नाशिक : येथील त्रिरश्मी बुद्ध लेणींवर साफसफाई करत असताना अजून दोन प्राचीन लेणी सापडल्याने येथील लेणींमध्ये अजून भर पडली आहे. सुमारे 200 वर्षांनी, बुद्ध पौर्णिमेच्या एक आठवडा आधी, या त्रिरश्मी बुद्ध लेणीं समूहातील आणखीन तीन भिक्खू निवासगृहांचा शोध लागला आहे. (found 2 new caves in Nashik Trirashmi Buddha Caves)
200 वर्षांपासून अभ्यास
गेल्या काही वर्षांत असंख्य इतिहास संशोधक, पुरातत्त्वविषद, अभ्यासक आणि पर्यटक ही बुद्धलेणीं पाहून गेले, अभ्यासून गेले. अनेकांनी यावर PhD केली. याअगोदर 1823 साली कप्तान जेम्स डेलामीन या ब्रिटिश सैन्य अधिकाऱ्याने सर्वात पहिल्यांदा नाशिक येथील " त्रिरश्मी बुद्ध लेणीं"चे दस्तऐवजीकरण केले आणि जगासमोर ही बुद्धलेणीं प्रकाशित केली. आज 200 वर्षांनी, बुद्ध पौर्णिमेच्या एक आठवडा आधी, या त्रिरश्मी बुद्ध लेणीं समूहातील आणखी तीन भिक्खू निवासगृहांचा शोध लागला आहे.
आणखी तीन भिक्खू निवासगृहांचा शोध
गेल्या आठवड्यात, येथील नवीन रुजू झालेल्या पुरातत्व विभागाचे वरिष्ठ सरंक्षण सहायक राकेश शेंडे यांच्याबरोबर अतुल भोसेकर, सुनील खरे यांनी येथील लेणींच्या बाबतीत संवर्धन आणि जतन करण्या संदर्भात चर्चा केली. त्यावेळेस लेणींच्यावर, डोंगरात असलेली नाली साफ करून लेणीच्या आतमध्ये पडणारे पाणी थांबविण्यासाठी ती साफ करावी ही प्राथमिक गरज आहे हे सांगितल्यावर, शेंडे यांनी कर्मचाऱ्यांना सूचना देत साफसफाई साठी लगेच सुरुवात केली. त्यावेळेस नाली साफ करताना, भारतीय पुरातत्व सर्वेक्षणच्या कर्मचारी सलिम पटेल यांना झाडाझुडुपांमध्ये लेणी असल्याचा अंदाज आला त्यांनी तेथे असलेले झाडे झुडपे बाजूला सारत आपले सहकारी कर्मचाऱ्यांनी बघितले असताना त्यांना एका घळीत, झाडांनी वेढलेले दोन लेणी समूह व त्यात तीन भिक्खू निवासगृह दिसले. त्यांनी पुरातत्व विभागाचे राकेश शेंडेंना कळवले. बातमी कळताच ट्रिबिल्स संस्थेचे अतुल भोसेकर, व एमबीसिपीआर टीमचे सुनील खरे आणि पुरातत्त्वविद मैत्रेयी भोसेकर तेथे पोहचले व या भिक्खू निवासगृहांची पाहणी केली.
काय आढळले लेण्यात?
अतिशय बिकट वाटेने, नुकत्याच झालेल्या घसरड्या डोंगराच्या उतारावरच्या मार्गावर, या दोन लेणी कोरलेल्या दिसल्या. पुरातत्वीय निकषानुसार हे दोन्ही भिक्खू निवासगृह इ.स.दुसऱ्या शतकातील असावीत. एका भिक्खू निवासगृहात दोन भिक्खू राहत असावेत तर दुसऱ्यात एकच भिक्खू राहत असावा असे लेणींच्या रचनेवरून दिसते. दोन्ही लेणींमध्ये व्हरांडा आहे. या दोन्ही लेणींचे दस्तऐवजीकरण मैत्रेयी भोसेकर आणि सुनील खरे यांनी केले असून लवकरच ते पुरातत्व विभागाला सोपविण्यात येईल. यात भिक्खुंसाठी वैशिष्ट्यपूर्ण दगडी चौथरा कोरला आहे. तसेच ध्यान करण्यासाठी एक कोढी कोरण्यात आली आहे. ध्यान करण्यासाठी विशेष व्यवस्था कान्हेरी आणि वाई येथील बुद्ध लेणींत पाहायला मिळते.
त्रिरश्मी बुद्ध लेणी डोंगरावर अजूनही लेणी सापडू शकतात MBCPR team लवकरच यावर संशोधन मोहीम राबवणार आहे, - सुनील खरे- लिपितज्ञ, लेणी अभ्यासक- नाशिक
मी थोड्याच दिवसांपूर्वी येथील कारभार हातात घेतला असून पर्यटन वाढीसाठी व पर्यटकांना जास्तीत जास्त सुविधा देण्यासाठी जास्त कल असेल, राकेश शेंडे- वरीष्ठ संरक्षण सहायक पुरातत्व विभाग नाशिक
लेणी या भारताचा प्राचीन वारसा असून त्याचे जतन करण्याचे काम प्रत्येक भारतीयांचे आहे,- अतुल भोसेकर, लिपि तज्ञ लेणी अभ्यासक
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.