Nashik News : इलेक्‍ट्रिक टेस्टिंग लॅब उभारणीत अडथळ्यांची शर्यत

electronic testing lab
electronic testing labsakal
Updated on

Nashik News : केंद्रीय सेंट्रल पॉवर रिसर्च इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून शिलापूर येथे टेस्टिंग लॅब उभारणीचे काम सुरू असले तरी अडथळ्यांची शर्यत काही कमी होताना दिसत नाही. लॅब उभारणीसाठी जागेचा शोध घेण्यापासून सुरू झालेली अडथळ्यांची शर्यत आता टेस्टिंग मशिनरी उपलब्ध होत नाही, येथपर्यंत थांबली आहे.

लॅबसाठी जागा मिळाल्यानंतर अडीच वर्षांत प्रकल्प उभा राहील, असा दावा करण्यात आला. परंतु अद्यापही इलेक्ट्रिकल साहित्य टेस्टिंगचा दिवस प्रत्यक्षात कधी उजाडेल, याबाबत खात्री देता येत नाही. (Eight years after start of work electronic testing lab project remains incomplete nashik news)

नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील शिलापूर येथे जवळपास दीडशे एकर सरकारी जागेवर इलेक्‍ट्रिकल टेस्टिंग लॅब उभारण्याचा निर्णय केंद्र सरकारच्या सेंट्रल पॉवर रिसर्च इन्स्टिट्यूट (सीपीआरआय) ने घेतला. केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाचे भोपाळ व बेंगळुरू येथे असे केंद्रीय ऊर्जा संशोधन प्रकल्प आहेत. पश्‍चिम भारतात त्यांचा तिसरा प्रकल्प सुरू करण्यासाठी जागेचा शोध सुरू होता.

नाशिकमध्ये इलेक्‍ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स व पूरक असे ८५० हून अधिक उद्योग असल्याने नाशिक हेच प्रकल्पासाठी योग्य ठिकाण असल्याने तत्कालीन पालकमंत्री छगन भुजबळ व माजी खासदार समीर भुजबळ, ‘निमा’ या उद्योग संघटनांच्या प्रतिनिधींनी केंद्र सरकारच्या सीपीआरआय संस्थेशी संपर्क साधून नाशिकमध्ये प्रकल्प उभारणीचा आग्रह धरला. इलेक्‍ट्रिकल टेस्टिंग लॅबसाठी दीडशे एकर जमीन उपलब्ध करून दिली गेली.

जागा उपलब्ध झाल्यानंतर अडीच ते तीन वर्षांत टेस्टिंग लॅब उभी राहील तसेच पहिल्या टप्प्यात दोनशे ते पाचशे कोटींची व भविष्यात पाच ते दहा हजार कोटींची गुंतवणूक होऊन एक हजार लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल, असा दावा करण्यात आला. परंतु प्रत्यक्षात काम सुरू होऊन आठ वर्षांचा कालावधी उलटत असतानाही प्रकल्प अपूर्णावस्थेतच आहे.

इलेक्‍ट्रिकल टेस्टिंग लॅबसाठी जागा उपलब्ध झाल्यानंतर अडीच ते तीन वर्षांत टेस्टिंग लॅब उभी राहील, असे आश्‍वासन देण्यात आले होते. मात्र अद्याप ते पूर्ण झालेले नाही. आठ ते दहा वर्षांत नवीन तंत्रज्ञान विकसित झाले आहे. या तंत्रज्ञानाचा समावेश नवीन लॅबमध्ये करणे आवश्‍यक ठरणार आहे.

electronic testing lab
Nashik Water Crisis: सोळा गाव पाणीयोजनेची पाइपलाइन दुसऱ्यांदा फुटली! गाजरवाडी शिवारात पाण्याचा अपव्यय

इलेक्‍ट्रॉनिक्‍स व इलेक्ट्रिकल हब

इलेक्‍ट्रिकल उत्पादने चाचणीसाठी भोपाळ, बेंगळुरू येथे पाठवताना उद्योजकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यात वेळ व पैशाचाही अपव्यय होतो. चाचणीचा अहवाल नकारात्मक आल्यास पुन्हा उत्पादन करून चाचणीसाठी पाठवावे लागते. एका वस्तूची चाचणी करायची झाल्यास चार ते सहा महिन्यांचा कालावधी लागतो.

त्यामुळे वेळ व पैसा वाचेल. भारतातील व परदेशातील उद्योजकसुद्धा येथे आपल्या उत्पादित मालाच्या प्रमाणीकरणासाठी येऊ शकतील. त्यामुळे नाशिक विभागात इलेक्‍ट्रिकल उद्योगांना मोठी चालना मिळेल. रोजगार उपलब्ध होईल.

पश्‍चिम भारतातील बहुतांश इलेक्‍ट्रिकल उद्योगांना आपल्या उत्पादित वस्तूची चाचणी व प्रमाणीकरणासाठी भोपाळ अथवा बेंगळुरूला जाण्याची आवश्‍यकता यानिमित्ताने राहणार नाही. लॅब कार्यान्वित झाल्यास नाशिक इलेक्‍ट्रॉनिक्‍स व इलेक्ट्रिकल हब होण्यास मदत होणार आहे.

देशातील तिसरी इलेक्‍ट्रिकल लॅब

नाशिकमध्ये प्रामुख्याने क्रॉम्प्टन ग्रीव्हज, इपकॉस, एबीबी, ज्योती स्ट्रक्‍चर, ऋषभ इस्ट्रुमेंट, सीजी लुसी प्रा. लि., बॉश या दिग्गज तसेच या कंपन्यांना पूरक जवळपास ८५० कंपन्या आहेत. या कंपन्यांना लॅब फायदेशीर ठरेल. केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाचे भोपाळ व बेंगळुरू येथे असे केंद्रीय ऊर्जा संशोधन प्रकल्प आहेत. यानिमित्ताने पश्‍चिम भारतात नाशिक येथे तिसरी लॅब सुरू होईल.

electronic testing lab
Nashik Crime: गुन्हे दाखल डीजेंची होणार जप्ती! सहायक आयुक्तांकडे चौकशी; ‘जुलूस’मध्येही वाजला डीजे

उद्‌घाटनाची तयारी

सद्यःस्थितीत टेस्टिंग लॅबची इमारत बांधून तयार आहे. टेस्टिंगची काही मशिन उपलब्ध आहेत. काही मशीन उपलब्ध होण्यात अनेक तांत्रिक अडचणी आहेत. नवीन तंत्रज्ञानाच्या मशीन कधी उपलब्ध होतील, याबाबत साशंकता आहे. असे चित्र असताना लॅबच्या उद्‌घाटनाची तयारी सध्या सुरू झाली आहे.

टेस्टिंग लॅबचा प्रवास

- २०१३ च्या ‘निमा पॉवर एक्झिबिशन’मध्ये घोषणा
- २०१४ पासून जागेचा शोध
- शिलापूर येथे सरकारी जागेची निश्‍चिती
- राज्य सरकारकडून जागेची किंमत घोषित
- ‘सीपीआरआय’कडून सरकारी किमतीत जागेची मागणी
- २०१६ ला जागेचे हस्तांतरण
- २०१८ मध्ये भूमिपूजन व जागेला कुंपण
- आतापर्यंत इमारत बांधून पूर्ण
- ट्रान्स्फॉर्मर, ऑइल टेस्टिंग, एनर्जी मीटर टेस्टिंगचे काम अपूर्ण

"तत्कालीन पालकमंत्री छगन भुजबळ व मी टेस्टिंग लॅबसाठी प्रयत्न केले. त्याचे फलस्वरूप म्हणून प्रत्यक्षात कामाला सुरवात झाली. वास्तविक आतापर्यंत लॅब तयार होऊन प्रत्यक्षात टेस्टिंगला सुरवात होणे गरजेचे होते. आता काही अडचणी असतील, तर केंद्रीय सेंट्रल पॉवर रिसर्च इन्स्टिट्यूटच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून अडचणी सोडवू. नाशिकच्या उद्योगांना चालना देणारा हा प्रकल्प पूर्ण करूच." - समीर भुजबळ, माजी खासदार

"निमा’च्या प्रदर्शनात लॅबची घोषणा झाली होती. त्यास आता जवळपास नऊ वर्षे झाली. इलेक्ट्रिक टेस्टिंग लॅबचे काम आता अंतिम टप्प्यात आहे. काही मशीन बसविण्याचे काम अपूर्ण आहे. लवकरच ते पूर्ण होऊन प्रत्यक्षात काम सुरू होईल, अशी अपेक्षा आहे." - धनंजय बेळे, अध्यक्ष, निमा

"भोपाळ व बेंगळूरूप्रमाणेच पश्‍चिम भारतात टेस्टिंगसाठी नाशिकमध्ये टेस्टिंग लॅब आवश्‍यक होती. ज्या उद्देशाने टेस्टिंग लॅबची मुहूर्तमेढ रोवली गेली. तो उद्देश अद्यापही पूर्ण होताना दिसत नाही. आतापर्यंत साठ टक्के काम झाले आहे. काही वर्षांत टेस्टिंगमध्ये नवीन तंत्रज्ञान आले आहे. त्यामुळे लॅब उभारताना नवीन तंत्रज्ञानाचा समावेश होणे अपेक्षित आहे." - मिलिंद राजपूत, विश्‍वस्त, निमा

electronic testing lab
Nashik Grapes Exhibition : द्राक्ष पंढरीत ‘ॲग्रोवन’ द्राक्ष प्रदर्शनाची सुरवात; पिकाची माहिती एका छताखाली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.