नाशिक : माजी मंत्री एकनाथ खडसे यांना सध्या काम नाही. घरी एकटेच बसून असल्याने त्यांची मानसिकता बिघडली आहे. मी पैसे घेतल्याचा पुरावा त्यांनी द्यावा, असे आव्हान माजी मंत्री गिरीष महाजन यांनी दिले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा खडसे-महाजन वाद उफाळून आल्याचे चित्र आहे.
भारतीय जनता पक्षाच्या नाशिक प्रभारीपदी नियुक्तीनंतर प्रथमच शहरात आले असताना श्री. महाजन यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. खडसे यांनी केलेल्या आरोपांच्या अनुषंगाने त्यांनी आपण खडसेंच्या म्हणण्याला फार महत्व देत नसल्याचे सांगितले. ते म्हणाले, की त्यांची मानसिकता बिघडली आहे. खडसे माझ्यापेक्षा सिनिअर नाही. त्यांच्या आधी मी भाजपमध्ये आहे. उमेदवारी लवकर मिळाली, म्हणून त्यांना सिनिअर म्हणता येणार नाही. सर्वांनाच ते माझ्यामुळे मोठे झाल्याचे सांगत फिरत असल्याची टिकाही त्यांनी या वेळी केली. दरम्यान, राज्य सरकारवर टिका करताना ते म्हणाले, सरकार गेंड्याच्या कातडीचे आहे. लोकांच्या प्रश्नांशी सरकारला देणे-घेणे नाही. बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना आज नवाब मलिक जिंदाबादच्या घोषणा देत आहे, हे दुर्दैवी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्यासंदर्भात शरद पवार यांनी केलेले आरोप राजकीय आहेत. कुठल्याही अर्धवट कामांचे उद्घाटन होत नसते. युक्रेनमधून विद्यार्थ्यांना मायदेशात आणले जात आहे. मात्र, केंद्र सरकार काहीच करत नाही, हे दाखविण्याचा विरोधकांकडून प्रयत्न आहे. सध्या राज्यपाल हटाव मोहीम सुरु आहे. परंतू राज्यपालांची नेमणूक शिवसेना, राष्ट्रवादीच्या हातात नाही. मनासारखे करा अन्यथा हटवा अशी महाविकास आघाडीची भुमिका असल्याचेही त्यांनी या वेळी नमुद केले.
राऊत राष्ट्रवादीचे प्रवक्ते
फोन टॅपिंगच्या आरोपांसंदर्भात बोलताना महाजन म्हणाले, राऊत यांच्या बोलण्याला किंमत नाही. राज्यात युतीची सत्ता होती, तेव्हा राऊत गायब होते. त्यावेळी त्यांना कोणी ओळखतही नव्हते. राष्ट्रवादीचे प्रवक्ते म्हणून ते बोलत असून, तेव्हापासून त्यांना लोक ओळखतात. भाजप-सेना युती तोडण्यामागे संजय राऊत यांचा पुढाकार आहे. फोन टॅपिंगचे पुरावे असल्यास सादर करावे, असे आवाहन करताना राऊत यांच्या जिभेला हाड नसल्याची टिकाही त्यांनी केली. रश्मी शुक्लांच्या चौकशीसंदर्भात पुरावे समोर आले तरच अर्थ असल्याचे ते म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.