विकास गामणे : सकाळ वृत्तसेवा
Ashram School Teacher Exam : शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांपाठोपाठ आता शिक्षकांनाही परीक्षा द्यावी लागणार आहे. आदिवासी विकास विभागामार्फत आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी विशेष कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.
या कार्यक्रमांतर्गत आश्रमशाळा शिक्षकांची दर तीन महिन्यांतून परीक्षा घेण्याचा निर्णय आदिवासी विकास विभागाने घेतला आहे. येत्या १७ सप्टेंबरला ही परीक्षा घेण्याचे नियोजन असून, शिक्षकांना ही परीक्षा अनिवार्य करण्यात आली आहे. (Examination of teachers of tribal ashram school on 17th September nashik news)
ही परीक्षा अनिवार्य होणार असल्याने काही उपक्रमशील शिक्षकांनी याचे स्वागत, तर काही शिक्षक संघटनांनी विरोध केला आहे. परीक्षा घेतली जाणार असल्याने काहींचे धाबे दणाणले आहेत.
आदिवासी विकास विभागामार्फत नाशिक, ठाणे, अमरावती, नागपूर ही चार अपर आयुक्त कार्यालये आणि ३० प्रकल्प कार्यालये आहेत. त्याअंतर्गत ४९९ शासकीय आणि ५४६ अनुदानित आश्रमशाळा चालविल्या जातात.
सर्वच शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या दृष्टीने विविध उपक्रम राबविण्यासाठी विद्यार्थ्यांची अध्ययन पातळी समजून घेण्यासाठी व त्यावरील उपचारात्मक अध्ययन यासाठी आदिवासी विकास विभागाने सर्व शासकीय आणि अनुदानित आश्रमशाळेत शिकणाऱ्या पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांची २९ ऑगस्टला गणित आणि इंग्रजी विषयाची क्षमता चाचणी घेतली.
विद्यार्थ्यांच्या परीक्षेसोबतच त्यांना ज्ञानदानाचे काम देणाऱ्या शिक्षकांची परीक्षा विभागामार्फत घेतली जाणार आहे. विभागाच्या ४९९ शासकीय, ५४६ अनुदानित आश्रमशाळांमध्ये सुमारे दहा हजार ४८८ शिक्षक साडेचार लाख विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी आदिवासी विकास विभागाने योजना तयार केली.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
त्यानुसार शिक्षकांची गुणवत्ता तपासण्यासाठी दर तीन महिन्यांतून परीक्षा घेतली जाणार आहे. १०० गुणांची ही परीक्षा असणार असून, यात मुख्य विषयातील ७० टक्के प्रश्न, सामान्यज्ञान, चालू घडामोडीचे ३० टक्के प्रश्न असणार आहेत. दरम्यान, या परीक्षेच्या निकालान्वये शिक्षकांवर कोणत्याही प्रकारची प्रशासकीय कारवाई प्रस्तावित करण्यात येणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
क्षमता परीक्षा आयोजनाबाबतचा उद्देश
- शिक्षकांचे विषय ज्ञान वृद्धिंगत व्हावे, त्यांना स्वयंअध्ययनाची गोडी लागावी
- विषयज्ञान वृद्धिंगत करण्याची प्रेरणा मिळावी
- स्पर्धात्मक वातावरणात स्वतःची गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी निर्माण व्हावी
- विद्यार्थ्यांना चौफेर अद्ययावत ज्ञान देण्यासाठी शिक्षकांची क्षमता अधिक दृढ व विकसित व्हावी
- शिक्षकांच्या अध्यापनातील अडचणी जाणून घेणे व उपाययोजना करणे
- शिक्षकांना अद्ययावत विषयज्ञानाबाबत प्रशिक्षणाची आवश्यकता आहे की कसे व त्या अनुषंगाने कार्यवाही करणे
- उत्कृष्ट यश मिळवणाऱ्या शिक्षकांना गौरविणे व त्यांच्या कार्यपद्धतीचा इतर शिक्षकांसाठी अवलंब करण्याचे नियोजन करणे
ही आहे आश्रमशाळांतील शिक्षकांची संख्या
- राज्यात शासकीय आश्रमशाळांमध्ये तीन हजार १०९ प्राथमिक शिक्षक, तर एक हजार ९११ माध्यमिक शिक्षक
- अनुदानित आश्रमशाळेत तीन हजार ४१२ प्राथमिक शिक्षक, तर दोन हजार ५६ माध्यमिक शिक्षक
"शासकीय व अनुदानित आश्रमशाळांची गुणवत्ता वाढविण्याची महत्त्वाची जबाबदारी शिक्षकांवर असते. त्यामुळे शिक्षकांचे ज्ञान अद्ययावत असावे, या दृष्टीने परीक्षेच्या माध्यमातून तपासणी केली जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या हितासाठी शिक्षकांना या परीक्षा देणे अनिवार्य राहील." - नयना गुंडे, आयुक्त, आदिवासी विकास विभाग, नाशिक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.