पिंपळगाव बसवंत (जि.नाशिक) : कोरोनाने रुग्ण व नातलगांचे मानसिक संतुलन बिघडत आहे. तहान, भूक विसरून रूग्ण कधी बरा होणार, याची चिंता सतावत असते. रुग्णाची भूक भागविण्यासाठी इथल्या तरुणांनी पुढाकार घेतला आहे.त्यांच्या उपक्रमामुळे सर्वत्र कौतुक होत आहे.
तरुणांची पुण्याई, उपाशी नाही कुणी!
रक्ताचं कुठलंही नात नसतांनाही कोरोबाधित रुग्णांना वेळेवर दोन घास मिळावेत, या उदात्त हेतूने भल्या पहाटेपासून पिंपळगाव शहरातील समर्पण मंडळाच्या कार्यकर्त्यांची लगबग सुरू होते. रुग्णांना पोटभर जेवण देण्याचे व्रत त्यांनी अंगीकारले आहे. रोज दीडशे-दोनशे कोरोना रुग्णांना जेवणाचे डबे पोचविले जात आहे. पंधरा दिवसांपासून निष्ठेने हे अन्नदानाचे काम सुरू आहे. समर्पण ग्रुपच्या पुण्याईने कोरोना रुग्णांवर उपाशी राहण्याची वेळ येत नाही.
उपाशीपोटी झोपण्याची वेळ येत नाही
रोज दीडशे-दोनशे रुग्णांना विनाशुल्क जेवणाचे डबे पुरविले जात आहेत, यासाठी मंडळातील तरुण कार्यकर्ते दिवस-रात्र राबत आहे. भल्या पहाटे त्यांची दिनचर्या सुरू होते. दुपारचे जेवणाचे काम संपतेन् संपते तोच रात्रीचे जेवण बनविण्याची लगबग सुरू होते. समर्पण ग्रुपच्या अन्नदानामुळे एखादा रुग्ण अवेळी आला तरी त्याला उपाशीपोटी झोपण्याची वेळ येत नाही. तशी खबरदारी मंडळाचे सदस्य अल्पेश पारख, सचिन सोनी घेत असतात. समर्पण मंडळाचे सदस्य स्मित शहा, अल्पेश पारख, मनोज सुराणा, शांतिलाल बुरड, गौरव संकलेचा, स्वप्नील शहा, अभिषेक शहा, घनश्याम शर्मा, दिनेश बागरेचा, बंटी बोथरा, मिलिंद कोचर, गौरव सुराणा, श्रीकांत दायमा भोजन व्यवस्थेसाठी प्रयत्नशील आहेत.
गरजूंना शिवभोजन थाळी आधार...
लॉकडाउनमुळे गोरगरीब, हातावर पोट भरणाऱ्या नागरिकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. अशा स्थितीत त्यांना शिवभोजन थाळीचा आधार मिळत आहे. गेल्या वर्षभरात पिंपळगाव शहरात ३८ हजार भुकेल्या नागरिकांना शिवभोजन थाळीतून पोटभर अन्न मिळाले आहे. डाळ-भात, भाजी, चपाती असा सकस आहार थाळीत आहे. बचत गटाच्या शोभा भागवत, सुषमा गायकवाड, शोभा तुपे, मंदाकिनी मोगल, शालिनी सूर्यवंशी, नंदा आरगडे, प्रिया भागवत या शिवभोजन थाळीचा उपक्रम राबवत आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.