Unseasonal Rain: नाशिक जिल्ह्यात गत दोन दिवसांपासून झालेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्ष, कांदा उत्पादक शेतकरी धास्तावला आहे. सध्या रब्बी हंगामातील लाल कांदा काढणीचे काम सुरू आहे तर, द्राक्ष खुडे सुरू आहेत. यातच पावसाने झोडपल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. दुसरीकडे रब्बी हंगामातील हरभरा, ज्वारी पिकाला पावसाने काहीसा दिलासा मिळाला आहे.
भारतीय हवामान विभागाच्या मुंबई येथील प्रादेशिक हवामान केंद्र यांच्याकडून हलक्या पावसाची शक्यता वर्तविली होती. मंगळवारी (ता.९) रोजी सायंकाळी दिंडोरी, पेठ व सिन्नर तालुक्यात हलक्या पावसाने हजेरी लावली. बुधवारी (ता.१०) सकाळच्या सुमारास निफाड, सिन्नर, चांदवड तालुक्यात हलक्या सरी बरसल्या. हवामान खात्यांच्या माहितीनुसार जिल्ह्यात सरासरी २ ते ४ मिमी दरम्यान पाऊस झाला आहे.
या पावसाने शेतकऱ्यांची धाकधूक वाढली आहे. अवेळी झालेल्या या पावसामुळे काढणीस आलेल्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे धाबे दणाणले आहे. निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत, सामोरे मिग, कोकणगाव, शिरसगाव, उंबरखेड परिसरासह गोदाकाठ परिसरातही हलक्या सरी झाल्याची नोंद आहे. सध्या द्राक्ष घड पाणी उतरण्याच्या अवस्थेत आहेत. काही ठिकाणी काढणी सुरू आहे. या परिस्थितीत द्राक्ष घडात पाणी गेल्याने तडे जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दिंडोरी तालुक्यात मंगळवारी रात्री १५ ते २० मिनिटे सरी बरसल्या. याचा फटका द्राक्षाला बसणार आहे.
पेठ तालुक्यात पावसाने सुमारे अर्धा तास हजेरी लावली. तालुक्यातील पेठ, कुंभाळे, राजबारी, बाडगी, जळे, शिराळे, तोंडवळ, वांगणी, कोटंबी या भागात अवकाळी पावसाने सुमारे अर्धा तास तडाखा दिला. या पावसामुळे टोमॅटो, मिरची, वांगी, हरभरा, गहू आदी पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. सिन्नर तालुक्यातील जायगाव परिसरात तर, चांदवड तालुक्यातील वाहेगाव साळ परिसरात रात्री तीन वाजेनंतर सकाळपर्यंत रिमझिम पाऊस झाला. त्यामुळे या भागातील ज्या शेतकऱ्यांनी कांदा काढून ठेवला.आहे, त्यांची धावपळ झाली.
लागवड झालेल्या कांदा पिकावर करपा पडण्याची शक्यता आहे. गत तीन वर्षात अनेक शेतकऱ्याच्या पदरी काहीच पडलेले नाही. त्यात पुन्हा नैसर्गिक आपत्तीने डोके वर काढल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे सावट आहे. कापणी व मळणी केलेले पिकांना प्लास्टिक पेपर किंवा ताडपत्रीने झाकावे किंवा सुरक्षित जागेवर ठेवावे, असा सल्ला इगतपूर येथील विभागीय कृषी संशोधन केंद्र यांनी दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.