मालेगाव (जि. नाशिक) : आदिमाया सप्तशृंगीदेवीच्या चैत्रोत्सवासाठी जाणाऱ्या शिरपूर येथील मानाच्या रथाचे मालेगावकरांनी जोरदार स्वागत केले. येथील कुल जमाती तंजीमतर्फे मुस्लिम बांधवांनी रथावर पुष्पवृष्टी केली. पायी यात्रेकरूंचे जथे शहराच्या मध्यातून जातात.
दरेगाव ते मोसम पुलापर्यंत ठिकठिकाणी मुस्लिम बांधवांनी पाणी, सरबतचे वाटप करत भाविकांचे स्वागत केले. मानाच्या रथावर व भाविकांच्या अंगावर गुलाबाच्या फुलाच्या पाकळ्या टाकून स्वागत करण्यात आले.
या उपक्रमाचे राज्यभर कौतुक केले जात असून, मालेगावातील राष्ट्रीय एकात्मता व भाईचारा अधिक वृद्धिंगत होण्यास मदत झाली आहे. (Flowers showered on chariot of ram ratha by Muslim brothers at Malegaon Nashik News)
मालेगाव हे अतिसंवेदनशील शहर म्हणून ओळखले जाते. बाँबस्फोट, दंगलीचे शहर अशी प्रतिमा तयार झाली होती. गेल्या वीस वर्षांपासून मालेगावने शांततेची कूस घेतली आहे. हिंदू-मुस्लिम दोन्ही समाज हातात हात धरून एकमेकांचे सण-उत्सव गुण्यागोविंदाने साजरे करीत असल्याने मालेगावची ओळख आता बदलू लागली आहे.
गेल्या वर्षी चैत्रोत्सवासाठी सप्तशृंगगडावर जाणाऱ्या भाविकांच्या डीजेवर काही समाजकंटकांनी दगडफेक केली होती. त्यामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यातूनच शिरपूरच्या मानाच्या रथाच्या स्वागतासाठी जनसागर उसळला होता.
हेही वाचा : शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?
या वर्षी नवीन बसस्थानकाजवळील हॉटेल मिनाराचे संचालक रऊफ शेख यांनी यात्रेकरूंवर पुष्पवृष्टी करत सरबत वाटप करून त्यांचे स्वागत केले. श्री. शेख दोन वर्षांपासून हा उपक्रम राबवीत आहेत. अनेक मुस्लिम बांधव यात्रेकरूंना चहा, पाणी, सरबत वाटप करतात.
यातून भाईचारा वाढीस लागत आहे. जाफरनगर भागात रथाचे कुल जमाती तंजीमच्या सदस्यांनी स्वागत करत रथ व भाविकांवर पुष्पवृष्टी केली. या वेळी अपर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती, तसेच कुल जमाती तंजीम प्रमुख डॉ. एखलाक अन्सारी, अत्तहर अशरफी, युसूफ इलियास, शेख अकबर व परिसरातील युवा मुस्लिम बांधव उपस्थित होते.
"गडावर जाणाऱ्या भाविकांना सलग बारा वर्षांपासून सरबत, पाणी वाटप करतो. या उपक्रमातून शहराचे नाव उंचावते. शहराची प्रतिमा बदलते. यापुढेही हा उपक्रम सुरूच राहील."
- अब्दुल रउफ, हॉटेल मिनाराचे संचालक
"आम्ही राबविलेल्या उपक्रमाचे हिंदू बांधवांकडून कौतुक होत आहे. देशातील सर्व जाती-धर्मातील लोक भेदभाव न करता एकत्र राहिल्यास देशाची प्रगती होईल. मालेगाव शहरातील हिंदू-मुस्लिम बांधवांमधील एकोपा इतर कुठेही बघायला मिळणार नाही."
- डॉ. एखलाक अन्सारी, प्रमुख सदस्य कुल जमाती तंजीम
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.