अवीट गोडीला समस्यांची आडवी नाडी! दशकापासून द्राक्षपंढरीला लागली घरघर

niphad grape cultivation
niphad grape cultivationSakal
Updated on

निफाड (जि. नाशिक) : आपल्या अवीट गोडीने संपूर्ण जगभरात प्रसिद्ध असलेल्या निफाडच्या द्राक्षपंढरीने आपला पाय घट्ट रोवला. पोटच्या पोरापेक्षाही द्राक्षाला जीव लावणाऱ्या येथील द्राक्षबागायतदारांच्या द्राक्ष शेतीतून विकासवाटा रुंदावल्या. मात्र, द्राक्ष शेतीला नजर लागली. ग्लोबल वॉर्मिंग म्हणा किंवा नैसर्गिक संकटामुळे द्राक्ष शेतीत अवकाळा येऊ लागली आहे. त्यामुळे अवीट गोडीला समस्यांची आडवी नाडीच आल्याचे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. द्राक्ष लागवडीपासून कर्जाचे ओझे डोक्यावर घेत द्राक्ष उत्पादन राबत आहेत. मात्र, हवामान बदल, दरवर्षी होणारा अवकाळी पाऊस, गारपीट, थंडीत वाढ, पाणीटंचाई या नैसर्गिक संकटांसह निर्यातक्षम उत्पादन घेताना वाढलेल्या औषधांच्या भरमसाट किमती अन् बाजारभावाची नसलेली शाश्‍वती यात शेतकरी पुरता कोलमडला आहे.

द्राक्ष पिकाची उद्योगांशी बरोबरी

एखादी कंपनी उभी राहिली, की ती उद्योगधंद्यासाठी उभी राहते, या औद्योगिक संकल्पनेतून जिल्ह्यातील एकट्या द्राक्ष पिकाचा विचार करता द्राक्षावर आधारित रोगप्रतिकारक औषध कंपन्या, औषध विक्रीसाठी कृषी पदवीधर, बेरोजगारांनी उभी केलेली दुकाने, द्राक्ष पीक उत्पादनासाठी लागणारा मजूर, रोजगार, द्राक्ष पिकासाठी लागणाऱ्या पूरक वस्तूंची विक्री करणारे, कोरोगेटेड बॉक्सचे कारखाने, त्यावर आधारित कामगार, माल वाहतूक साधने, फवारणी यंत्रे, प्री- कुलिंग, कोल्ड स्टोअरेज यांसारख्या असंख्य द्राक्षावर आधारित उद्योगांची उभारणी द्राक्ष पिकाने घडविली. त्यामुळे औद्योगीकरणाच्या व्याख्येत द्राक्ष बागायती पीक असले तरी उद्योगाप्रमाणे उलाढाल आणि रोजगाराच्या संधी देत आहे.

द्राक्षबागायतदार आपल्या शेती विकासासाठी कर्ज उपलब्ध करून घेऊ लागले. त्या माध्यमातून राष्ट्रीय बँका, पतसंस्था, सहकारी बँकांचे चलनवाढीचे व अर्थचक्राचे गणित द्राक्ष पिकानेच बेरजेचे केले आहे. सर्वच क्षेत्रांत द्राक्ष पिकाची व्याप्ती प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष स्वरूपात वाढली होती. उत्पादित द्राक्षमालाची देशांतर्गत बाजारपेठेसह परकीय निर्यातीमुळे द्राक्ष शेतीने देशाच्या गंगाजळीतील उलाढालीत मोलाचा वाटा उचलला आहे. हे नजरेत भरणारे बदल द्राक्ष पिकानेच घडविले. मात्र, त्या तुलनेत शासनाकडून द्राक्ष पिकाच्या नवनवीन तंत्रज्ञानाने विकसित जाती आणण्यासाठी ठोस पावले उचलली गेली नाहीत. शेतकरीच स्वतः त्याचा शोध घेतात. तसेच, शाश्‍वत बाजारपेठ, निर्यातक्षम व तंत्रशुद्ध उत्पादनासाठी विशेष उपाय, मार्गदर्शन शिबिरेही शासनाकडून घेतली जात नाही. पीकविमा योजनेच्या अटी, शर्थी व भरपाईच्या पळवाटा तयार करून ठेवल्याने त्याकडे द्राक्ष उत्पादक जात नाही. हवामानात होणारे संभाव्य बदल, अचूकपणे हेरणारी यंत्रणा आपल्या देशात नाही. चार चार हवामान केंद्रांचा अंदाज विसंगत असतो. त्यामुळे विश्‍वासार्हता घटलेली आहे. अशा अवस्थेत द्राक्ष उत्पादक आपली द्राक्ष शेती मोठ्या हिमतीने सांभाळतोय.

niphad grape cultivation
नाशिक : टोलनाक्यावर तृतीयपंथी- वाहन चालकांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी

कर्जाचा डोंगर कधी बोजा वाटून दिला नाही. द्राक्ष पिकाने आर्थिक सुबत्ता आणली असली तरी त्या तुलनेत विविध नैसर्गिक आपत्तीमुळे नवनवीन रोग व त्यामुळे वाढत चाललेला उत्पादन खर्च, औषधे, खतांच्या गगनाला भिडणाऱ्या किमती, बँकांचे वाढलेले व्याजदर बघता बाजारभाव मात्र २० वर्षांपूर्वी होते तितकेच आहे. त्यामुळे द्राक्ष शेतीला घरघर लागून उत्पादकांच्या आत्मविश्‍वासाला काहीसा धक्का बसत गेला.

२०१५ चा द्राक्ष हंगाम नजर लागावी असा गेला. वीस मिनिटांच्या गारपिटीने क्षणार्धात सारी द्राक्षपंढरी निष्पर्ण करून टाकली होती. शासनाने विशेष मदतीचा हात द्यावा म्हणून आंदोलने, मोर्चे, निवेदने दिली गेली. मुख्यमंत्री, केंद्रीय कृषिमंत्र्यांसह राज्यातील प्रमुख मंत्र्यांचे दौरे झाले. परंतु, त्याचे सकारात्मक फलित द्राक्ष उत्पादकांना मिळाले नाहीत. ‘मागे फिरेल तो द्राक्षबागायतदार कसला’, या उक्तीप्रमाणे गारपिटीच्या जखमा, कर्जाचे ओझे पेलवत द्राक्षबागायतदार पुन्हा नव्या जोमाने उभा राहतोय. परंतु, नैसर्गिक आपत्ती, गारपीट, अतिवृष्टी, बेमोसमी पाऊस, कडाक्याची थंडी यांसारख्या संकटांसह उत्पादित द्राक्षमालास भरवशाची बाजारपेठ, पैशांची शाश्‍वती याबाबत अद्यापही द्राक्ष उत्पादकांमध्ये संभ्रमावस्था असल्याने शासनस्तरावर द्राक्ष पिकासाठी अथवा फळपिकांसाठी विशेष उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.

niphad grape cultivation
नाशिक : पेट्रोल पंपावर हेल्‍मेटसाठी विनवण्या सुरूच

द्राक्ष पीक म्हणजे ‘नाव मोठे, लक्षण खोटे’ असे झाले आहे. लाखो रुपये खर्च करून एक रुपया पदरात पडत नाही. रासायनिक खते, औषधे, मजुरीचा वाढता खर्च आणि उत्पादनाचा ताळमेळ बसत नाही. निसर्गाचा लहरीपणा सातत्याने नुकसान करत असल्यामुळे हाती आलेले पीक वाया जाते. वर्षभर सांभाळून अनेकदा खर्चदेखील फिटत नसल्याने द्राक्षशेती जुगार झाली आहे.

- शोभा कमानकर, द्राक्ष उत्पादक, भेंडाळी

द्राक्ष शेतीत दहा वर्षांपासून अनेक समस्या तयार झाल्या आहेत. परंतु, विक्रीची समस्या अनेक दिवसांपासून आहे. अनेक संकटांना तोंड देऊन शेतकरी माल तयार करतो. पण, विक्री केलेल्या मालाचे पैसे पदरात पडतीलच याची खात्री नसते. त्यामुळे परप्रांतीय व स्थानिक व्यापाऱ्यांची बाजार समितीत नोंद होऊन त्यांना खरेदी- विक्रीसाठी परवानगी देणे गरजेचे आहे.

- शोभा साठे, शेतकरी, नैताळे

द्राक्षपंढरीतील बदललेले निसर्गचक्र, दिवसागणिक औषधांच्या भरमसाट वाढत चाललेल्या किमती, वेळेवर मजुरांची अनुपलब्धता, व्यापाऱ्यांकडून होणारी फसवणूक, निर्यात धोरणाबाबत सरकारचे दुर्लक्ष, शासकीय पातळीवरून काळानुरूप नवीन पेटंट, जाती व संशोधनाप्रति अनास्था, प्रक्रिया उद्योगाला योग्य प्रमाणात अनुदान मिळत नाही. यामुळे द्राक्ष उत्पादक हैराण झाले आहेत.

- योगेश रायते, शेतकरी, खडक माळेगाव

niphad grape cultivation
नाशिक : इंजिनिअरिंगच्या 7 विद्यार्थ्यांविरूध्द गुन्हा दाखल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()