Nashik News : आगामी सिंहस्थ कुंभमेळा भाविकांसाठी ज्याप्रमाणे पर्वणी आहे, त्याप्रमाणे विकासाच्या दृष्टीनेदेखील ठरणार आहे. विकासाच्या पर्वणीत नाशिकचा कायापालट करण्याचे आश्वासन देतानाच गोदावरी प्रदूषणमुक्तीला प्राधान्य राहणार असल्याचे आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री तसेच पालकमंत्री दादा भुसे यांनी दिले.
दरम्यान, आर्किटेक्स व इंजिनिअर्स असोसिएशनने वस्रांतरगृह पाडण्याची मागणी केल्याने सिंहस्थ नियोजनाच्या तयारीलाच नव्या वादाला तोंड फुटणार आहे. (Godavari pollution free priority in Kumbh Mela Architect Engineers Association demand to demolish dormitory Nashik)
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या विकासाचे नियोजन सुरू आहे. नियोजनाच्या अंगाने तयारी करताना शहरातील विविध संस्था व त्यांचे प्रतिनिधींच्या सूचना ऐकून घेण्यासाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांच्या संकल्पनेतून ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे.
त्याचाच एक भाग म्हणून आर्किटेक्स व इंजिनिअर्स असोसिएशनच्या सभागृहात शहरातील वास्तुविशारद, बिल्डर्स यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी पालकमंत्री भुसे बोलत होते.
ते म्हणाले, सिंहस्थाचे नियोजन करताना वास्तुविशारद, अभियंत्यांच्या सूचनांचा समावेश करणार असून, गोदावरी प्रदूषण मुक्तीला प्राधान्य राहणार आहे. देशभरातील भाविकांपर्यंत सिंहस्थाची माहिती व कामे पोचविण्यासाठी महापालिकेकडून वेबसाइट तयार केली जाणार आहे.
त्यावरदेखील भाविकांच्या सूचना मागविल्या जातील. सिंहस्थाच्या माध्यमातून शहराला निधी मिळवून देवू. कामे करताना स्थानिकांना प्राधान्य दिल जाईल. या माध्यमातून नाशिकचे मार्केटिंग करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
शहर विकासासाठी विद्यार्थी, शिक्षक, डॉक्टर, वकील, इंजिनिअर, आर्किटेक्चर तसेच इतरही तज्ञांनी उपाययोजना संदर्भात सूचना कराव्या. येत्याकाळात नाशिक शैक्षणिक हब म्हणून नावारूपास येणार आहे.
‘क्वालिटी सिटी’ च्या माध्यमातून नाशिक परिवर्तनाची कात टाकत आहे. सकारात्मक बदल हे दिशादर्शक राहतील. कुंभमेळ्यासाठी अधिकाधिक निधी आणण्याबरोबरच यासंदर्भात लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे बैठक घेणार असल्याचे श्री. भुसे म्हणाले.
लोकांच्या भावना जाणून घेण्यासाठी ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे श्री. बोरस्ते यांनी सांगितले.
महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर, असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र भुसे, शिवसेनेचे महानगरप्रमुख प्रवीण तिदमे, महापालिकेचे शहर अभियंता शिवकुमार वंजारी, असोसिएशनचे माजी अध्यक्ष सचिन गुळवे, रवींद्र लोहाडे उपस्थित होते.
रस्ते रुंद व्हावे
आर्किटेक्स व इंजिनिअर्स असोसिएशनकडून माजी अध्यक्ष चंद्रकांत धामणे यांनी विविध मागण्या केल्या.
त्यात, शहराकडे येणारे रस्ते सुटसुटीत व्हावे, द्वारका ते नाशिक रोड ४५ मीटर रस्ता रुंदीकरण करावे, गरवारे-आडगाव रस्ता ३५ मीटर रुंद करावा, गंगापूर रस्त्याला समांतर कॅनॉल रस्ता रुंद करावा, गोदावरीला लागून गंगापूरकडे जाणारा डीपीमधील २४ मीटर रस्ता रुंद करावा,
पादचारी मार्ग विकसित करताना कमीत-कमी रुंदी ठेवावी, शाही मिरवणुक मार्ग समान पद्धतीने विकसित करावे, साधुग्राम ते रामघाट दरम्यानच्या रस्ता विकसित करावा, आर्किटेक्ट यांना नियोजनात सामावून घ्यावे.
बाळासाहेब मगर यांनी निर्मळ पाण्याची अपेक्षा व्यक्त केली. रोहन पवार यांनी कुंभमेळ्याच्या निमित्ताने कायमस्वरूपी कामे व्हावी तसेच नाशिकच्या संस्थांना कामे देताना प्राधान्य देण्याची मागणी केली.
२००२ च्या सिंहस्थ कुंभमेळ्यात गोदातीरी रामकुंडावर बांधलेले वस्रांतरगृह पाडण्याची मागणी केली. रामकुंडात साधू उभे राहून सूर्याची पूजा करताना वस्रांतरगृहामुळे सूर्यदर्शन करताना अडथळा निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.