नाशिक : शेतकऱ्यांनी बंद पाडले 'समृद्धी'च्या संरक्षक भिंतीचे काम

Samruddhi Highway
Samruddhi Highway
Updated on

सिन्नर (जि. नाशिक) : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचे (Mumbai-Nagpur Samruddhi Highway) काम अंतिम टप्प्यात आले आहे. या मागमार्गासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने संपादित केलेल्या जागेत संरक्षक भिंती उभारण्याचे काम सध्या सुरू असून या कामाला सिन्नर तालुक्यातील दुशिंगपूर व कहांडळवाडी येथील शेतकर्‍यांनी विरोध दर्शवला आहे.

समृद्धी महामार्गलगत असलेल्या शेतांमध्ये जाण्यासाठी कायमस्वरूपी रस्ता हवा अशी मागणी करत शेतकऱ्यांनी दुशिंगपूर पाझर तलाव क्षेत्रात ठेकेदाराची वाहने अडवत आज (दि.12) सकाळपासून आंदोलन सुरू केले. शासनाकडून कार्यवाही होत नाही तोपर्यंत उपोषण करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील सर्वात मोठा असलेल्या दुशिंगपूर येथील पाझर तलावाच्या मध्यातून समृद्धी महामार्ग बांधण्यात आला आहे. तलावात येणाऱ्या नाल्यावर असलेल्या पुलाखेरीज संपूर्ण क्षेत्रात मातीचा भराव घालून मार्गाची उंची वाढवण्यात आल्याने दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांचा जाण्या-येण्याचा मार्ग बंद झाला आहे. त्यातच मार्गाच्या दुतर्फा असलेल्या संरक्षक भिंतींमुळे शेतकऱ्यांच्या अडचणीमध्ये आणखीनच वाढ झाली आहे. महामार्गाचे बांधकाम झाल्यानंतर ठेकेदाराकडून मार्गाच्या दोन्ही बाजूंनी दहा फूट उंचीची सिमेंटची भिंत उभारण्यात येत असून संतप्त शेतकऱ्यांनी प्रशासनाला आश्वासनाचा विसर पडल्याचे सांगत ठेकेदाराची वाहने अडवून भिंतीच्या बांधकामाला हरकत घेतली.

आम्हाला शेतात येण्यासाठी पुर्वापार वापरत असलेले रस्ते द्यावेत. हे शक्य नसल्यास पाझर तलावात दोन ठिकाणी स्वतंत्र अंडरपास द्यावेत अशी मागणी शेतकरी गेल्या दोन वर्षांपासून करत आहेत. मात्र, शाब्दिक आश्वासनेच पदरात पडत आहेत. यामुळे शेतीमाल वाहतूक व अन्य दळणवळण बाधीत होणार असल्याचे या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

Samruddhi Highway
नाशिक : ऑक्सिजन टाक्यांमधील ठणठणाट होणार दूर

दहा फुटी सर्विस रोडचे काय ?

समृद्धीच्या दोन्ही बाजूंनी शासनाने संपादित केलेल्या जागेत दहा फुटांचा सर्विस रोड बनविण्यात येणार असल्याचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी यापूर्वी सांगितले आहे. हा रस्ता झाला तर समृद्धी लगतच्या शेतकर्‍यांच्या दळणवळणाचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघणार आहे. मात्र, याबाबत कोणतीही कार्यवाही ठेकेदार अथवा प्रशासकीय यंत्रणेकडून अद्याप सुरू झालेली नाही. आमदारांनी सांगितले म्हणून समृद्धीच्या कामाला असणारा शेतकऱ्यांचा विरोध कमी झाला होता. मात्र, सर्व्हिस रोड बाबत प्रश्नचिन्ह असल्याने शेतकरी पुन्हा आक्रमक होण्याची शक्यता आहे.

Samruddhi Highway
नाशिक कृषी घोटाळा,कृषी विभागातील 3 संशयितांना बेड्या; पाहा व्हिडिओ

समृद्धीच्या जागेत आंदोलन चुकीचे

रस्ते विकास महामंडळाने शेतकऱ्यांकडून संपादित केलेल्या जागेचा पूर्ण मोबदला दिला आहे. त्यामुळे संपादित क्षेत्रावर शेतकऱ्यांचा कोणताही हक्क नाही. तेथे आंदोलन करून अथवा ठेकेदाराची अडवणूक करून कोणताही तोडगा निघणार नाही. ज्या ठिकाणी रेकॉर्डवर रस्ते आहेत तिथे यापूर्वीच जागा सोडण्यात आली आहे. संबंधित शेतकऱ्यांना देखील याबाबत वारंवार सांगण्यात आले आहे. सर्व्हिस रोड अथवा स्थानिकांना देण्यात येणाऱ्या इतर सुविधांबाबत शासनाकडून कोणतीही सुचना नसल्याने त्याबाबत बोलता येणार नाही, असे रस्ते विकास महामंडळाच्या एका अधिकाऱ्याने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितले.

दत्ता पवार, अंकुश पवार, रामनाथ पवार, भास्कर कहांडळ, दत्तू कहांडळ, विलास कहांडळ, महेश गोराणे, आनंद गोराणे, नारायण गोराणे, यशवंत घेगडमल, सिताबाई मेहेरखांब, आण्णा कहांडळ, बाळू कहांडळ, गंगाधर कहांडळ या शेतकऱ्यांनी समृद्धीच्या दोन्ही बाजूने शेती असलेल्या क्षेत्रात जाण्या-येण्यासाठी कायमस्वरूपी रस्त्याची मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.