरी व डाळिंब आदी पिकांच्या क्षेत्राची पाहणी केली.
समितीने शेतकऱ्यांशी चर्चा करीत मदत नक्कीच मिळणार, असे आश्वासित केले असले तरी शेतकऱ्यांनी मात्र समितीच्या उशिरा येण्यावर नाराजी व्यक्त केली. ()
खरिपातील झालेले नुकसान आता समितीला किती प्रमाणात दिसणार आहे, असा प्रश्न करीत लवकर यायला हवे होते. खरिपाबरोबरच अवकाळीने दिलेला फटका सर्वाधिक आहे, तो समितीने विचारात घ्यावा, असे शेतकऱ्यांनी समितीच्या सदस्यांना सांगितले.
राज्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. दुष्काळ निवारणासाठी राष्ट्रीय आपत्ती निधीतून राज्य सरकारने दोन हजार २६१ कोटींची मदत केंद्र सरकारकडे मागितली आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्याची दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय समिती दाखल झाली.
समितीत केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाचे सहसचिव प्रियरंजन, पुसा येथील महालनोबिस राष्ट्रीय पीक हवामान केंद्राचे उपसंचालक डॉ. सुनील दुबे, केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाचे सल्लागार चिराग भाटिया यांचा समावेश आहे.
जिल्हा कृषी अधीक्षक विवेक सोनवणे व कृषी विभागाचे अधिकारी सहभागी आहेत. जिल्ह्यात दुष्काळग्रस्त तालुके म्हणून मालेगाव, येवला व सिन्नर यांची घोषणा झाली. बुधवारी समितीने सौंदाणे, मुंगसे, लोणवाडी, चिखळओहळ, शिंदेगव्हाण, गिरणा धरण येथील पिकांची व पाण्याची सद्यस्थिती जाणून घेतली.
येवला, सिन्नरमध्ये आज पाहणी
केंद्रीय समितीने बुधवारी मालेगाव तालुक्यात पाहणी केली. गुरुवारी (ता. १४) ही समिती येवला व सिन्नर तालुक्यांतील गावांना भेट देऊन पिकांची पाहणी करेल. प्रातिनिधीक स्वरूपात या तालुक्यांतील गावांची पाहणी करून ही समिती शुक्रवारी (ता. १५) पुण्यातून केंद्र सरकारला अहवाल पाठविणार आहे.
सौंदाणे येथे शेतकऱ्यांशी चर्चा
प्रशांत पवार
येथील ग्रामपंचायत कार्यालयात केंद्रीय समितीने दुष्काळ व शेतीसंदर्भात असलेल्या शेतकऱ्यांच्या विविध समस्या जाणून घेतल्या. शेतकऱ्यांनी आपली व्यथा समितीसमोर मांडण्याचा प्रयत्न केला.
शेतकरी चेतन पवार, माधव पवार, श्रीराम पवार, शांतिलाल बच्छाव, लक्ष्मण पवार, माधव पवार यांनी शेती, पाणी, चारा, फळबाग, पीकविम्यासह विविध समस्यांचा पाढा वाचला. त्यावर आपण केंद्र सरकारचे प्रतिनिधी म्हणून आलो आहोत.
केंद्राचा निधी, पैसा हा शेतकऱ्यांसाठी आहे, त्यामुळे नुकसानीचे नेमके चित्र आम्ही मांडणार असून, शेतकऱ्यांनी विश्वास ठेवावा. पाणी, चाऱ्याची स्थितीही समितीने जाणून घेतली. मात्र, समितीच्या या उत्तराने शेतकऱ्यांचे समाधान झाले नाही.
‘‘शेतीला सर्वाधिक फटका खरिपात बसला, आता रब्बी हंगामात आहे त्या स्थितीत शेतकरी पिकांवर भरवसा ठेवत आहे. शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान हे खरीप हंगामात झाले आहे. त्यात मका, बाजरी, डाळिंब, कांदा यांचे नुकसान झाले. केंद्राचे पथक हे रब्बी हंगामात प्रकट झाले. खरीप हंगामात झालेल्या नुकसानीची प्रखरता त्यांना रब्बी हंगामात काय कळणार?’’ अशा भावना अनेक शेतकऱ्यांनी बोलून दाखविल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.