सातपूर (जि. नाशिक) : शनिवारच्या सुटीची पर्वणी साधत आयमातर्फे डोंगरे वस्तीगृह मैदानावर आयोजित औद्योगिक प्रदर्शन बघण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली होती. दरम्यान हिरानंदानी ग्रुपचा औद्योगिक हब सिन्नर तालुक्यात येणार असे समजल्यानंतर राज्य आणि देशातील मान्यवर उद्योजकांनी या ग्रुपशी संपर्क साधून या हबमध्ये जागा देण्याची विनंती केल्याने प्रत्यक्षात तेथील गुंतवणूक 2 ते 3 हजार कोटींच्या घरात जाईल, असा अंदाज प्रदर्शनाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांनी व्यक्त केला.
उद्योजकांमध्ये आनंदाचे वातावरण
कोविडमुळे (Covid) गेली दोन वर्षे उद्योजक धास्तावला होता. त्यामुळे आयमातर्फे आयोजित या प्रदर्शनाला किती प्रतिसाद मिळतो याबाबत उद्योजक आणि आयोजकांमध्येही संभ्रमाचे वातावरण होते. परंतु गेल्या दोन दिवसांत प्रदर्शन बघण्यास झालेली तोबा गर्दी बघता उद्योजक आणि आयोजकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. हे प्रदर्शन आणखी दोन दिवस लोकांना बघण्यासाठी खुले असून आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या कंपन्यांची उत्पादने, नवोदित उद्योजकांचे नाविन्यपूर्ण कलाविष्कार बघण्याची संधी दवडू नका, असे आवाहन आयमाचे विद्यमान अध्यक्ष निखिल पांचाळ यांनी केले. दरम्यान लीग्रॅंड इंडिया, क्रॉम्प्टन, जिंदाल, एपिरॉक आदी नानाविध कंपन्यांचे प्रतिनिधी रविवारी (ता. 20) प्रदर्शनाला भेट देऊन B2B अंतर्गत उद्योजकांशी चर्चा करणार आहेत.
येत्या काही दिवसात गुंतवणुकीचे आणखी परस्पर सामंजस्याचे करार होणार असून त्याद्वारे नाशिककरांना रोजगाराच्या मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होतील असा विश्वास प्रदर्शनाचे चेअरमन धनंजय बेळे यांनी व्यक्त केला. हे प्रदर्शन म्हणजे राज्यातील इतर उद्योजकांसाठी आदर्शवत असेच आहे. आयमाच्या पुढाकाराने नाशकात मोठे प्रकल्प येत आहेत ही आनंददायी बाब असल्याचे ललित गांधी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. चेंबरतर्फे आयमाला आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासनही गांधी यांनी यावेळी दिले. त्यांच्यासमवेत चेंबरचे पदाधिकारी सुधाकर देशमुख, विजय बेदमुथा, आशिष नहार, उमेश वानखेडे, कैलास पाटील आदी होते. प्रदर्शनाला भेट देणाऱ्या अन्य मान्यवरांमध्ये निमाचे माजी अध्यक्ष मधुकर ब्राह्मणकर, सारस्वत बँकेचे रोहित भुजबळ, दामोदर देशपांडे तसेच अभिनव कोतवाल, भास्कर कोतवाल, नितीन कोतवाल आदींचा समावेश होता.
B2B अंतर्गत एबीबी, एचएएल, कमिन्स इंडिया (पुणे), टाटा टेक्नॉलॉजिस्ट(पुणे), सुला वाईन्स, एएसबी इंटरनॅशनल (मुंबई)च्या पर्चेस, आऊटसोर्सिंग, स्ट्रॅटेजिक सोर्सिंग आदी विंगच्या अधिकाऱ्यांनी प्रदर्शनाला भेट देऊन उद्योजकांच्या उत्पादनाचे आणि नाविन्यपूर्ण कलाविष्काराचे कौतुक केले. नाशकात इतक्या मोठ्याप्रमाणात दर्जेदार उत्पादन होत असल्याचे पाहून ते सर्व अचंबित झाले. नाशकातील दर्जेदार उत्पादने खरेदी करण्यासाठी तसेच त्यांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे अभिवचन त्यांनी दिले. सायंकाळी उद्योगदिंडीही काढण्यात आली. त्यालाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी, बीएसएनएलचे महासंचालक नितीन महाजन, एबीबीचे रवींद्र कोल्हे, कृषीकुमार जगताप, योगेश पोतदार, अतुल कुलकर्णी, एचएएलचे अतिरिक्त महाव्यवस्थापक सुभाष घारपुरे, मुख्य व्यवस्थापक प्रदीप शेटे, राजीव कुमार, जावेदअली, संजय कुमार, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय काटकर, प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी, एपिरॉकचे प्रकल्पप्रमुख अरविंद पाटील, शिरीष नागनाथ, आदींनी प्रदर्शनास भेट देऊन आयोजकांचे कौतुक केले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.