कसबे सुकेणे (जि. नाशिक) : गेल्या चार दिवसांपासून सतत ढगाळ हवामान व त्यातच सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास कसबे सुकेणे व परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावल्याने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची चिंता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परिसरात जवळपास अर्धा तास (ता. ४) जोरदार पाऊस झाला. त्यामुळे द्राक्ष उत्पादकांची डोकेदुखी वाढली आहे.
आठ दिवसांमध्ये अनेक द्राक्षबागा सुरू होणार
पंधरा दिवसांपूर्वीदेखील अशाच प्रकारे सतत ढगाळ वातावरण होते. सकाळी दाट धुके व बेमोसमी पाऊस यामुळे अनेक द्राक्षबागांना तडे गेले होते. त्यातून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची लाखो रुपयांची हानी झाली होती. या संकटातून शेतकरी सावरतोय तोच पुन्हा बेमोसमी पावसाने हजेरी लावल्याने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे धाबे दणाणले आहे. चालू स्थितीमध्ये अनेक द्राक्षबागा विक्रीसाठी तयार झाल्या आहेत. जम्बो, नानासाहेब पर्पल, शरद सीडलेस, फ्लेम आदी प्रकारची द्राक्षे सध्या कसबे सुकेणे परिसरात मोठ्या प्रमाणात तयार झाली आहेत. येत्या आठ दिवसांमध्ये अनेक द्राक्षबागा सुरू होणार आहेत. मात्र, त्यातच आता पावसाने हजेरी लावल्याने द्राक्ष उत्पादकांची चिंता मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
वातावरणात बदलांमुळे चिंतेत भर
हवामान खात्यानेही सात ते आठ तारखेपर्यंत वातावरणात सतत बदल होत राहतील, असा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. बेमोसमी पावसामुळे शेतकऱ्यांना वेगवेगळ्या स्टेजमधील द्राक्षबागांसाठी महागड्या औषधांची फवारणी करावी लागणार असल्याने उत्पादन खर्चातही मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.