Nashik News : अप्पर वैतरणा -कडवा -देव नदी लिंक या महत्वकांक्षी नदीजोड प्रकल्पाचा अंतिम अहवाल तयार झाला आहे. राष्ट्रीय जल विकास प्राधिकरण (NWDA) ने सदरचा अहवाल नुकताच राज्य शासनाकडे सादर केला आहे.
सुमारे साडे सात हजार कोटीच्या या प्रकल्पामुळे सिन्नर तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचा, शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याचा तसेच भविष्यात दिल्ली - मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडोअरसाठी लागणाऱ्या पाण्याचा प्रश्न कायमचा निकाली निघणार आहे.
दुष्काळी तालुका हा सिन्नर तालुक्याच्या माथी लागलेला कलंक यामुळे कायमचा पुसला जाणार असल्याची माहीती खासदार हेमंत गोडसे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे. (final report of river linking project of Upper Vaitarna Kadwa Deva River Link is prepared nashik news)
सिन्नर तालुका हा सातशे मीटर उंचीवर असून वर्षानुवर्षे दुष्काळी तालुका म्हणुन प्रसिद्ध आहे. तालुक्यात सततच भीषण पाणी टंचाई असते. पाणी टंचाईचा हा प्रश्न कायमचा निकाली निघावा यासाठी सिन्नर तालुक्यातील विविध पक्षांच्या आणि सामाजिक कार्यकत्यांच्या शिष्ट मंडळांनी खा. गोडसे यांची भेट घेत त्यांना साकडे घातले होते.
यातुनच खा. गोडसे यांनी सिन्नर तालुक्यातील दुष्काळ हटविण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून शासन दरबारी प्रयत्न सुरू केले होते. वैतरणा खाडीतुन समुद्रात वाहून जाणारे पाणी अडवुन ते गोदावरी खोऱ्यात टाकल्यास सिन्नर तालुक्यासाठी साडे सहा टीएमसी पाणी उपलब्ध होवु शकेल हे खा. गोडसे यांनी जलचिंतन संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र जाधव यांच्या सहकार्याने राज्य शासनाच्या वेळोवेळी निदर्शनास आणून दिले.
पाठपुरावा करत शासनाला प्रस्तावित अप्पर वैतरणा - कडवा - देवनदी लिंक नदीजोड प्रकल्पाचे सर्वेक्षण आणि डिपीआर तयार करण्यास भाग पाडले. सदर प्रकल्पाचा डिपीआर सहा महिन्याच्या विक्रमी वेळेत पुर्ण केला असून त्यासाठी 23 कोटी रूपये निधी शासनाकडुन मंजुर करून घेतला होता.
अप्पर वैतरणा- कडवा - देवलिंक या नदीजोड प्रकल्पाचा डिपीआर तयार करण्याची जबाबदारी शासनाने नॅशनल वॉटर डेव्हलपमेंट अॅथोरिटी (NWDA) या कंपनीकडे सोपविली होती. सदर कंपनीकडुन प्रकल्पाचा डिपीआर तयार करण्याचे काम नुकतेच पुर्ण झाले आहे. हा अंतिम अहवाल शासनाला सादर केला असून प्रकल्पाची किंमत सुमारे साडे सात हजार कोटी इतकी असणार आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
या प्रकल्पाचा फायदा सिन्नरसह निफाड तालुक्यालाही हेणार आहे. या प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या साडे सहा टिएमसी पाण्यापैकी 61.62 दलघमी पाणी सिंचन क्षेत्रासाठी, 24 दलघमी पाणी पिण्याच्या वापरासाठी, 40 दलघमी पाणी देव नदीत सोडुन सिंचन क्षेत्राच्या पुनर्स्थापनेसाठी उपयोगात येणार आहे.
तसेच नाशिक जिल्ह्यातील दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरीडॉरच्या प्रकल्पासाठी 23.75 दलघमी पाण्याची तरतुद करण्यात आली असल्याची माहिती खासदार गोडसे यांनी पत्रकार परिषदेत दिली. जलचिंतन संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र जाधव हे देखील पत्रकार परिषदेसाठी उपस्थित होते उपस्थित होते.
या नदीजोड प्रकल्पामुळे एकट्या सिन्नर तालुक्यासाठी तब्बल साडे सहा टीएमसी पाणी उपलब्ध होणार आहे . त्यामुळे तालुक्याचा दुष्काळी तालुका हा कलंक कायमचाच पुसला जाणार असल्याचे खा. गोडसे यांनी स्पष्ट केले.
सदर नदीजोड प्रकल्पाच्या अंतिम अहवालास तातडीने प्रशासकीय मान्यता देऊन प्रकल्प उभारणीसाठी निधीच्या तरतुदीसाठी आपण लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची माहीती खा. गोडसे यांनी दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.