येवला (जि. नाशिक) : एकरी उत्पादनातील घट, कांदा बियाण्यातील फसवणूक, गारपीट व पूर्वमोसमी पाऊस अशा विविध कारणाने यंदा कांदा चांगला संकटात सापडला आहे. त्यातच सध्या लॉकडाउनमुळे (Lockdown) मागणी नसल्याने बाजारभावही स्थिर असल्याने अनेक शेतकऱ्यांकडून कांदा चाळीत कांदा साठवणूक केली जात आहे. विशेष म्हणजे अनेक बागायतदारांनी स्वतःच्या शेतातील उत्पादनात घट आल्याने सध्याच्या बाजारभावात कांदा विकत घेऊन साठवणुकीला प्राधान्य दिले आहे. (Due to decline in onion production of farmers onions are being bought and stored In Nashik)
कांदा विक्रीसाठी बाजार समित्यांमध्ये गर्दी
गेल्या वर्षीप्रमाणे जुलै-ऑगस्टनंतर कांदा तेजीत येईल या आशावादावर ही साठवणूक सुरू असल्याचे शेतकरी सांगतात. गेले दोन वर्षे कांद्याच्या दरात सातत्याने तेजी राहिल्याने या वर्षी शेतकऱ्यांनी कांद्याकडे आपला मोर्चा वळवला. यामुळेच जिल्ह्यात खरिपात २० हजार ५८४ हेक्टर, तर रब्बी व उन्हाळी हंगामात तब्बल एक लाख ४१ हजार हेक्टर असा एकूण दोन लाख ४२ हजार हेक्टरवर कांदा लागवड झाली. गेल्या चार-पाच वर्षांत कांद्याने अनेक शेतकऱ्यांचे आर्थिक सक्षमीकरण केल्याने कांद्याकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा ओढा वाढला असल्याने हे क्षेत्र वाढल्याचे दिसते. सद्यःस्थितीत आगाऊ व लेट कांदा काढून कापणीही झाली आहे. चाळीत कांदा साठवणुकीचे काम पन्नास टक्क्यांपर्यंत पूर्ण झाले असून, गेल्या आठवड्यापासून गारपीट व पूर्वमोसमी पावसाच्या हजेरीमुळे शेतकऱ्यांनी साठवणुकीचे काम वेगाने हाती घेतलेले दिसते. किंबहुना निफाड, येवला, कळवण, मालेगाव, सटाणा भागांतील अनेक बागायतदार शेतकऱ्यांनी तर विविध कारणामुळे स्वतःच्या शेतातील कांदा उत्पादनात घट झाल्याने इतर ठिकाणाहून कांदा खरेदी करून चाळीत साठवत असल्याची स्थिती आहे. आता १००० ते १५०० रुपयांपर्यंत दर असून, हाच दर जूननंतर चार ते पाच हजारांपर्यंत जाण्याची शक्यता गृहीत धरून हा कांदा साठविला जात आहे. तर दुय्यम प्रतीचा व चाळीत टिकू शकणार नाही, असा कांदा विक्रीसाठी मात्र बाजार समित्यांमध्ये गर्दी होताना दिसतेय.
निम्म्याने घटले उत्पादन
सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीत अवकाळी पावसाने थैमान घातल्यामुळे कांदा बियाण्यांची अभूतपूर्व टंचाई निर्माण होऊनही तालुक्यात सुमारे १२ हजार हेक्टर क्षेत्रावर विक्रमी उन्हाळ कांदा लागवड झाली आहे. महागड्या बियाण्यांमुळे कांदा उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. भरमसाट खर्च करूनही कांदा बियाणे भेसळयुक्त निघाल्याने उत्पन्नात निम्म्याने घट आली आहे. बहुतांश कांद्याला डोंगळे तसेच दुभाळके निघाल्याने शेतकरी संकटात सापडला असून, तो पुरता हतबल झाला आहे. अवकाळी पावसामुळे कांदारोपे खराब होत असल्याने व घरगुती बियाणे संपल्याने शेतकऱ्यांनी पुन्हा महागडी बियाणे आणून कांदा रोप तयार करून कांदा लावला. मात्र, सततच्या बदलत्या हवामानामुळे कांदा पिकाची जास्त काळजी घ्यावी लागली. खते, औषधे तसेच मजुरीत मोठी वाढ झाल्याने उत्पादन खर्चात वाढ झाली. जानेवारी, फेब्रुवारी, मार्चमध्ये झालेल्या अवकाळीने उत्पन्नात मोठी घट आल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. आताही कांद्यास योग्य दर मिळत नसून बाजार समित्याही बंद राहत असल्याने व रोजच ढगाळ हवमान राहत असल्याने शेतकरी चिंतेत आहे.
या वर्षी ज्या शेतकऱ्यांची उन्हाळ कांद्याची लागवड १ ते १५ डिसेंबरदरम्यान झाली आणि शेतीची गुणवत्ताही चांगली होती. अशांना एकरी १८० ते २०० क्विंटलपर्यंत ॲव्हरेज मिळाले. मात्र, जानेवारीत झालेल्या कांदा लागवडीत १०० ते १२० क्विंटल कमी उत्पादन निघाले. सध्या कांदा चाळीत साठवण्याचे काम सुरू आहे. या कांद्याला जूनच्या शेवटच्या टप्प्यात क्विंटलला ‘नाफेड’ने कांदा खरेदी केला. तर तीन हजारांपर्यंतचा दर मिळेल, असे वाटते.
- किरण लभडे, शेतकरी, निमगाव मढ
अशी झाली कांदा लागवड (हेक्टरमध्ये)
तालुका- रब्बी/उन्हाळ कांदा लागवड
मालेगाव- १३२४३
सटाणा- ४६९०३
नांदगाव- २८२२
कळवण- २११२९
देवळा- १७५५१
दिंडोरी- १०६६
निफाड- ८८८५
सिन्नर- ७९००
येवला- ११९५१
चांदवड- ९२९०
नाशिक- १८०
इगतपुरी- २३२
पेठ- १६३
सुरगाणा- १४५
एकूण- १४१४७६
उन्हाळ कांद्याचे सध्याचे बाजारभाव
दिनांक - कमाल भाव - सरासरी
३ मे - १५०० - १२५०
४ मे - १३७५ - ११५०
५ मे - १४५५ - ११५०
७ मे - १५३१ - १२२५
(Due to decline in onion production of farmers onions are being bought and stored In Nashik)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.