मालेगाव (जि. नाशिक) : तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी रविवारी (ता.१८) ७० ते ७५ टक्के उत्साहात मतदान झाले. थेट सरपंच पदासाठी ३३ उमेदवार निवडणूक रिंगणात असून सहा गावांमध्ये सरळ लढत होत आहे. सौंदाणे व दाभाडी येथील लढतींकडे जिल्ह्याचे लक्ष लागून आहे. सरपंचांखेरीज सदस्यपदासाठी देखील चुरशीची निवडणूक झाली.
प्रमुख उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी विजयाचा दावा केला आहे. बहुसंख्य गावांमध्ये पालकमंत्री दादा भुसे व भाजपचे युवानेते अद्वय हिरे यांच्या समर्थकांमध्ये सरळ लढती होत आहेत. मंगळवारी (ता.२०) होणाऱ्या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. (Gram Panchayat Election Voting in Malegaon taluka with excitement Nashik news)
तालुक्यातील माल्हणगाव, शिरसोंडी, वजीरखेडे, दाभाडी, टोकडे, रोझे, जाटपाडे, सौंदाणे, निंबायती, पाटणे, करंजगव्हाण, मोहपाडे व चौकटपाडे या तेरा गावांमध्ये निवडणूक होत आहे. यातील रोझे येथील थेट सरपंचपदाची निवडणूक बिनविरोध झाली. उर्वरित १२ गावांत सत्तेसाठी चुरशीचा मुकाबला होत आहे. एकूण ३९ उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत.
यात माल्हणगाव येथील सात तर सौंदाणे या प्रमुख गावातील १५ उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. सकाळी सर्वत्र उत्साहात मतदानाला सुरुवात झाली. सुरुवातीच्या दोन तासात कमी प्रतिसाद मिळाला. सकाळी साडेअकरापर्यंत २७ टक्के मतदान झाले होते. दुपारनंतर मतदान केंद्रांवरील गर्दी वाढली. दुपारी साडेतीनपर्यंत ६४ टक्के मतदान झाले होते. रात्री उशिरापर्यंत मतपेट्या येथे आणण्यात आल्या.
हेही वाचा : ज्ञानेश्वरीत आहेत HR निगडित व्यवस्थापन सूत्रे...
थेट सरपंचपदाच्या निवडणुकीमुळे बाराही गावांमध्ये गेल्या पंधरा दिवसापासून निवडणूक ज्वर पसरला होता. उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी गाव, वाड्या, वस्त्या ढवळून काढल्या. सोशल मिडीयावर प्रचाराचा जणू पाऊस पडत होता. गावगाड्याची सत्ता हातात राखण्यासाठी राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. काल सायंकाळपासून सुरु झालेल्या आर्थिक उलाढाली आज दिवसभर सुरु होत्या. मतदार राजाचा भाव चांगलाच वधारला होता. विशेषत: दाभाडी येथे मतदारांची चांगलीच चंगळ झाली.
आर्थिक उलाढाल चर्चेत
दाभाडीत सरपंचपदासाठी पंचरंगी मुकाबला होत असला तरी अखेरच्या टप्प्यात ही लढत तिरंगी झाली. राजरोसपणे झालेल्या आर्थिक उलाढाली डोळे फाडणाऱ्या होत्या. मतदारांना ने- आण करण्यासाठी वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. दाभाडी, सौंदाणे, पाटणे, वजीरखेडे आदी गावांमध्ये मतदान केंद्राबाहेरील उमेदवारांच्या बुथवर कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी होती. काही ठिकाणी शाब्दीक चकमकी झडल्या. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.