Nashik News: स्थिती गंभीर हैं, हम कल रिपोर्ट दे देंगे! केंद्रीय पथकाकडून सिन्नर, येवला तालुक्यात दुष्काळी पाहणी

Officials of the central team inspecting the drought situation.
Officials of the central team inspecting the drought situation. esakal
Updated on

Nashik News: ‘साहब, एक साल से टँकर चालू है, बारीश नहीं इसिलिए बावडी में पानी नहीं... और मकाभी आया नहीं’ अशी माहिती देत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी केंद्रीय दुष्काळ पथकाकडे आपले गाऱ्हाणे मांडले. शेतात करपलेल्या मक्याकडे पाहत,‘ये क्यो निकाला नही..!’ असा प्रश्नही त्यांनी केला. ‘स्थिती गंभीर हैं, हम कलही रिपोर्ट दे देंगे’ अशी माहिती केंद्रीय पथकाने दिली.

राजापूर, पन्हाळसाठे येथे गुरुवारी (ता. १४) केंद्राच्या पथकाने पाहणी केली. कृषी विभागाचे उपसंचालक डॉ. सुनील दुबे, उद्यानविद्या विभागाचे सल्लागार चिराग भाटिया हे त्यात सहभागी झाले. या भागात दुष्काळी परिस्थिती गंभीर असून, प्यायला पाणी नाही. (Drought inspection in Sinnar Yeola taluka by central team nashik news)

त्यामुळे दुपारपासूनच पथक येण्याच्या प्रतीक्षेत शेतकरी थांबून होते, मात्र सायंकाळी उशिरा पथकाचे आगमन झाले. पन्हाळसाठे येथे समितीचे पथक पाचला पोहोचले. तेथे दहा मिनिटे थांबल्यावर पुढे राजापूरला जाऊन पाहणी केली. दहा गावांची केंद्रीय पथक पाहणी करणार होते, मात्र दोन गावांना भेटी देऊन पथक माघारी परतले.

पन्हाळसाठे येथील सर्जेराव भोसले यांच्या शेतातील मक्याची पाहणी केंद्रीय पथकाने केली. राजापूर येथील दत्तू भालके यांच्या शेतातील साडेसात एकर मका वाळला आहे. भालके यांना वाळलेली मका पाहून ‘ये क्यो निकाला नही’ असा प्रश्न अधिकाऱ्यांनी केला. या भागात विहिरी कोरड्या असून, वर्षभरापासून टँकरने पाणीपुरवठा सुरू असल्याची माहिती उपस्थित शेतकऱ्यांनी दिली. पिकांची परिस्थिती पाहून अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना वेगवेगळे प्रश्न करतानाच परिस्थिती गंभीर असल्याचेही सांगितले.

सर्व पिकांची वाताहत झालेली असताना अजूनही पीकविम्याचे लाभ मिळाला नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी या अधिकाऱ्यांकडे केली. परिसरात चारा छावणी द्या, आमच्याकडील चारा फेब्रुवारीपर्यंत पुरेल, त्यामुळे चारा व्यवस्था करावी, रोजगार उपलब्ध करून घ्या अशा मागण्या करण्यात आल्या.

Officials of the central team inspecting the drought situation.
Nashik Rabi Season Crisis: दुष्काळाचा रब्बीला फटका, गव्हाची पेरणी घटली! जिल्ह्यात रब्बीच्या केवळ 44 टक्के पेरण्या

रस्त्याच्या कडेला सर्वत्र पाण्याच्या रिकाम्या टाक्या पाहून टंचाईची दाहकता त्यांच्या लक्षात आली. ही परिस्थिती निदर्शनास आणून देत सध्या टँकर सुरू असून, टँकरची संख्या अजून वाढवावी, अशी मागणी माजी सरपंच सुभाष वाघ, भाजप नेते दत्ता सानप यांनी केली. पथकाने या वेळी १०० टक्के दुष्काळाची परिस्थिती आहे, सरकारला आम्ही अहवाल देऊ, अशी माहिती दिली.

हेच पथक चार महिन्यांपूर्वी आले असते तर पिकांची दाहकता व झालेले नुकसान लक्षात आले असते, असे शेतकऱ्यांनी सांगितले. योगेश भालके, माजी सरपंच सुभाष वाघ, लक्ष्मण घुगे, शरद वाघ, भीमा वाघ, भारत वाघ, विजय धात्रक, सुदाम वाघ, देवीदास गुडघे, शिवाजी आव्हाड, जगन्नाथ आव्हाड, भिलाजी आव्हाड, धनराज वाघ, अनिल अलगट, विजय आव्हाड, श्रावण देवरे, गोकुळ वाघ, निवृत्ती वाघ, सोपान वाघ आदींसह शेतकरी या वेळी उपस्थित होते.

"राज्यातील दुष्काळी स्थितीची पाहणी करण्यासाठी आम्हाला आमचा दौरा आहे. जिल्ह्यातील पावसाचे आकडे आणि खरिपातील पिकांची स्थिती गंभीर दिसली आहे. शेतकऱ्यांनी विविध समस्याही मांडल्या असून, याबाबत दुष्काळी स्थितीची पाहणी करून शुक्रवारी (ता. १५) आमचा अहवाल आम्ही पुण्याच्या कृषी आयुक्तांकडे देणार आहोत." - डॉ. सुनील दुबे, सदस्य, केंद्रीय पाहणी पथक

Officials of the central team inspecting the drought situation.
Nashik News: साहेब, दुष्काळाने होरपळलो, कांदा निर्यातबंदीने उद्ध्वस्त झालो; पाहणी दौऱ्यावेळी शेतकऱ्यांच्या व्यथा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.