नाशिक : युद्धजन्य परिस्थितीमुळे युक्रेनहून देशात वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना परतावे लागले. या विद्यार्थ्यांसाठी आरोग्य विद्यापीठाचे ई- लर्निंग सोल्यूशन उपयुक्त असल्याचे प्रतिपादन विद्यापीठाचे प्रति-कुलपती तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख (Amit Deshmukh) यांनी गुरुवारी (ता. ७) केले.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (Maharashtra University of Health Sciences) व इल्सविअर यांच्यातर्फे तात्पुरता व ऐच्छिक स्वरूपाचे डिजिटल कन्टेंन्ट विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिला आहे. या कंटेंटसह आरोग्य विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांकरिता मोबाईल ॲपचे लोकार्पण ऑनलाइन पद्धतीने झाले. या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. विद्यापीठाचे कुलगुरू लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डॉ. माधुरी कानिटकर प्रति-कुलगुरू डॉ. मिलिंद निकुंभ, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, इल्सविअरचे व्यवस्थापकीय संचालक शंकर कौल, परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक, अधिष्ठाता डॉ. सुशीलकुमार झा, वित्त व लेखाधिकारी एन.व्ही. कळसकर, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. मनोजकुमार मोरे आदी उपस्थित होते.
मंत्री श्री. देशमुख म्हणाले, की (युक्रेनहून ukraine) परतलेल्या वैद्यकीय शिक्षणातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी विद्यापीठाने इल्सविअर संस्थेच्या सहकार्याने कमी कालावधीत उपयुक्त कंटेन्ट सुरु केला आहे. तसेच विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी तयार केलेले एमयुएचएस ॲपचा विद्यार्थ्यांना फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कुलगुरू डॉ.कानिटकर म्हणाल्या, की विद्यापीठ परिसरात वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठीचे महाविद्यालयास लवकरच प्रारंभ होणार आहे. यासाठी आवश्यक पायाभूत सुविधांसाठीची कार्यवाही सुरु आहे. विद्यापीठाकडून वर्कशॉपच्या माध्यमातून प्रॅक्टिकल बेडसाईड दिला जाणार असल्याचा मानस आहे. यासाठी संलग्नित महाविद्यालय प्रमुखांशी चर्चा सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. युक्रेनहून परतलेल्या विद्यार्थ्यांसाठी विकसित केलेला ई-लर्निंग कंटेंट ऐच्छिक आहे. विद्यार्थी त्यांच्या वेळेनुसार, सुविधेनुसार व शिकण्याच्या वेगानुसार ऑनलाइन शिक्षण घेऊ शकतात. विद्यापीठाचे संकेतस्थळावर नोंदणी करून विद्यार्थ्यांना डिजिटल कंटेन्ट निःशुल्क उपलब्ध होईल.
इल्सेविअरचे व्यवस्थापकीय संचालक शंकर कौल म्हणाले, की विद्यापीठाच्या मागणीनुसार व अभ्यासक्रमास आनुषंगिक कंटेन्ट तयार करण्यात येईल. युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या प्रयत्नातून व सहकार्यातून साकारलेले ई-लर्निंग सोल्युशनचा उपयोग करावा. कुलसचिव डॉ. चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी सूत्रसंचालन तर परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक यांनी आभार मानले.
पदव्युत्तर संस्थेचा लवकरच शुभारंभ
श्री.देशमुख म्हणाले, की पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधनाला चालना मिळण्यासाठी शासनाचा वैद्यकीय शिक्षण विभाग व विद्यापीठ नेहमीच प्रयत्नशील आहेत. या अनुषंगाने आरोग्य विद्यापीठ आवारात लवकरच पदव्युत्तर वैद्यकीय महाविद्यालय व संशोधन संस्थेचा शुभारंभ होईल. यासाठी शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.