नाशिक : सध्याची पिढी भविष्यातील भारताचे नेतृत्त्व करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगामी २०४७ पर्यंत भारताला विकसीत राष्ट्र बनविण्याचा संकल्प केला असून, या सुवर्णयुगाची साक्षीदार ही युवा पिढी असेल.
पदवी शिक्षण पूर्ण करतांना जीवनातील पुढील वाटचालीत पावलोपावली आव्हाने येतील. परंतु या आव्हानांना संधीमध्ये रुपांतरित करत यशस्वी व्हा, अशा शुभेच्छा राज्यपाल रमेश बैस यांनी शुक्रवारी (ता.५) विद्यार्थ्यांना दिल्या. (Governor Ramesh Bais addresses students at sandip foundation university convocation Nashik News)
संदीप विद्यापीठाच्या पहिल्या दीक्षांत समारंभानिमित्त त्र्यंबकरोडवरील विद्यापीठ प्रांगणात आयोजित कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी माजी खासदार प्रभात झा, संदीप फाउंडेशनचे अध्यक्ष पं. नित्यानंद झा, संदीप विद्यापीठाचे संचालक डॉ. संदीप झा, आलोक झा, आर्यन झा, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजेंद्र सिन्हा उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना राज्यपाल रमेश बैस म्हणाले, की जीवनात धेय्य निर्धारित करतांना अपयशांना कधीही घाबरु नका.
आज आपण पाहात असलेल्या अनेक यशस्वी व्यक्तींनी त्यांच्या जीवनात अपयशाचा सामना केलेला असतो. त्यामुळे यश-अपयशापेक्षा प्रयत्नांमध्ये प्रामाणिकपणा व कष्ट घेण्याची तयारी ठेवा.
माजी खासदार श्री.झा म्हणाले, की शिक्षण पूर्ण करुन संस्थेतून बाहेर पडणार्या युवकांनी समाजासाठी, देशासाठी योगदान द्यावे. पदवी प्रदान केल्याने या विद्यार्थ्यांचा आत्मगौरव वाढेल.
जीवनात यशोशिखर गाठतांना आपण शिक्षण घेतलेल्या या मातृसंस्थेला नेहमीच स्मरणात ठेवण्याचा सल्ला त्यांनी दिला.
पं. नित्यानंद झा म्हणाले, की विद्यार्थ्यांची मेहनत व पालकांच्या त्यागातून विद्यार्थी घडले आहेत. त्यांच्या मेहनतीचा, त्यागाचा आज सन्मान होत आहे.
पहिला दीक्षांत समारंभ साजरा करतांना आगामी काळात हे विद्यापीठ आंतराष्ट्रीय स्तरावर भारताचा नावलौकिक वाढवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातून प्राप्त होईल पुर्नवैभव
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये देशाच्या परंपरा व सांस्कृतिक मुल्यांवर आधारित रचना केलेली आहे. ज्ञान, प्रज्ञा व सत्यतेचा शोध घेण्याची जिज्ञासा याद्वारे विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होणार आहे.
हे धोरण शिक्षण क्षेत्रात अमुलाग्र बदल घडवितांना देशाला पुर्नवैभव प्राप्त करुन देईल, असा विश्वास राज्यपाल रमेश बैस यांनी व्यक्त केला.
विद्यार्थ्यांचा साधतोय सर्वसमावेशक विकास : संदीप झा
संदीप फाउंडेशनअंतर्गत विविध महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा ध्यास बाळगला आहे.
संदीप विद्यापीठाद्वारे परदेशातील अनेक विद्यापीठाशी सांमजस्य करार करुन विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील संधी उपलब्ध केल्या आहेत.
शिक्षणासोबत सांस्कृतिक, क्रीडा गुणांनाही चालना देतांना सर्वसमावेश विकास साधला जातो आहे, अशी ग्वाही संदीप विद्यापीठाचे संचालक डॉ. संदीप झा यांनी दिली.
दीक्षांत समारंभातील क्षणचित्रे...
- सहाशे विद्यार्थ्यांना सुवर्ण, रौप्य व कास्य पदके
- पंधराशे विद्यार्थ्यांना पदवीदान, ६२ स्नातकांना आचार्य पदवी
- आर्टीलरीच्या बँड पथकाकडून राज्यपालांचे स्वागत
- विद्यार्थ्यांसह कुटुंबियांची हजेरी
- सेल्फी, छायाचित्रे टिपण्याची लगबग
- विशेष वेशभुषा ठरली लक्षवेधी
- पीएच.डीधारक, पीजी, युजीच्या विद्यार्थ्यांना समावेश
- मित्र परीवारासोबत भेट घेतांना युवक झाले भावूक
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.