Ganeshotsav 2023 : यंदा पाऊस नसल्याने तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती असून वरुणराजा रूसलेला असला तरी विघ्नहर्ता श्री गणेश ही दुष्काळाची छाया लवकरच दूर करेल, या आशेने पारंपारिक मराठमोळ्या वेशभूषेत ढोल ताशांच्या गजरात 'गणपती बाप्पा मोरया...' चा जयघोष करीत उत्साह व मांगल्यपूर्ण वातावरणात आज मंगळवार (ता.१९) रोजी सटाणा शहर व तालुक्यात लाडक्या गणरायाचे आगमन झाले. (Ganeshotsav 2023 Arrival of ganesha in auspicious atmosphere in Satana One Village One Ganpati in 41 villages of taluka nashik)
दुष्काळी परिस्थितीमुळे लहान गणेश मूर्तीसह हात आखडता घेत उत्सव साजरा करण्याचे नियोजन ग्रामीण भागातील गणेश मंडळांनी केल्याचे दिसून येत आहे. सटाणा शहरात गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा अनेक नामवंत गणेश मंडळांनी गणेशोत्सवात सहभाग घेतलेला नाही.
तर दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील तब्बल ४१ गावात ‘एक गाव एक गणपती’ संकल्पना राबविण्यात आली आहे.
आज घरोघरी गणरायाच्या मूर्त्यांची प्रतिष्ठापना झाल्यानंतर विविध सावर्जनिक मंडळांनी पवित्र मंत्रोच्चारात विधीवत पूजा-अर्चा करून सायंकाळपर्यंत मंडपात गणरायाची प्रतिष्ठापना केली.
लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी घरातील आबालवृद्ध आणि मंडळातील कार्यकर्ते गेल्या काही दिवसांपासून तयारीमध्ये गुंतले होते.
शहर व तालुक्यात अधूनमधून हलक्या स्वरूपाचा रिमझिम पाऊस हजेरी लावत असल्याने गणेशोत्सवाच्या दहा दिवसात पावसाचा अनुशेष भरून निघेल या अपेक्षेत गणेशभक्तांमधील उत्साह आहे.
लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी सटाणा नगरीत नागरिकांची तयारी सुरु असून गेल्या सात ते आठ दिवसांपासून लहान मोठी गणेश मंडळे मंडप उभारणीच्या कामात व्यस्त होते. दुपारनंतर शहरातील नामांकित गणेश मंडळानी आपापल्या गणेश मूर्ती ढोल ताशांच्या गजरात वाजतगाजत आपापल्या मंडळाच्या मंडपात नेऊन प्रतिष्ठापणा केली.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
शहरातील बाजारपेठेतही गणेशमूर्ती खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होती. बाप्पाची मूर्ती हातात येताच 'मोरया'चा गजर टीपेला पोहोचत होता. कुणी पाटावरून, कुणी डोक्यावरून, कुणी दुचाकीवर, कुणी रिक्षाने तर कुणी स्वत:च्या खासगी वाहनांनी बाप्पांना घरी आणले.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील लहान मोठ्या सार्वजनिक गणेशोत्सव, मंडाळाच्या कार्यकर्त्याबरोबरच बालगोपाळ मंडळींमध्ये आनंद पसरला आहे.
गणपती मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी घरोघरी स्वच्छता, आरास, नैवेद्याची तयारी करण्यात आली होती. सार्वजनिक गणेश मंडळांकडूनही गेल्या महिनाभरापासून गणेशोत्सवाच्या पूर्वनियोजनाची लगबग सुरु होती.
यंदा शहरातील चौकाचौकात व नववसाहतींमध्ये गणेशमूर्ती विक्रीचे दुकाने थाटण्यात आली आहेत. दुष्काळाचे सावट असताना गणेशमूर्त्यांच्या किंमतीत दुपटीने वाढ झाल्याने या वर्षी लहान मूर्ती घेण्याकडे अनेक मंडळे आणि नागरिकांचा कल होता.
आज सकाळपासूनच मुख्य बाजारपेठेला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. शहरातील बाजारपेठेत लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वच गणेशमूर्ती व आरास साहित्य खरेदी करण्यात व्यस्त होते.
गणेश मूर्तीबरोबरच पूजा साहित्य, प्रसाद, विविध प्रकारचे कपडे, रांगोळ्या, सुगंधी अगरबत्ती, कापूर, ईलेट्रिक माळा, चक्रे, हार व सजावटीचे साहित्य यांची खरेदी सुरु होती. दरम्यान, शहरात विविध ठिकाणी पोलीस, राज्य राखीव दल व गृहरक्षक दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
* बागलाण तालुक्याची अर्थव्यवस्था शेती आणि संलग्न अर्थव्यवस्थेवर अवलंबून असून दुष्काळामुळे बाजारपेठेतील हालचाल यंदा मंदावली आहे. पाऊसच नसल्याने सर्वच पिके हातची गेल्याने बळीराजा हतबल आहे.
शेतशिवारात सुद्धा कामे नसल्याने मजुरांच्या दैनंदिन व्यवहारावर सुद्धा अडचणी आल्या आहेत. त्यामुळे गणेश मंडळांना वर्गणी जमा करणे अवघड झाले आहे. दुष्काळी स्थितीमुळे अर्थशास्त्र बिघडल्याने शेतकऱ्यासह गणेश मंडळेही अडचणीत आली आहेत.
त्यामुळे मोठ्या गणेश मूर्तीऐवजी लहान गणेश मूर्ती खरेदी करून देखावे, डेकोरेशन, वाद्य खर्चावर मर्यादा आणून कमीत कमी खर्चात आणि मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सर्वच गणेश मंडळे प्रयत्नशील आहेत.
शिवाय घराघरातील गणपतीही मोठ्या आकाराचे खरेदी न करता छोटे गणपती घेण्यावर भर राहिला आहे.
* सटाणा शहरात गेल्या वर्षी ३५ गणेश मंडळांची नोंदणी होती, मात्र यंदा दुष्काळामुळे आजपर्यंत अवघ्या २१ मंडळांचीच नोंदणी झाली आहे.
तालुक्याच्या ग्रामीण भागात सुद्धा ३५ मंडळांचीच नोंदणी झाली असून ४१ गावात ‘एक गाव एक गणपती’ ही संकल्पना राबविण्यात आली आहे.
*आज गणेशचतुर्थीच्या दिवशी घरगुती व मंडळांच्या गणेशमूर्तींचे आगमन झाल्यानंतर उद्या बुधवारी (ता.२०) रोजी ऋषिपंचमी, तर गुरुवारी (ता.२१) रोजी सोनियाच्या पावलांनी गौराईचे आगमन होणार आहे.
या दिवशी गौराईला वडी, भाजी, भाकरीचा नैवेद्य दाखविला जातो. शुक्रवारी (ता.२२) रोजी शंकरोबाचे आगमन व गौराईचे पूजन होते.
या दिवशी गौरी-गणपती, शंकरोबा या परिवार देवतांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला जातो व सायंकाळी घरोघरी हळदी-कुंकूचे आयोजन केले जाते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.