नाशिक : अगदी दहावी, बारावीपासून अन्य विविध शिक्षणक्रमांच्या परीक्षांना येत्या काही दिवसांत सुरवात होणार आहे. परीक्षा म्हटली, की अनेक विद्यार्थ्यांना दडपण येते. पण कुठल्याही स्वरूपाचा तणाव न घेता निखळ वातावरणात परीक्षेची तयारी सुरू ठेवावी.
तणाव जाणवल्यास पालक, शिक्षकांसोबत संवाद साधावा व अगदी अभ्यासात स्वतःला व्यस्त न करता रोज खेळण्यासाठी काही वेळ काढावा. पौष्टिक आहाराने आरोग्य चांगले राखावे, असा सल्ला मानसोपचारतज्ज्ञांनी दिला आहे. (Exam Stress Management Advice from Psychiatrists Stay focused and face exam nashik news)
स्पर्धेच्या युगात अधिकाधिक गुण मिळविण्याची स्पर्धा लागलेली बघायला मिळते. परंतु इतरांशी स्पर्धा करून जीवन तणावात आणण्यापेक्षा आपली सर्वोत्तम कामगिरी करण्यावर विद्यार्थ्यांनी भर दिल्यास अधिक चांगली कामगिरी करता येऊ शकते, असे जाणकारांचे म्हणणे आहे.
परीक्षा कालावधी म्हटला, की दिनचर्याच बदलून जाते. जास्तीत जास्त वेळ अभ्यास करण्याचा आग्रह अनेक पालकांकडून केला जातो. दडपण येण्याचे हे एक कारण ठरू शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
त्यामुळे इतर दिवसांप्रमाणे दिवसभरात छंद जोपासण्यासाठी, खेळण्यासाठीही वेळ दिला पाहिजे. परीक्षेची तयारी करताना, तसेच परीक्षा कालावधीत छोट्या छोट्या उपाययोजना करताना तणावाला विद्यार्थ्यांपासून दूर ठेवता येऊ शकते, असेही मानसोपचारतज्ज्ञांचे म्हणणे आहे.
हेही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?
विद्यार्थ्यांनो, हे करा, तणाव दूर ठेवा!
- दिनचर्या ठरवा, शक्यतो सकाळी लवकर उठून अभ्यास करा
- आपल्या मित्रांसोबत समूह चर्चा (ग्रुप डिस्कशन) करून विषयांची उजळणी करून घ्या
- एखाद्या विषयाची संकल्पना लक्षात आली नाही, तर शिक्षकांसोबत संवाद साधा
- अभ्यासाप्रमाणे छंद जोपासणे, खेळण्यासाठी वेळ द्या
- आपल्या पालकांसोबत संवाद साधताना काही अडचण असेल तर त्यांना सांगा
- मोबाईलचा वापर शक्य तितका कमी करावा
- परीक्षेत सर्व प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करा, मात्र दडपण घेऊ नका
- रोज ध्यान, योगसाधनेतून एकाग्रता वाढवा
- एखादा पेपर अवघड गेला, तर फार विचार न करता पुढील पेपरच्या तयारीवर लक्ष केंद्रित करा
- परीक्षा कालावधीत अभ्यासाचे योग्य नियोजन करा
- पौष्टिक आहार करताना आपले आरोग्य चांगले राखा
- पुरेशी झोप घेत मानसिक स्वास्थ्य चांगले ठेवा
पालकांनो, तुम्ही ही काळजी घ्या!
- जास्त गुण मिळविण्यासाठी पाल्यावर दडपण द्यायला नको
- दैनंदिन संवाद साधताना पाल्याच्या अडचणी जाणून घ्या
- अचानकपणे दिनचर्येत बदल करून, टीव्ही-मोबाईल पूर्ण बंद करून जास्तीत जास्त अभ्यासाचा आग्रह करू नका
- आपला पाल्य तणावात असल्याचे जाणवल्यास शिक्षक, मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घ्या
- पाल्याच्या मित्रांशी संपर्कात राहून त्यांच्याकडूनही माहिती जाणून घ्या
- परीक्षा कालावधीत प्रत्येक पेपरनंतर पाल्याला प्रोत्साहन द्या
- या कालावधीत घरी हसत-खेळत वातावरण राहील, याची खबरदारी घ्यावी
भगवद्गीतेतील दुसऱ्या अध्यायातील ४७ क्रमांकाचा श्लोक हा विद्यार्थी आणि परीक्षा या विषयावर समर्पक ठरतो. संस्कृतमधील हा श्लोक असा-
कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन।
मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि।।२.४७।।
अर्थात कर्तव्य-कर्म करणे, हाच तुमाच अधिकार आहे. फळ निश्चित करणे नव्हे. कर्मफळाचा हेतू ठेवू नये अन् अकर्मण्यतेची आसक्ति असू नये. परीक्षेशी संदर्भ द्यायचा झाला तर चांगला अभ्यास करणे आपल्या हाती असून, निकालाचा विचार करून अभ्यास करू नका.
"अधिक गुण मिळविण्याच्या स्पर्धेत विद्यार्थी परीक्षा कालावधीत तणावात येतात. परंतु अभ्यासाचे दडपण न घेता, संतुलित दिनचर्या राखत अभ्यासाचे नियोजन करावे. पालकांनीही पाल्यांशी सुसंवाद साधताना पोषक वातावरण निर्माण करावे. त्यांच्या मानसिक, शारीरिक आरोग्याची काळजी घ्यावी. याबाबत संघटनेतर्फे येत्या आठवड्यात ‘गाव तेथे मानसोपचार’ उपक्रमांतर्गत राज्यभरात शाळांमध्ये कार्यक्रम घेत, जनजागृती केली जाणार आहे."
- डॉ. उमेश नागापूरकर, पश्चिम विभाग अध्यक्ष, इंडियन सायकॅस्ट्रिक सोसायटी
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.