लखमापूर (जि. नाशिक) : दिंडोरी तालुक्यात रासायनिक खताच्या (Chemical Fertilizer) टंचाईनंतर (scarcity) सध्या तालुक्यात बऱ्याशा प्रमाणात रासायनिक खताचा पुरवठा उपलब्ध झाला आहे. असे असले तरी काही रासायनिक खताच्या कंपन्यांकडून या खतावर मोठ्या प्रमाणात लिंकिंग (Linking) होत आहे. यामुळे शेतकरी वर्गामध्ये नाराजी पसरली आहे. त्यांना नाहक आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असून तालुक्यातील कृषी विभागाने (Agriculture Department) त्वरित लक्ष देण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे. कृषी विभागाने याबाबत केलेली घोषणा हवेतच विरली आहे. (Farmer harassment linking of chemical fertilizer in Dindori taluka Nashik News)
सध्या तालुक्यात खरीप हंगामाची पूर्वतयारी जवळजवळ पूर्ण झाली असून खरिपाच्या तोंडावर नामांकीत खत कंपन्यांकडून २४.२४.०, १८.४६.०, १०.२६.२६ अशा महत्त्वाच्या खतांवर ४०० ते ५०० रुपयाचे इतर खते दिली जात आहेत. यामुळे १९०० रुपयाच्या रासायनिक खताची ४० किलो वजनाची गोणी २४०० रुपयांना पडत असल्यामुळे शेतकरी वर्गाची आर्थिक पिळवणूक खत कंपन्यांकडून होत असल्याचे समोर येत आहे.
कृषी केंद्रामध्ये रासायनिक खते खरेदी करताना दुकानदार कंपनीने इतर खते विकण्याची आम्हाला सक्ती केली असून या खतावर हे ४०० किंवा ५०० रुपयाचे खत घ्यावेच लागेल असे सांगितले जात आहे, त्यामुळे हा बळजबरीचा सौदा कंपनी करत असताना कृषी विभाग गप्प का बसला आहे? की त्यांचे तोंड कंपनीने बंद करून टाकले आहे, अशा संतापजनक प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.
सर्व पिकांच्या वाढीसाठी तसेच फुगवणीसाठी रासायनिक खत शेतकरी वर्गाला घ्यावेच लागते, त्यात रासायनिक खताच्या किमतीत मोठ्या प्रमाणात झालेली वाढ यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. विशेष म्हणजे सर्व पिकाला शासनाचा शाश्वत हमीभाव नसल्यामुळे कायमच बळीराजाची निराशा होत आहे. रासायनिक खताची टंचाई निर्माण झाल्यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले आहे. सध्या तालुक्यातील अनेक शेतकरी सेंद्रीय शेतीकडे वळाले असले तरी १००% सेंद्रीय शेती असून यशस्वी झाल्याचे दिसून येत नाही, त्यामुळे रासायनिक खताशिवाय उत्पादन वाढू शकत नाही असे अनेक प्रयोगशील शेतकरी वर्गाचे म्हणणे आहे.
रासायनिक खतांच्या टंचाई व लिंकिंग बाबतीत बळीराजाला 'तोंड बांधून मुक्याचा मार, या म्हणीचा प्रत्यय येत आहे. तक्रार करावी तर दुकानदार आपल्याला खत देणार नाही, त्यामुळे शेतकरी हे सर्व लिंकिंगचे वाढलेले प्रमाण सहन करीत आहे. या लिंकिंगला नेमके कोण जबाबदार असा प्रश्न पडला आहे. या सर्व प्रकाराबाबत तालुक्यात कृषी विभागाने बघ्याची भूमिका न घेत रासायनिक खताच्या लिंकिंगची चौकशी करून शेतकरी वर्गाला न्याय द्यावा आशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.
"दिंडोरी तालुक्यात सध्या रासायनिक खतांच्या खरेदीवर लिंकिंगचे प्रमाण वाढत आहे. शेतकरी वर्गाला आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. गरज नसताना इतर खते व औषधे खरेदी करावी लागत आहे. आधीच शेतकरी कर्जबाजारी झाले असून त्यात रासायनिक खताची टंचाई व लिंकिंगची भर पडत आहे. कृषी विभागाने त्वरित चौकाशी करून रासायनिक खतावरील इतर खताची व औषधाची सक्ती थांबवावी." - संदीप बर्डे, शेतकरी,ओझे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.