नाशिक : देशातील साखर कारखानदारीची इथेनॉल निर्मितीची ४५० कोटी लिटर्सची क्षमता असून २०२०-२१ मध्ये ३०२ कोटी लिटर्सची निर्मिती झाली. पेट्रोलमध्ये ८.१ टक्के इथेनॉल मिसळण्याच्या केंद्राच्या निर्णयाचा विचार करता, देशातील शेतकरी ४० हजार कोटींच्या इंधनाचे उत्पादक ठरलेत. देशाच्या उत्पादनात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा २६ टक्के हिस्सा राहिला. साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी ‘सकाळ'ला दिलेल्या माहितीनुसार यंदा निविदा जारी झाल्या असून ८६ कोटी लिटर्स इथेनॉलचे उत्पादन अपेक्षित आहे.
राज्यातील ४५ कारखान्यांना डिस्टलरीसाठी यंदा परवानगी दिली आहे. डिस्टलरीची उभारणी होऊन प्रत्यक्ष उत्पादनाला एक वर्षाचा कालावधी अपेक्षित आहे. नव्याने उभारल्या जाणाऱ्या डिस्टलरीमधून आणखी ४० कोटी लिटर्स इथेनॉलचे उत्पादन होणार आहे, असेही श्री. गायकवाड यांनी सांगितले. ते म्हणाले, की २०१९-२० मध्ये १८ कोटी इथेनॉलचे उत्पादन झाले होते. गेल्यावर्षी ७९ कोटी लिटर्स इथेनॉलचे उत्पादन झाले. यंदा ७८ डिस्टलरी प्रकल्पांमधून ८६ कोटी लिटर्स इथेनॉलचे होणार आहे. ही सारी आकडेवारी पाहता, महाराष्ट्राने इथेनॉलच्या उत्पादनात मोठी झेप घेतल्याचे दिसून येते.
उत्तरप्रदेशला करणार ‘ओव्हरटेक'
देशात उत्तरप्रदेशातील मोठ्याप्रमाणातील कारखानदारीमुळे या राज्यातून ११० कोटी लिटर्स इथेनॉलचे उत्पादन केले जाते. महाराष्ट्रातील नव्या डिस्टलरी कार्यान्वित होताच, महाराष्ट्र इथेनॉल उत्पादनात उत्तर प्रदेशाला ‘ओव्हरटेक' करेल. कर्नाटकमध्ये ४० कोटी लिटर्स इथेनॉलचे उत्पादन केले जाते. यंदा पेट्रोलमध्ये १० टक्के इथेनॉल मिसळले जाणार आहे. २०२३ पर्यंत पेट्रोलमध्ये मिसळावयाच्या इथेनॉलचे प्रमाण २० टक्क्यांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट केंद्र सरकारने ठेवले आहे.
ब्राझील पॅटर्नचा अवलंब
बाजारात काय खपते त्याप्रमाणे उत्पादन करायचा हा ब्राझील पॅटर्न आहे. त्याचा अवलंब राज्यातील साखर कारखानदारीत केला जाणार आहे. बाजारातील साखरेचा किलोचा भाव ३९ रुपयांच्या पुढे गेल्यास साखरेचे उत्पादन करायचे. त्यापेक्षा कमी भावाने साखर विकली जात असताना इथेनॉल उत्पादन करायचे, अशी माहिती श्री. गायकवाड यांनी दिली. गेल्यावर्षी देशातील उसाचे गाळप कमी झाल्याने इथेनॉलचे उत्पादन क्षमतेपेक्षा कमी झाल्याचे दिसते. यंदा मात्र उसाचे उत्पादन मोठ्याप्रमाणात असून गाळप चांगले होईल आणि इथेनॉल उत्पादन वाढीसाठी मदत होईल, असे अभ्यासकांचे म्हणणे आहे.
इथेनॉलचे विक्रीचे दर
(आकडे लिटरचे)
मळीपासून उत्पादन- ४६ रुपये ६६ पैसे
रसापासून थेट उत्पादन-६३ रुपये ४५ पैसे
साखरेचा अंश असलेले उत्पादन-५९ रुपये ८ पैसे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.