देवळा : 'प्रवाशांच्या सेवेसाठी' हे ब्रीदवाक्य असले तरी सध्याच्या अनेक बसेस प्रवाशांना सेवा देण्यास कमी पडत असल्याचे चित्र आहे. रविवारी (ता.१९) रोजी सटाणा आगारातून निघालेली सटाणा-पुणे बस ही देवळाजवळ नादुरुस्त झाली.
यामुळे सर्वच प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. सातत्याने बंद होणाऱ्या बसेसमुळे प्रवाशांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. (Due to MSRTC faulty bus plight of passengers Passengers suffering as old buses running on road Nashik News)
मागील एक वर्षाच्या दरम्यान एसटीने काही नवीन प्रवासी योजना आणत बस व्यवस्था सुरळीत करण्याचा प्रयत्न केला.
प्रवाशांनीही खास करून महिलावर्गाने चांगला प्रतिसाद दिल्याने बस गतिमान होऊ लागली असताना आगारातून निघणाऱ्या बसेस सुस्थितीत आहेत का? याचा शहनिशा होण्याची गरज आहे.
परंतु आगारातून निघणाऱ्या बसेस चांगल्या अवस्थेत आहे की नाही याची खात्री न करता दिल्या जात असल्याने प्रवाशांसह चालक वाहकांनाही त्याचा त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे.
रविवारी (ता.१९) सटाणा-पुणे ही बस ७५ टक्केपेक्षा जास्त आरक्षित होती. सर्व प्रवासी थेट पुणे येथे जाणारे होते.
बस देवळा आगारातून थोडी पुढे गेली आणि गिअर टाकण्यास अडथळे येऊ लागल्याने चालकांनी बस परत देवळा बस स्थानकावर आणून उभी केली. यामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली.
सटाणा बस आगारातून पुन्हा दुसरी बस मागवली. मात्र तिचीही स्थिती फारशी समाधानकारक तर नव्हतीच. शिवाय सर्वच थांबे घेत गेल्याने ही बस तब्बल तीन तास उशिरा पुणे येथे पोचली.
७० बसेसवर आगाराची भिस्त
सटाणा आगाराचे काम जुन्या ७० बसेसवर चालू आहे. त्यामुळे त्यांचे ब्रेकडाऊन होण्याचे प्रमाण वाढत आहे. स्टिअरिंग ऑइल नाही, गिअर पडत नाही. रेडीएटरमध्ये पाणी नाही.
टायरांची दुरवस्था, स्टार्टर खराब झाल्यामुळे धक्का मारण्याची वेळ येणे, फॅन बेल्ट नसल्याने मशीन गरम होणे या बाबी नेहमीच्याच झाल्या आहेत. यामुळे नवीन बस नसल्याने लांब पल्ल्यासाठीही जुन्याच बस वापराव्या लागत आहेत.
खरे तर दहा लाख किमी किंवा दहा वर्षे असे निकष असताना जुन्या बसेस १५ लाख किमी पेक्षा जास्त असून त्यांना १५-१५ वर्षे झाल्याचे दिसून येत आहे.
"लांब पल्ल्याच्या बसेस तरी चांगल्या दर्जाच्या असाव्यात. अर्ध्या रस्त्यावर बस नादुरुस्त झाल्याने प्रवासी तसेच लहान मुलांचे खूप हाल होतात. मनस्ताप सहन करावा लागतो."
- भास्कर वाघ, देवळा
"आसने आरक्षित करूनही प्रवासात त्रास सहन करावा लागला. आधीच उशीर त्यात जुनी बस असल्याने धीम्या गतीने प्रवास पूर्ण झाला. आता बसशिवाय दुसरा पर्याय शोधावा लागेल."
-प्राजक्ता सोनवणे, देवळा
"उपलब्ध ७० जुन्या बसेसवर चांगले कामकाज करण्याचा आमचा प्रयत्न आहे. मात्र त्यास मर्यादा पडत असल्याने प्रवाशांचा रोष साहजिकच आहे. नवीन बस येणे हाच त्यावरचा पर्याय आहे."
- राजेंद्र आहिरे, आगार व्यवस्थापक सटाणा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.