Nashik News : तालुक्याच्या पूर्व भागातील दुर्लक्षित शिरवाडे ( वाकद) गावच्या गावठाणात पडीक क्षेत्रात महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतून लावण्यात आलेली वनराई सध्या फुलली आहे.
या वनराईची दखल महाराष्ट्र शासनाने घेतली असून ही वनराई महाराष्ट्र शासनाच्या मनरेगाच्या जाहिरातीत झळकली आहे. (Forest bloomed on Malrana of Shirwade Sarpanch Dr Aware hard work Nashik News)
डॉ. श्रीकांत आवारे (ह. निफाड पूर्व) डॉ. आवारे हे उच्चविद्याविभूषित स्त्रीरोग तज्ञ. लासलगाव सारख्या ठिकाणी स्वतःचे चांगले हॉस्पिटल. कामाच्या व्यापातून त्यांनी गावातील ग्रामस्थांच्या आग्रहास्तव ग्रामपंचायत निवडणूक लढवली आणि ग्रामस्थांनी मोठ्या विश्वासाने त्यांच्याकडे सरपंचपद सोपवले.
त्यांनी सरपंचपद हाती घेताच केवळ दोन वर्षात गावाचा जो चेहरा मोहरा बदलवला, त्याला तोड नाही आणि त्यांनी केलेला हा विकासच सध्या निफाड पूर्व भागात चर्चेत आहे. शिरवाडेतील हनुमान मंदिरानजीक गोई नदीच्या तीरावर २ ते ३ एकर परिसर वेड्या बाभळींनी वेढल्याने निर्जन झाला होता.
सरपंच डॉ. आवारे यांच्या संकल्पनेतून हा परिसर जेसीबीने स्वच्छ करून तेथे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतून २ एकरावर दोन वर्षांपूर्वी ६५० फळझाडे लावण्यात आली आहेत. ही जमीन क्षारयुक्त असल्याने फळझाडे फुलविण्यासाठी विशेष मेहनत घ्यावी लागली.
गोडपाणी उपलब्ध करण्यात येऊन सिंचनासाठी ठिबक सिंचन बसविण्यात आले. कर्मचाऱ्यांनीही विशेष देखभाल घेतल्याने ही वनराई बहरून आली असून तिला फळेही लागली आहेत.
सहा. कार्यक्रम अधिकारी ज्ञानेश्वर धारराव, कृषी विस्तार अधिकारी एस. एम. शिंदे व व्ही. एस. खेडकर, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी सुधाकर सोनवणे, ग्रामसेवक सुनील शिंदे, मधुकर ठोंबरे, ज्ञानेश्वर तुरेकर, अभिजित आवारे यांचे सहकार्य लाभले.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
या वनराईची ख्याती जिल्हाभर गेली असून महाराष्ट्राचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, जिल्हा कृषी अधिकारी नयन पाटील, निफाडचे गटविकास अधिकारी संदीप कराड तसेच अनेक नागरिकांनी भेट देऊन प्रशंसा केली आहे.
हिवरेबाजारचे आदर्श सरपंच पोपटराव पवार यांनी देखील या वनराईची स्तुती केली आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराष्ट्र रोजगार हमी योजनेची जाहिरात करण्यात येत असून त्या जाहिरातीतही शिरवाडे येथील वनराई झळकली असून हा शिरवाडेकरांसाठी मानाचा तुरा ठरली आहे.
"राज्यमार्ग ७ ते शिरवाडे या रस्त्याचे नूतनीकरण सुरू असून या मार्गावर दुतर्फा झाडे लावण्यासाठी बांधकाम विभागाकडे परवानगी मागितली आहे. ती प्राप्त होताच या तीन किलोमीटरच्या दुतर्फा झाडे लावण्यात येणार आहेत."- डॉ. श्रीकांत आवारे, सरपंच
"भविष्यात शिरवाडे येथे मोठ्या प्रमाणावर मनरेगाची योजना राबविण्यात येणार आहे. संपूर्ण पडीक क्षेत्रात आमराई व जांभूळ बाग लावण्याचा मानस असून तो प्रस्तावित आहे. त्याचबरोबर वैयक्तिक लाभार्थ्यांना देखील प्रोत्साहन देण्यात येऊन मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करण्यात येणार आहे." - सुनील शिंदे, ग्रामसेवक.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.