नाशिक/सिडको : उंटवाडी गावाजवळ मद्यधुंद चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने त्याने चारचाकी व दुचाकी वाहनांना धडक देत विचित्र अपघात घडला. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र, त्याचवेळी कारच्या डिक्कीतून काही नोटा खाली पडल्या.
त्यामुळे उपस्थितांचे डोळे विस्फारले. दरम्यान, या नोटांची तपासणी केली असता, त्या लहान मुलांना खेळण्यासाठीच्या नोटा असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे दोन कोटीं रुपयांचे घबाड सापडल्याच्या अफवायुक्त मेसेजला पूर्णविराम मिळाला. (Drunk driver collided with 3 vehicles near Untwadi crime registered nashik news)
या प्रकरणी अंबड पोलिसांत संशयित कारचालकाविरोधात ड्रंक अँड ड्राइव्हसह मोटारवाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना बुधवारी (ता.२८) मध्यरात्री घडली.
चंद्रकांत अंबादास दाहीजे (रा. तिडके कॉलनी) असे संशयित कारचालकाचे नाव असून, तो संदर्भ सेवा रुग्णालयात चालक आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उंटवाडी गावानजीक बुधवारी (ता. २८) रात्री अकराच्या सुमारास एका चारचाकी वाहनाने चारचाकी व दुचाकी वाहनांना जोरदार धडक दिली.
या अपघातात दुचाकीस्वाराला दुखापत झाली. दरम्यान, धडक देणाऱ्या कारमध्ये कोट्यवधी रुपयांची रोकड असल्याचा तथाकथित मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली. दरम्यान, तपासानंतर बनावट नोटा किंवा घबाड नसल्याचे स्पष्ट झाले.
हेही वाचा : क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....
चंद्रकांत दाहीजे (रा. तिडके कॉलनी) हा स्विफ्ट डिझायर (एमएच ०१ एई९८१०) भरधाव चालवत असताना मद्याच्या नशेत असल्याने त्याचे कारवरील नियंत्रण सुटले आणि त्याने कार (एमएच१५ जीए ७८०६) व दुचाकीला (एमएच १५ एफडब्ल्यू ७७०३) जोरदार धडक दिली. यात दुचाकीस्वार अमोल बुरकुले जखमी झाले. अपघातानंतर स्विफ्ट डिझायर कारमध्ये नोटांचे बंडल असल्याचे घटनास्थळी असलेल्या काही नागरिकांना दिसले.
त्यातील काहींनी अंबड पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच, सहाय्यक निरीक्षक गणेश शिंदे, उपनिरीक्षक प्रकाश कातकडे, अंमलदार योगेश शिरसाठ, अनिल गाढवे, धनराज बागुल, किरण सोनवणे, संजय सपकाळे, केशव ढगे, कुणाल राठोड, कमलेश आवारे आदींचे घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी अपघातग्रस्त स्विफ्ट कार टोइंग करून अंबड पोलिस ठाण्यात जमा केली.
पोलिसांनी गाडीतील पैशाची बॅग उघडून बघितली असता त्यामध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी असलेल्या नोटा आढळून आल्या. त्यावर ‘चिल्ड्रन बँक ऑफ इंडिया’ असा उल्लेख व ‘स्कूल प्रोजेक्ट न्यूज ओन्ली’ असे स्पष्ट लिहिले असल्याचे आढळून आले. बॅगेत चलनातील नोटा नसल्याचे उघड झाल्याने पोलिसांनी यासंदर्भात अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, एवढ्या मोठ्या प्रमाणात खेळण्यातील नोटा कुठून आणल्या, कशासाठी व कोठे नेल्या जात होत्या, याचा तपास पोलिस करीत आहेत. वरिष्ठ निरीक्षक भगीरथ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक गणेश शिंदे तपास करीत आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.