Tomato Crisis : देशात गेल्या वर्षी दोन कोटी टनांहून अधिक उत्पादन झालेल्या टोमॅटोला उन्हाळ्यात दोन रुपये किलो भाव मिळाल्याने शेतकऱ्यांनी उत्पादनावर पाणी सोडले. आता पावसाला विलंब झाल्याने टोमॅटोची लागवड रेंगाळली आहे.
दुसरीकडे खरिपात लागवड केलेला टोमॅटो बाजारात येण्यासाठी आणखी किमान महिनाभराचा कालावधी अपेक्षित आहे. त्यामुळे या काळात ग्राहकांना चढ्या भावाने टोमॅटोची खरेदी करण्याखेरीज पर्याय उरणार नाही. विशेष म्हणजे ग्राहकांसाठी तरी टोमॅटो कुठून येणार, हाही प्रश्नच आहे. (expected to take at least another month for tomato grown in Kharif to reach market nashik news)
नारायणगावच्या बाजारात गत वर्षात महिन्याला एक ते दीड लाख क्रेटभर टोमॅटोची आवक व्हायची. ती आता १५ हजार ते २० हजार क्रेटपर्यंत कमी झाली आहे. नाशिकमध्ये २० किलो वजनाची एक अशा पाच ते सहा हजार जाळ्या टोमॅटोच्या दिवसाला यायच्या. सोलापूर, लातूरमध्ये नवीन टोमॅटोची लागवड ४० टक्क्यांपर्यंत झाल्याची माहिती व्यापाऱ्यांपर्यंत पोचली आहे.
टोमॅटोचे आगार असलेल्या नाशिक जिल्ह्यात गेल्या वर्षीच्या खरिपात १९ हजार हेक्टरवर टोमॅटोची लागवड झाली होती. ती यंदा आतापर्यंत १० हजार ५०० हेक्टरपर्यंत पोचली आहे. उन्हाच्या तडाख्यामुळे टोमॅटोची लागवड होऊ शकली नव्हती. २५ जूनपासून लागवडीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे टोमॅटोसाठी प्रतीक्षा करावी लागेल.
सध्या भाव दोनशेवर
नाशिकमध्ये २० किलोच्या जाळीला शेतकऱ्यांना दोन हजार ते दोन हजार २०० रुपयांपर्यंत भाव मिळतो. प्रत्यक्षात ग्राहकांना किलोला २०० रुपये देऊन टोमॅटो खरेदी करावा लागत आहे. नारायणगाव, अकोले, संगमनेर भागात मार्चपासून लागवड होते आणि मेमध्ये टोमॅटो बाजारात येण्यास सुरुवात होते. त्यावेळी किलोला दीड ते दोन रुपये असा भाव शेतकऱ्यांना मिळाल्याने उत्पादन घेणे थांबविले होते.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
टोमॅटोच नाही, मग खरेदी कशी?
केंद्रीय ग्राहक व्यवहार विभागाने दिल्लीसह राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील ग्राहकांना टोमॅटो सवलतीच्या दरात मिळण्यासाठी आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्रातील बाजारातून टोमॅटो खरेदीचे निर्देश दिले आहेत. ‘नाफेड’ आणि राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघातर्फे ही खरेदी केली जाईल.
त्याची सुरवात आजपासून अपेक्षित होती. पण, बाजारात टोमॅटो उपलब्ध नसल्याने केंद्र सरकार कोठून टोमॅटो खरेदी करणार? असा प्रश्न स्थानिक व्यापाऱ्यांमधून उपस्थित होत आहे. दुसरीकडे टोमॅटोचे दर पाडण्यासाठी केंद्र सरकारचा एकतर्फी हस्तक्षेप निषेधार्ह असल्याची टीका किसान सभेने केली.
तेव्हा मदत का नाही केली?
दोन महिन्यांपूर्वी टोमॅटोचे अतिरिक्त उत्पादन झाल्याने शेतकऱ्यांना टोमॅटो मातीमोल भावाने विकावे लागले. टोमॅटो तोडण्याचा व वाहतुकीचा खर्च निघत नसल्याने शेतकऱ्यांनी टोमॅटो रस्त्याच्या कडेला फेकून दिला. शेतकरी अडचणीत असताना केंद्र सरकारला शेतकऱ्यांना मदत करण्याची इच्छा झाली नाही, असेही किसान सभेचे डॉ. अजित नवले यांनी म्हटले.
प्रक्रियायुक्त टोमॅटो हा पर्याय
देशात मे ते सप्टेंबरपर्यंत टोमॅटोचे उत्पादन कमी होते. थंडीत उत्पादन अधिक होत असल्याने देशाच्या बहुतांश भागात ऑक्टोबर ते मार्च असा टोमॅटोचा काळ आहे. त्यामुळे या कालावधीत विकत घेतलेल्या टोमॅटोची प्रक्रिया उद्योगात पेस्ट केली जात असल्याने टोमॅटोच्या भाववाढीचा प्रक्रिया उद्योगावर परिणाम होणार नाही, असे सांगून सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष विलास शिंदे म्हणाले, की देशात नाशिक परिसरात दिवसाला अडीच हजार टन, तमिळनाडू- आंध्र प्रदेश- कर्नाटकच्या सीमावर्ती जिल्ह्यात दिवसाला साडेतीन हजार टन, पंजाब व परिसरात दिवसाला दीड हजार टन टोमॅटो प्रक्रिया उद्योगासाठी लागतो.
म्हणजेच काय, तर उत्पादन आणि प्रक्रिया उद्योगासाठी उपयोगाचे प्रमाण अडीच टक्क्यांपर्यंत आहे. त्यामुळे टोमॅटोच्या भावाचा प्रश्न मार्गी लागत असताना शेतकऱ्यांना पैसे मिळण्यासाठी प्रक्रियायुक्त टोमॅटोवर लक्ष द्यावे लागेल. परदेशात चार किलो टोमॅटोपासून तयार केलेला एक किलो आर्क (प्युरी), सोललेला कॅनमधील टोमॅटो, सात किलो टोमॅटोपासून तयार केलेली एक किलो पेस्ट वर्षभर उपलब्ध असते. त्या दिशेने आता विचार व्हायला हवा.
"नाशिकमधून गुजरात, राजस्थान, मुंबईत टोमॅटो विक्रीसाठी पाठविला जातो. वीस किलोमध्ये दोन ते तीन किलो टोमॅटो प्रत्यक्ष ग्राहकांपर्यंत पोचेपर्यंत खराब होतात. तसेच, आताच्या परिस्थितीत दिवसाला चार ते पाच ट्रकभर टोमॅटो विक्रीसाठी पाठविणाऱ्या व्यापाऱ्यांना एकत्र येऊन ट्रक भरावा लागतो. त्यामुळे नाफेड अथवा ग्राहक महासंघाने टोमॅटो खरेदी करताना ट्रकभर टोमॅटो उपलब्ध व्हायला हवा. तेवढा टोमॅटो कसा उपलब्ध होईल, असा प्रश्न आहे." - राजेश म्हैसधुणे, टोमॅटोचे व्यापारी, नाशिक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.