नाशिक : नववर्षाच्या स्वागताच्या पूर्वसंध्येपासून नववर्षाच्या पहिल्या दिवसाच्या पहाटेपर्यंत मद्यविक्रीला परवानगी दिल्याने रात्रभर तळीरामांच्या झिंगाट पार्ट्या रंगणार आहेत. मात्र, यामुळे मद्यपान करून वाहने चालवून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी पोलिसांकडून ‘ड्रंक ॲन्ड ड्राईव्ह’अंतर्गत गुन्हा दाखल करून कारवाई केली जाणार आहे.
परंतु, त्यासाठी ब्रेथ अनालायझरचा वापर मात्र करावा की नाही, याबाबत राज्य शासनाकडून कोणतेही आदेश मिळालेले नाहीत. त्यामुळे राज्यभरातील पोलिस संभ्रमावस्थेत आहेत. कोरोनामुळे गेल्या तीन वर्षांपासून ब्रेथ अनालायझरच्या वापरावर बंदी आहे. अलीकडे पुन्हा कोरोनाच्या नव्या व्हेरियंटने डोके वर काढल्याने या मशिनाचा वापर करावा की नाही, याबाबत पोलिस साशंक आहेत. (Drunk & Drive action will taken without using breathalyzer Nashik News)
नववर्षाच्या स्वागतासाठी ३१ डिसेंबरच्या सायंकाळपासून हॉटेल्स, रिसॉर्टमध्ये साम्रसंगीत पार्ट्या रंगतात. या पार्ट्यांशिवायही मद्यपान करणारे ना-ना ठिकाणी पार्ट्या करतातच. त्यानंतर मद्यपान करून वाहने चालवितात. यातून प्राणांकित अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यामुळे राज्यभरातील पोलिस या दरम्यान ठिकठिकाणी नाकाबंदी करतात आणि वाहनचालकांनी मद्यपान केले आहे की नाही, याची तपासणी ब्रेथ अनालायझरच्या या मशिनद्वारे करतात. यात मद्यपान केल्याचे आढळून आल्यास संबंधित वाहनचालकाविरोधात ड्रंक ॲन्ड ड्राईव्ह अन्वये गुन्हा दाखल करून कारवाई केली जाते.
दरम्यान, कोरोनाकाळात ड्रंक ॲन्ड ड्राईव्हची कारवाई करताना ब्रेथ अनालायझरचा वापर न करण्याचे आदेश शासनाने दिले होते. तेव्हापासून गेल्या तीन वर्षांमध्ये ब्रेथ अनालायझर या मशिनचा वापर करण्यात आलेला नाही. तसेच, यंदा दोन वर्षांच्या कालखंडानंतर मोठ्या उत्साहात आणि निर्बंधमुक्त वातावरणात नववर्षाचे स्वागत केले जात आहे.
त्यामुळे पोलिसांनी या मशिनची दुरुस्ती करून वापराच्या आदेशाच्या प्रतीक्षेत होते. मात्र काही तासांवर ३१ डिसेंबर आला असून, शासनाकडून याबाबत कोणतेही आदेश नसल्याने राज्यभरातील पोलिसांमध्ये संभ्रमावस्था आहे.
कोरोनाचा धोका कायम
काही दिवसांपासून जगभरात कोरोनाचा नवीन व्हेरियंट आला आहे. त्यामुळे पुन्हा जगावर कोरोनाचे संकट घोंगावते आहे. या पार्श्वभूमीवर ड्रंक ॲन्ड ड्राईव्हच्या केसेस करताना ब्रेथ अनालायझरचा वापर करण्याचा धोका संभवतो.
त्यामुळे पोलिस यंत्रणाही सदरचे ब्रेथ अनालायझर मशिन न वापरण्याचीच शक्यता आहे. परंतु तरीही शासनाचा याबाबत कोणताही आदेश वा सूचना नसल्याने पोलिसांमध्ये मशिन वापराबाबत साशंकता निर्माण झाली आहे.
"ब्रेथ अनालायझर मशिन सज्ज ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. परंतु, संभाव्य कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ते वापरायचे की नाही, याबाबत शासनस्तरावरून सूचना नाहीत. तरीही ड्रंक ॲन्ड ड्राईव्हच्या केसेस पोलिस करतील. मद्यपान करून वाहने चालविणाऱ्यांची वैद्यकीय चाचणी करून कारवाई केली जाईल." -अंकुश शिंदे, पोलिस आयुक्त, नाशिक
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.