नाशिक : पावसाळ्यात आरोग्याच्या दृष्टिकोनातून स्वच्छतेसह साफसफाई, डासांचा प्रादूर्भाव रोखण्याच्या उपाययोजना करण्याबाबत आरोग्य यंत्रणेकडून देशभर जनजागृती केली जाते. जनजागृती वा प्रबोधनात्मक उपक्रम जिल्हा आरोग्य विभागांतर्गत व जिल्हा रुग्णालयांच्या माध्यमातून राबविले जातात. मात्र, नाशिक जिल्हा रुग्णालयाचेच आरोग्य ‘सलाईन’वर आहे. ठिकठिकाणी पावसाचे साचलेले पाणी, कचरा, तुंबलेले ड्रेनेजमुळे जिल्हा रुग्णालयाच्या आवारातील अस्वच्छता, दुर्गंधीमुळे रुग्णांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मात्र, रुग्णालयातील कर्मचारीही बेजार झाले आहेत.
नाशिक जिल्हा रुग्णालयाचे नाव एकापेक्षा अधिकवेळा कायाकल्पचा किताब पटकावल्याने देशभरात पोहोचले आहे. असे असताना अस्वच्छता आणि दुर्गंधीमुळे जिल्हा रुग्णालयासमोरच आरोग्याचा प्रश्न उभा राहिला आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असून, गेल्या तीन आठवड्यांपासून पावसाची संततधार सुरू आहे. जिल्हा आरोग्य विभाग व जिल्हा रुग्णालयामार्फत जिल्हाभर आरोग्य जपण्यासाठी जनजागृतीपर उपक्रम राबविले जात आहेत. परिसर स्वच्छता, पाण्याचे डबके न होऊ देणे, दुर्गंधी येईल, असा कचरा न ठेवणे यासह नियमित साफसफाई व स्वच्छतेचे संदेश या उपक्रमांतून दिले जात आहेत. मात्र, याच उपक्रमांचे जिल्हा रुग्णालयाकडून पालन होताना दिसत नसल्याची वस्तुस्थिती पाहावयास मिळत आहे.
जिल्हाभरातून रुग्ण दाखल होणाऱ्या जिल्हा रुग्णालयाच्या आवारात ठिकठिकाणी पाण्याचे डबकी साचली आहेत. अगदी प्रवेशद्वारावरच पाण्याचे तळे साचले आहे. आवारात ठिकठिकाणी कचरा पडून आहे. सततच्या पावसामुळे तो सडल्याने दुर्गंधी सुटली आहे. अनेक ठिकाणी ड्रेनेज नादुरुस्त असल्याने परिसरात दुर्गंधी सुटते. सायंकाळनंतर डासांचा प्रादूर्भाव होऊन रुग्णच नव्हे, तर कर्मचाऱ्यांनाही सेवा बजावणे मुश्किल होऊन बसते. रुग्णालयाच्याच आवारात अस्वच्छता असल्याने रुग्ण आजारातून बरे होण्याऐवजी त्यांची प्रकृती आणखीच खालावण्याचीच शक्यता अधिक आहे.
कर्मचारीच आजारी
जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी गेल्या काही दिवसांपासून सर्दी, ताप, थंडीच्या लक्षणांनी बेजार झाला आहेे. अनेक कर्मचारी आजारपणामुळे सुट्टीवर आहेत. त्यामुळे काही कर्मचाऱ्यांना बरे वाटत नसतानाही ते सुट्टी मिळत नसल्याने कर्तव्यावर येत आहेत. अनेक विभागाचे वैद्यकीय अधिकारी रुग्ण असतील, तरच त्यांच्या केबीनला बसतात, अन्यथा तेथील डास व दुर्गंधीमुळे ते केबीनमध्ये थांबत नाहीत. वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचीच नाईलाज होत असेल, तर रुग्णांनी काय करावे, असा प्रश्न यानिमित्त उपस्थित होत आहे.
पीडब्ल्युडीकडे अंगुलीनिर्देश
जिल्हा रुग्णालयातील ड्रेनेजची दुरुस्ती, आवारातील रस्त्यांची कामे, गळक्या जागांची दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केली जातात. त्यासाठी जिल्हा रुग्णालयाकडून पाठपुरावाही केला जातो. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दखल घेतली जात नसल्याचे सांगत या विभागाकडे अंगुली निर्देेश केले जातात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.