संसाराचा तुटतोय धागा! 'या' तालुक्‍यात वर्षभरात ४०० घटस्फोट 

husband wife dispute.jpg
husband wife dispute.jpg
Updated on

नाशिक  : विवाहप्रसंगी सात जन्म सोबत राहण्याच्या आणाभाका घेणाऱ्या दांपत्यांमध्ये खटके उडण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यातून तुटेपर्यंत ताणले जात आहे. निफाड तालुक्‍यात वर्षभरात ४00 घटस्फोट होऊन संसाराचा धागा तुटला आहे. काडीमोड घेण्याचे वाढते प्रमाण धक्कादायक असून, "यंदा कर्तव्य' असलेल्या मुला-मुलींचे आई-वडील सोयरीक जमविताना ताकही फंकून पीत आहेत. 

अखेर हे प्रकरण विभक्त होण्यावर येते...

दोघांच्या पसंतीशिवाय रेशीमगाठ बांधली जात नाही. परस्परांवर जिवापाड प्रेम करणारे वधू-वर विवाहानंतर आठ-दहा महिन्यांतच वैचारिक मतभेदातून दुरावतात. वारंवार होणाऱ्या कलहातून नातलगांकडून समजूत काढली जाते, पण तडा गेलेली मने पुन्हा जुळत नाहीत. त्यामुळे भांड्याला भांडे लागण्याचा आवाज सर्वत्र नातगलांपर्यंत पोचतो. अखेर हे प्रकरण विभक्त होण्यावर येते. यातून निफाड तालुक्‍यात जानेवारी ते डिसेंबर 2019 मध्ये 400 दांपत्य दुरावले आहेत. "लव्ह मॅरेज' आणि "ऍरेंज मॅरेज' या दोन्ही विवाहप्रकारांत घटस्फोट झाले आहेत. विशेष म्हणजे पती-पत्नीच्या संमतीने घटस्फोट झाले आहेत. 
पूर्वी विवाहानंतर मुले होत नाहीत, घरगुती छळ यांसह अन्य कारणांनी घटस्फोट होत होते. मात्र, अलीकडे सोशल मीडियाच्या युगात वेगवेगळी कारणे पुढे येत आहेत. यात एकत्रित कुटुंबात राहण्यास नकार, वैचारिक मतभेद, दोघांची वेगळी लाइफस्टाइल, सोशल मीडियामुळे एकमेकांवर संशय, विवाहबाह्य संबंध, व्यसनाधीनता, कौटुंबिक जाच यामुळे संसाराची घडी विसकटत आहे. 

...हे काडीमोडाला कारण ठरत आहे

परस्परांना पुरेसे समजावून न घेता विवाह उरकला जातो. आधुनिक युगात विवाह ठरविण्याची पद्धत अजून बदलत नसल्याचेही काही मुद्द्यांवरून दिसून येते. आई-वडील, नातेवाइकांकडून बदललेल्या अपेक्षांचा विचार न करता विवाह ठरविला जात आहे. हे काडीमोडाला कारण ठरत आहे. 

प्रेमविवाहाचे बंध होतायत सैल... 
"तुला पाहताच कलीजा खलास झाला,' असे म्हणत परस्परांच्या प्रेमात बुडालेले व नंतर विवाहबंधनात अडकलेल्या प्रेमविवाहाच्या संसाराची गाडी अर्ध्यावर थांबत आहे. भावनेच्या भरात कुटुंबाचा विरोध पत्करून संसार फुलवू पाहणारे प्रेमविवाहाच्या कहाणीच्या यशोगाथेचा टक्का अत्यल्प आहे. प्रेमविवाहाचे बंध सैल होत असून, त्यातून थेट घटस्फोट होत आहेत. घटस्फोट घेऊ पाहणाऱ्या दांपत्यांचे कौटुंबिक न्यायालयात समुपदेशन केले जात आहे, पण त्यात फारसे यश आले नसल्याचे निफाड तालुक्‍यात गेल्या वर्षी झालेल्या घटस्फोटाच्या संख्येवरून दिसते. 
 

परिपक्व विचाराअंतीच प्रेमविवाह

आनंददायी संसारासाठी पती-पत्नीने परस्परांना समजून घ्यायला हवे. विश्‍वास ठेवला पाहिजे. नोकरी-व्यवसायाबरोबरच कुटुंबीयांशी संवाद ठेवला पाहिजे. परिपक्व विचाराअंतीच प्रेमविवाह करावा. - ऍड. राजेंद्र थिटे  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.