Ganeshotsav 2023 : गणेशोत्सवानिमित्त इंदिरानगर आणि पाथर्डी फाटा परिसरात पावसामुळे भरविलेल्या आनंदमेळामधील खेळणी चालकांसह मंडळदेखील आर्थिक संकटात सापडली आहेत.
वासननगर येथे धुळे येथील देवा चौधरी यांचा खेळण्याचा संच आहे. कर्मचारी आणि चौधरी यांच्याशी चर्चा करत असताना पुढे आता काय करायचे, या विचारात ते दिसून आले. (ganesh utsav Anand Mela in business crisis due to rain nashik news)
यंदा राणेनगर येथे माजी सभागृहनेते सतीश सोनवणे यांचा युनिक ग्रुप, शेजारीच शिवसेना ठाकरे गटाचे सागर देशमुख आणि विनोद दळवी यांचा गणेशोत्सव, वासननगर येथे शिव तेलंग याचा शंभोनारायण ग्रुप, मुरलीधरनगर येथे मनसेचे माजी नगरसेवक सुदाम कोंबडे आणि ॲड. निकितेश धाकराव यांचा मनसे गणेशोत्सव आणि पाथर्डी गाव चौफुलीवर शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक अमोल जाधव, सुदाम डेमसे, भगवान दोंदे आणि सोमनाथ बोराडे यांनी भरविलेल्या आनंदमेळ्यात विविध ठिकाणाचे खेळणी चालक आले आहेत.
आकर्षक खेळण्या सर्वच ठिकाणी सजविल्या आहेत. मात्र, सायंकाळी होणाऱ्या पावसामुळे एकाही खेळणीची बोहनी सुद्धा झाली नसल्याचे वासननगर येथील कर्मचारी अलीम खान आणि सहकाऱ्यांनी सांगितले. जवळपास सर्वच ठिकाणी उत्तर प्रदेश आणि बिहारमधून ही मंडळी मजुरीसाठी आली आहेत.
एका ठिकाणी ४० ते ५० जणांचा समावेश आहे. इकडे येऊन मिळेल त्या पैशातून काही पैसे गावी पाठवणे आणि गुजराण करणे असा त्यांचा प्रपंच चालतो. यंदा महाराष्ट्रात पावसाने ओढ दिल्याने उशिरा पाऊस सुरू झाला आहे .त्यामुळे मोठा फटका व्यवसायाला बसल्याचे चालक चौधरी यांनी सांगितले. येथे काम करणाऱ्या सर्वांना जेवण आदि व्यवस्था करावी लागते. प्रत्येकाचा साधारण १२००० ते १८००० इतका महिन्याचा पगार आहे.
पाऊस गरजेचा आहेच मात्र दरवर्षी गणेशोत्सवात इतका फटका बसत नाही, असे येथील कर्मचारी सांगतात .असेच सुरू राहिले आणि व्यवसायच झाला नाही तर गावी परतावे लागेल की काय अशी भीती ते व्यक्त करतात. खेळण्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी किमान १६ मोठे ट्रक लागतात.
व्यवसाय झाला नाही तर या वाहनांचे भाड्याचे पैसेदेखील खिशातून घालावे लागतात असे चालक सांगतात. सायंकाळचे तीन तास तरी पावसाने उघडीप देत व्यवसाय व्हावा, अशी प्रार्थना हे व्यावसायिक करत आहेत.
"दिवसेंदिवस हा व्यवसाय करणे कठीण झाले आहे. सर्व खेळणी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी मोठा खर्च येतो. मात्र अनेक वेळा मोठे नुकसान सहन करावे लागते. यंदा पावसाचे सगळे वेळापत्रक बदलल्याने मोठा फटका बसला आहे." - देवा चौधरी, संचालक, आनंदमेळा
"एवढ्या लांबून पोटापाण्यासाठी येतो. मात्र व्यवसाय अडचणीत आला तर आमच्या हातातले कामदेखील जाईल की काय अशी भीती वाटते. यातून मिळणाऱ्या उत्पन्नावरच गावी असणाऱ्या मुलांचे शिक्षण आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो." - अलीम खान, कर्मचारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.