पिंपळगाव बसवंत : निफाड तालुक्यातील पालखेड ग्रामपंचायतीची पंचवार्षिक, तर आठ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे.
अर्ज भरण्याचा शुक्रवारी (ता. १८) अखेरचा दिवस आहे. कार्यकर्त्यांनी नेत्यांकडे उमेदवारीसाठी जोर-बैठका सुरू केल्या आहेत.
पालखेडमध्ये तरुणाईने संघर्ष ग्रुपची स्थापना करून बंडाचा झेंडा हाती घेत उचल खाल्ली आहे. नेत्यांनी सावध पवित्रा घेतला असून, गावगाड्यातील राजकारण चांगलेच तापले आहे.
मौजे सुकेणे, जिव्हाळे येथे सरपंचपदाची पोटनिवडणूक होत आहे. ग्रामपंचायत निवडणुकीचा ज्वर सोशल मीडियावर चढला आहे. (Flag of rebellion from youth in Gram Panchayat Election Establishment of Sangharsh Group nashik)
पालखेडची ग्रामपंचायत निवडणूक चुरशीची होत असल्याचा आजपर्यंतचा इतिहास आहे. तीच स्थिती यंदाही दिसत आहे. ५ नोव्हेंबरला मतदान होणार असून, राजकीय हालचालींना वेग आला आहे.
गावचे राजकारण रंगात येत असून, इच्छुकांनी गुडघ्याला बांशिग बांधले आहे. पालखेडमध्ये १५ सदस्यांच्या जागांसाठी ५० हून अधिक जण इच्छुक आहेत.
त्यामुळे येथे तिरंगी लढत मानली जात आहे. पिंपळगाव बाजार समितीचे माजी संचालक बाबासाहेब शिंदे, भाऊसाहेब थेटे यांच्या पॅनलविरुद्ध पंचायत समितीचे माजी सभापती पंडित आहेर, राजाभाऊ थेटे अशी राष्ट्रवादी काँग्रेसविरुद्ध शिवसेनेत सरळ लढत होईल, असे मानले जात होते.
संधी न मिळाल्यास तरुणांनी रिंगणात उडी घेण्याचे मनसुबे स्पष्ट केले आहेत. नाना थेटे यांनी युवकांचा संघर्ष पॅनल उभारणीच्या हालचाली सुरू केल्याचे समजते.
प्रस्थापित नेतेमंडळी व तरुणांचा गट यांच्यात तिरंगी लढत पालखेड ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत रंगणार असल्याचे दिसते. विकासाच्या मुद्द्यासह नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचा मुद्दा तापला आहे.
दरम्यान, इच्छुकांनी थेट प्रचाराला प्रारंभ केला आहे. अर्ज दाखल करण्यास शुक्रवारी अखेरचा दिवस असून, माघारीनंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल.
उमेदवारीवरून मात्र कार्यकर्त्यांमध्ये रस्सीखेच सुरू असून, जोर-बैठका सुरू झाल्या आहेत. नेतेमंडळी मात्र नात्यातील व जवळच्या कार्यकर्त्याला उमेदवारीसाठी आग्रही आहेत.
दरम्यान, जिव्हाळे येथील थेट सरपंचपदासाठी सर्वसाधारण महिलेचे आरक्षण असून, नारीशक्तीमध्ये लढत रंगणार आहे. ‘सौ’साठी ‘श्री’ची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.
मौजे सुकेणे येथे अनुसूचित जातीसाठी सरपंचपद आरक्षित असल्याने उमेदवारांपेक्षा गटाच्या नेत्यांचा अधिक कस लागणार आहे. भेंडाळी, देवपूर, हनुमाननगर, कुरुडगाव, शिंपी टाकळी, नारायण टेंभी, थेटाळे येथे सदस्यांची पोटनिवडणूक होत आहे.
अर्ज भरण्याची वेबसाइट ‘स्लो मोशन’वर
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ऑनलाइन अर्ज भरताना वेबसाइट संथगतीने काम करीत असल्याने इच्छुकांचा जीव टांगणीला लागला आहे. वेबसाइट स्लो मोशनवर असल्याने भावी गावपुढाऱ्यांची कसरत होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.