Chandwad Accident News : मुंबई-आग्रा महामार्गावरील चांदवडजवळ राहुड घाटात एस. टी. महामंडळाच्या जळगाव-वसई बसचा मंगळवारी (ता. ३०) सकाळी साडेनऊच्या सुमारास अपघात झाला. या अपघातात चार जणांचा मृत्यू, तर ३१ जण जखमी झाले. यातील नऊ प्रवाशांची प्रकृती चिंताजनक आहे. ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन व आमदार डॉ. राहुल आहेर यांनी चांदवड येथील उपजिल्हा रुग्णालयात भेट देऊन जखमींची विचारपूस केली. अपघातातील मृतांच्या वारसास दहा लाख रुपये, अत्यवस्थ जखमींना पाच लाख रुपये व किरकोळ जखमींना अडीच लाख रुपये मदत देखील जाहीर केली.
जळगावहून वसई येथे जाणाऱ्या वसई आगाराची बस (एमएच १४, केक्यू ३६३१) ही चांदवडजवळील देवी मंदिराजवळील हॉटेल ग्रीन व्हॅलीजवळ आली असता, ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या नादात हा अपघात झाला. या अपघातात बसचा वाहकाकडील अर्धा भाग अक्षरशः पूर्णपणे कापला गेला होता.
याच बाजूने पुढे बसलेल्या प्रवाशांना अपघातात आपला जीव गमवावा लागला. अपघातावेळी मोठा आवाज झाल्याने अनेकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढले. घटनास्थळी जखमींचा आक्रोश, रक्ताचा सडा व रस्त्यावर पडलेले प्रवासी इतकं भयावह चित्र होते.
अपघाताचे वृत्त समजताच घटनास्थळी अपर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती, उपअधीक्षक बाजीराव महाजन, पोलिस निरीक्षक कैलास वाघ व कर्मचारी शेवटच्या प्रवाशाला मदत होईपर्यंत उपस्थित होते. सोमा कंपनीचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी आले. जखमींना चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.
अत्यवस्थांना नाशिक, पिंपळगाव व मालेगाव येथील रुग्णालयांत पाठविण्यात आले. बसमध्ये ४५ प्रवासी प्रवास करत होते. त्यापैकी ३५ व्यक्तींना दुखापत झाली आहे. यापैकी आठ ते नऊ प्रवासी गंभीर असून, दोन पुरुष, एक अल्पवयीन मुलगा व एक महिला, अशा चार जणांचा मृत्यू झाला आहे. अजूनही काही जखमींची परिस्थिती गंभीर असल्याचे सांगण्यात आले.
यामुळे या अपघातातील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. अपघातावेळी चांदवडच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली. मिळेल त्या वाहनाने जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यासाठी धावपळ करीत होते. उपजिल्हा रुग्णालयात मृतांचे नातेवाईक व जखमींच्या नातेवाइकांचा आक्रोश ह्रदय पिळवटून टाकणारा होता. (Latest Marathi News)
अपघातातील मृतांची नावे
खालिदा गुलाम हुसेन (वय ६०, रा. दर्गा रोड, भोईवाडा पोलिस ठाणे चाळ, भिवंडी), सुरेश तुकाराम सावंत (२८, रा. डोंगरगाव, ता. देवळा), साईल संजय देवरे (१४, रा. उमराणे), बळिराम सोनू अहिरे (६४, रा. शांतिवन कॉलनी, नाशिक).
बस अपघातातील जखमी
कैलास रामदास देवरे (वय ४५, रा. उमराणे), मयूरी कैलास देवरे (२७, उमराणे), केशरबाई नानू चव्हाण (७०, रा. डहाणू), रीना रोशन पवार (२०, सौंदाणे), सुलोचना सुरेश चौधरी (५८, पारोळा), आशा रघुनाथ हिरे (३८, पवन नगर, नाशिक), सीमा दत्तू सोनवणे (२१, दहिवड), अरुण हरी ओतारी (४८, एरंडोल), ईश्वर गिरिधर ओवतारी (५५, एरंडोल),
समाधान गोविंद देवरे (४५, उमराणे), धनसिंग बाबूराव पाटील (६५, जळगाव), सुरेश नंदलाल नंदे (६५, एरंडोल), मनस्वी महेश चव्हाण ( ७, नागझिरी), राणी महेश चव्हाण (२०, नागझिरी), संतोष कृष्णराव गरवारे (३८,अकोला), संजय देवरे (४८, उमराणे), मेठाबाई वाल्मीक पवार (७५, जळकू),
राजेश मदन वाघ (४२, अमळनेर), श्याम प्रभाकर शिरपुरे (५०, मालेगाव), वैशाली विश्वनाथ अहिरे (५०, अजंग वडेल, मालेगाव), शैलेश शिवाजी सूर्यवंशी ( बसचालक, वय ३८, मालेगाव), वाल्मीक दत्तू पवार (८०, जळकू), लीलाबाई उखा पवार (७५, रामनगर), अंकुश उखा पवार (४०, रामनगर), विनोद पोपट शिंदे (४२, जेऊर मालेगाव). अजूनही काही प्रवासी जखमी झाले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.