वडील श्रीनिवास शास्त्री संस्कृतचे पंडित व आयुर्वेदतज्ज्ञ होते. त्यांच्या आईचे नाव व्यंकम्मा. सर विश्र्वेश्र्वरय्या १५ वर्षांचे असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले.
विश्र्वेश्र्वरय्या यांचे प्राथमिक शिक्षण चिकबल्लापूर येथे पूर्ण झाले. त्यानंतर त्यांनी बेंगळुरू येथील सेंट्रल महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेतले. १८८१ मध्ये मद्रास विद्यापीठातून बी.ए. पास झाल्यानंतर स्थापत्य अभियांत्रिकी शाखेत, कॉलेज ऑफ सायन्स आताचे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे (सीओईपी) येथून १८८३ मध्ये प्रथम श्रेणीत एलसीई आणि एफसीई परीक्षा उत्तीर्ण केल्या. या परीक्षा आत्ताच्या बी.ई. परीक्षेच्या समकक्ष आहेत.
-इंजि. संदीप पांडागळे, कार्यकारी अभियंता, सा. बां. विभाग, धुळे
- इंजि. हरिभाऊ गिते, अध्यक्ष, सरळ सेवा वर्ग- १ अभियांत्रिकी अधिकारी संघटना, महाराष्ट्र राज्य
(Engineers Day 2023 article on Dr Mokshagundam Visvesvaraya nashik news)
सर मोक्षगुंडम विश्र्वेश्र्वरय्या स्थापत्य अभियांत्रिकीतील शिक्षण पूर्ण होताच ब्रिटिश सरकारच्या मुंबई इलाख्यात सहाय्यक अभियंता पदावर रुजू झाले. त्यांची पहिली नेमणूक नाशिक, धुळे परिसरात झाली. स्थापत्य अभियांत्रिकीतील अनेक प्रकल्प त्यांनी यशस्वीरीत्या पूर्णत्वास नेले. पुणे व गुजरातमधील सुरत जिल्ह्यात त्यांनी काम केले. १९०४ मध्ये शासनाने आरोग्य अभियंता पदावर त्यांना बढती दिली. सिंध प्रांतातील सिंधू नदीवर सक्कर बॅरेजची निर्मिती करून सक्कर शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न त्यांनी मार्गी लावला.
सिंध शहराचा पाणीपुरवठा आणि सांडपाण्याची व्यवस्था पूर्ण करण्यात त्यांचा मोठा सहभाग होता. म्हैसूर राज्यात कावेरी नदीवर ५० टीएमसी क्षमतेचा ६० मेगावॉट जलविद्युत निर्मितीचा दीड लाख एकरापेक्षा जास्त क्षेत्राला सिंचन सुविधा देणारा त्या वेळचा सर्वांत मोठा जलाशय त्यांनी निर्माण केला. कावेरी नदीवरील हे धरण ‘कृष्णराज सागर जलाशय’ म्हणून ओळखले जाते. १९३८ मध्ये गांधीजींच्या सांगण्यावरून विश्वेश्वरय्या ओडिशा प्रांताला पुराच्या विळख्यातून सोडविण्यासाठी गेले.
त्यांनी पूरनियंत्रण योजना बनविली. त्याचाच परिपाक म्हणून पुढे महानदीवर देशातील सर्वांत जास्त लांबीचे हिराकुंड धरण बांधण्यात आले. भारत देशाला समृद्ध, संपन्न कसे करावे, दारिद्र्यमुक्त कसे करावे, याच चिंतनात ते सतत असत. या प्रश्नांच्या उत्तरांसाठी त्यांनी स्वत:च्या खर्चाने परदेश दौरे केले.
पुण्याजवळील खडकवासला धरणाची उंची न वाढवता त्यातील साठा वाढविण्यासाठी आणि त्याचबरोबर पुणे शहराला मुठा नदीच्या पुरापासून दिलासा देण्यासाठी स्वयंचलित दरवाजे बसविण्याची योजना कार्यान्वित केली. या दरवाजांचे पेटंट त्यांना मिळाले. पण त्याची रॉयल्टी त्यांनी घेतली नाही. देश आणि देशाबाहेर सांडपाण्याची व्यवस्था करण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.
‘हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
औद्योगिकरणाची कास धरा अथवा विनाशासाठी तयार राहा’ ही घोषणा देऊन त्यांनी भारताला औद्योगिकरणाची दिशा दाखवून खऱ्या अर्थाने विकासाचा नवीन मार्ग दाखवून दिला. भारतातील बरेचसे उद्योगव्यवसाय सुरू करण्याचे क्षेय त्यांना जाते. औद्योगिक प्रगती भक्कम पायावर उभारायची असेल तर पाया मजबूत असावा, अशी त्यांची धारणा होती. ती मजबूत करण्यासाठी शिक्षण, लोखंड, पोलाद उद्योग, वीजनिर्मिती, दळणवळणाच्या साधनांचा विकास, बँकांचा विकास, धरणे बांधून जलसंचय वाढविण्याच्या योजना यावर त्यांनी भर दिला. म्हैसूरमधील पोलाद कारखान्याची निर्मिती आणि वाढ टाटांनी जवळून पाहिली होती.
अशाच प्रकारचा कारखाना टाटांनी जमशेदपूरला निर्माण केला होता. विश्वेश्वरय्यांसारखे तज्ञ प्रशासकाचा सहभाग टाटा उद्योग समूहाकडे असावा, असे वाटून टाटांनी विश्वेश्वरय्यांना संचालक पदावर घेतले. निवृत्तीनंतर २८ वर्षे सर एमव्ही टाटा उद्योगसमूहाबरोबर मार्गदर्शक नात्याने ते राहिले. भद्रावती लोखंड पोलाद उद्योग, जोग जलविद्युत निर्मिती योजना, बँक ऑफ म्हैसूरची स्थापना, नॅरो गेज व मीटर गेज रेल्वे प्रकल्प, भटकल येथील बंदर विकास योजना.
विमानाचा कारखाना सुरू करण्याची व पायाभूत संस्थांची उभारणी त्यांनी केली. त्यांनी निव्वळ पायाभूत औद्योगिक संस्थाच सुरू केल्या नाहीत, तर म्हैसूर सॅन्डल सोप, रेशीम उद्योग, कागद उद्योग, हॉटेल व्यवसाय, छपाई उद्योग, चंदनाचे तेल, धातू, चामडे, साखर यांसारख्या उपयोग्य वस्तूंचे कारखाने स्थापून औद्योगिकरणाला चालना दिली.
उद्योग व व्यवसाय यांना चांगले स्थैर्य प्राप्त व्हावे, यासाठी त्यांचा संघटना स्थापण्यावर विशेष भर होता. म्हैसूर चेंबर ऑफ कॉमर्स, ऑल इंडिया मॅन्युफॅक्चरिंग ऑर्गनायझेशन या संस्थांच्या स्थापनेतही त्यांनी मोलाची कामगिरी बजावली. अर्थशास्त्रीय परिषद, सर्वदलीय परिषद, भारतीय विज्ञान काँग्रेस यांसारख्या संस्थांचे अध्यक्षपद त्यांनी सांभाळले. म्हैसूरचे दिवानपद स्वीकारण्याअगोदर त्यांनी त्यांच्या सर्व नातेवाइकांस घरी जेवणास बोलाविले व त्या सर्वांना स्पष्टपणे सांगितले, की हे प्रतिष्ठित दिवाणपद ते एका अटीवर स्वीकारतील.
एकही नातलग त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारच्या कार्यालयीन कामासंदर्भात शिफारशीसाठी येणार नाही. १९१२ मध्ये म्हैसूरचे दिवाण म्हणून त्यांची नेमणूक झाल्यानंतर कावेरी नदीच्या पाण्याचे त्यांनी सर्वक्षण केले व अमेरिकेतील तेन्सी व्हॅली अकादमीच्या मॉडेलवरून डिझाइन केले. याचा उपयोग म्हैसूरच्या मंड्या जिल्ह्याला फक्त इरिगेशनसाठीच नाही, तर त्यातील कारखान्याकरिता वीज निर्माण करण्यासाठी झाला.
सर एम. व्ही. नी म्हैसूर विद्यापीठाची स्थापना केली. बेंगळुरूमध्ये इंजिनिअरिंग तसेच हेब्बलमध्ये ॲग्रिकल्चर कॉलेज सुरू केले. उच्च दर्जाचे तांत्रिक शिक्षण दिल्याशिवाय प्रगती होणार नाही, याची त्यांना खात्री होती. त्यासाठी त्यांनी स्वत:च्या खर्चाने बेंगळुरूला जयचामराजेंद्र वोडीयार पॉलिटेक्निक सुरू केले.
म्हैसूरचे दिवाण असताना त्यांनी १९१२-१९१८ या काळात कन्नड भाषेतून शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण वर्ग चालवले, शेतीशाळा काढल्या. शेतकी प्रयोग परिसर स्थापले, ग्रामीण वाचनालये उघडली. त्यांनी कन्नड साहित्य परिषदेची स्थापना केली व विज्ञानाचा प्रसार लोकभाषेतून व्हावा म्हणून कन्नड भाषेतून विज्ञानाची पुस्तके लिहून प्रकाशित केली. ते म्हैसूरचे दिवाण या पदावरून १९१८ मध्ये स्वेच्छेने निवृत्त झाले. निवृत्तीनंतरही ते सतत काम करत राहिले. वयाच्या शंभराव्या वर्षी त्यांच्या सन्मानार्थ भारत सरकारने टपाल तिकीट काढले.
विश्वेश्वरय्या यांनी केलेली विशेष महत्त्वाची कामे
१) ॲटोमॅटिक गेटचे डिझाइन संशोधन, निर्मिती, पेटंट, त्यानंतर त्याचे स्वामित्वधन स्वीकारले नाही. खडकवासला, राधानगरी, टायमरा, कृष्णराजसागर इ. ठिकाणी ही गेट्स बसविली.
२) ब्लॉक सिस्टिम पांझरा नदीवरील व फडपद्धत पाहून, अभ्यासून त्यावरून ‘ब्लॉक पद्धत’ डिझाइन केली. त्याला मंजुरी मिळवून महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात नीरा नदीच्या डाव्या कालव्यावर प्रथम त्याची अंमलबजावणी. नंतर महाराष्ट्रात नीराबरोबरच प्रवरा व मुळा नदीवर, तर म्हैसूर संस्थानात सुमारे दोन हजार पाचशे ठिकाणी जुन्या बंधाऱ्यांवर (अनिकट) तसेच नवीन बंधारे व कालव्यांवर उभारणी.
३) सायफन पद्धतीचा वापर पाणी समपातळी गाळते हा गुणधर्म पूर्वीपासून माहीत होता. राजेरजवाड्यांनी किल्ले व राजवाडे यात हे तत्त्व वापरले होते. तथापि पाण्याच्या या गुणधर्माचा वापर करून सामान्य माणसासाठी पाणीपुरवठा (धुळे योजना) आणि शेतीच्या सिंचनासाठी पाणी (दातर्ती सायफन) येथे त्यांनी केलेला वापर हे त्यांच्या कुशाग्र बुद्धिमत्ता व तंत्रज्ञानाचे फलित होते.
४) कृष्णराजसागर सिंचन उद्योगासाठी वीज व प्रचंड जलसाठा निर्माण करून वेगवेगळ्या छोट्या बंधाऱ्यांना (अनिकटचा) वापर करून ब्लॉक पद्धतीच्या वापरातून जलवाटप व व्यवस्थापनाचे विकेंद्रीकरण तसेच वृंदावन गार्डनसारख्या सुंदर वास्तूची निर्मिती.
५) ‘भद्रावती स्टील मोठ्या उद्योगधंद्यांच्या वाटचालीतील महत्त्वाचे पाऊल.’ १९५५ मध्ये भारत सरकारतर्फे देशाचा सर्वोच्च किताब ‘भारतरत्न’ हा राष्ट्रपती डॉ. सर्वोपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते, सर एम. व्ही. यांना प्रदान करण्यात आला. सर एम. व्ही. यांचे १४ एप्रिल १९६२ मध्ये वयाच्या १०१ व्या वर्षी निधन झाले.
त्यांचा जन्मदिन ‘अभियंता दिन’ म्हणून भारतभर साजरा होतो. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत १९९८ पासून त्यांचा जन्मदिन ‘अभियंता दिन’ म्हणून साजरा होतो. गुणवत्ता संवर्धन व सचोटीला प्रोत्साहन मिळावे म्हणून भारतरत्न सर विश्र्वेश्र्वरय्या यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र्र शासनाने ‘उत्कृष्ट अभियंता पुरस्कार’ देण्यास सुरवात केली आहे.
विश्वेश्वरय्या हे एखाद्या वटवृक्षासारखे आहेत. त्यांचा भूतकाळ व पाळेमुळे ही भारतीय संस्कृतीत खोलवर रुजलेली आहेत, तर त्यांची नजर ही प्रगत संपन्न सुशिक्षित अशा भारताचा वेध घेत आहे. त्यांच्या एकेका कार्याचे आणि कृतीचे केवळ दर्शन आणि स्मरण हेही आपल्यासाठी पवित्र आणि पुण्यदायी आहे.
अभियंत्यांचे जननायक : गिते
सृष्टीचा निर्माता परमेश्वर हा खरंतर कुशल अभियंताच. त्याने साकारलेल्या भूमातेची सेवा करणारे अनेक अभियंते आज आपल्या आजूबाजूला दिसतात. पण, अतिशय सामान्य कुटुंबातून व्यथामय परिस्थितीत शिक्षण घेत आपल्या स्वानुभवातून अनेक विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे क्वचितच भेटतात. असे शंभर नंबरी सोन्यासारखे व्यक्तिमत्त्व आणि विविध स्पर्धा परीक्षांसाठी अनेकांना प्रेरणा देणारे वाकी खापरी धरणाचे अभियंता हरिभाऊ गिते यांनी अभियांत्रिकीच्या अनेक विषयांवर पैलू पाडून अनेक जिज्ञासू विद्यार्थ्यांसाठी ६० हून अधिक पुस्तके लिहिली आहेत.
राज्यातील तिन्ही सुप्रसिद्ध विद्यापीठांच्या अभ्यासक्रमांत त्यांच्या पुस्तकांचा समावेश आहे. नगर जिल्ह्यात संगमनेर तालुक्यातील सोनोशी हे हरिभाऊ गिते यांचे जन्मगाव. अत्यंत सामान्य कुटुंबातून शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे येथे अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. ते करत विद्यार्थी सहाय्यक समितीमध्ये ‘कमवा व शिका’ योजनेतून आपले शिक्षण पूर्ण करताना अनेकविध अडचणींचा त्यांनी कायम सामना केला.
खरंतर अभियंता बनणे काही सोपे काम नाही. किमान चार वर्षे, आठ सेमिस्टर, ४० विषय, ४०० प्रॅक्टिकल, ४००० असाईनमेंट आणि ४०,००० तास त्यासाठी द्यावे लागतात. हे करणे ज्याला जमले तो व्यक्ती म्हणजे अभियंता. अभियंता म्हणजे तो ज्याला जग बदलायचे आहे. अभियंता तो ज्याला नवीन वस्तू बनवायला आवडतात.
अभियंता म्हणजे तो ज्याला निरनिराळे शोध लावायला आवडतात. अभियंता म्हणजे तो ज्याला अशक्य काय ते माहीत नसते. असेच अशक्य ते शक्य करून दाखवणाऱ्या हरिभाऊ गिते यांनी इगतपुरी तालुक्यातील वाकी खापरी धरणाच्या निर्मितीत सहाय्यक अभियंता म्हणून मोलाची कामगिरी बजावली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.