पंचवटी (जि. नाशिक) : महापालिका आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार (NMC Commissioner Ramesh Pawar) यांच्या आदेशानुसार गुरुवारी (ता. २१) सलग दुसऱ्या दिवशी पंचवटी विभागात अतिक्रमणविरोधी मोहीम राबविण्यात आली. मोहिमेतून बारा हातगाड्यांसह तीन टपऱ्या व मोठ्या प्रमाणात साहित्य जप्त करण्यात आले. सदर मोहीम पुढेही सुरूच राहणार असल्याचे विभागीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
पंचवटीतील गंगा घाटावरील दोन्ही किनाऱ्यावरील अतिक्रमण बुधवार आणि गुरुवारच्या कारवाईत काढण्यात आले. गोदावरीच्या किनाऱ्यावर जडीबुटी विक्रेते तसेच वेगळ्या प्रकारचे साहित्य विकणारे विक्रेत्यांनी पाल मांडून आपली दुकाने थाटली होती. त्यामुळे वाहतुकीस तसेच येणाऱ्या भाविकांना अडचणीला तोंड द्यावे लागत होते. दोन दिवसापूर्वी आयुक्तांनी केलेल्या पाहणीत या सर्व भागातील अतिक्रमणाची जाणीव झाल्यामुळे पंचवटी विभागीय कार्यालयाकडून अतिक्रमण मोहीम राबविण्यात आली.
अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे यांच्या मार्गदर्शनाने पंचवटी विभागीय अधिकारी कैलास राभडिया, नाशिक पूर्व विभागीय अधिकारी निकम, भूषण देशमुख, राजेश सोनवणे, प्रवीण बागूल, तसेच मनपा अतिक्रमण विभागाचे सर्व कर्मचाऱ्यांनी गंगा घाटावरील दोन्ही किनाऱ्यावरील अतिक्रमण काढले. या वेळी पंचवटी पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक दिनेश खैरनार यांच्यासह पोलिस मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. ध्वनिक्षेपकावरून विक्रेत्यांना पाल व दुकाने काढण्यासाठी सूचना देण्यात येत होत्या.
रामसेतूवरील अतिक्रमणे काढली
मोहिमेत जुन्या भाजी बाजारासह साईबाबा मंदिर, यशवंतराव महाराज पटांगण, रामकुंड परिसर, सांडव्यावरील देवी मंदिर परिसरासह रामसेतूवरील अतिक्रमणे काढण्यात आली. व्यावसायिकांनी मनपा अतिक्रमण विभागाला न जुमानता रामसेतूवरील व्यवसाय सुरूच ठेवले होते. दुपारी येथील साहित्यासह काही टपऱ्या, हातगाड्याही जप्त करण्यात आल्या. या पुलाच्या चक्क अर्ध्या भागात अतिक्रमणे झाली आहेत. आधीच पुलावरील स्लॅब (Slab) वाहून गेल्याने पादचाऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागते, त्यातच याठिकाणी मोठ्या प्रमाणावरील अतिक्रमणेही वाढले आहेत.
"आयुक्तांच्या गंगाघाट भेटीत मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे आढळून आली. स्वच्छ, सुंदर नाशिक संकल्पनेसाठी यापुढेही या भागात अतिक्रमणविरोधी मोहीम सुरूच राहील."
- कैलास राबडिया, विभागीय अधिकारी
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.