नाशिक : जिल्ह्यातील धरणात जेमतेम पन्नास टक्क्यांच्या आसपास म्हणजे वर्षभरातील पिण्याच्या पाण्याची सोय होईल इतकाच पाणीसाठा आहे. पिण्याला पहिले प्राधान्य असल्याने धरणातून सिंचनासाठी आवर्तन सोडण्याचा विचार करता येणार नाही. २१ ऑगस्टनंतर राज्यात पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे भविष्यात पाऊस झाला, तरच सिंचनाच्या आवर्तनाचा विचार करता येईल, असे स्पष्ट संकेत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले.
नाशिक जिल्ह्यातील कोरोना साप्ताहिक आढावा बैठकीदरम्यान श्री. भुजबळ यांनी जिल्ह्यातील पाण्याच्या स्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलिस आयुक्त दीपक पांडे, महापालिका आयुक्त कैलास जाधव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील आदी उपस्थित होते.
भुजबळ म्हणाले, की राज्यात सगळीकडे यंदा मुसळधार झाली असली तरी नाशिक जिल्ह्यात मात्र खूप कमी पाणीसाठा आहे. धरणात जो पन्नास टक्क्यांच्या आसपास आहे. त्यातून वर्षभर पिण्याच्या पाण्याचीच सोय होऊ शकते. त्यामुळे नियोजनात पिण्यासाठी पाणी राखीव ठेवावे लागणार आहे. सिंचनाचा विचार करता येणार नाही.
दोन्हीकडे सारखी स्थिती
जी स्थिती नाशिकची आहे, तशीच स्थिती मराठवाड्यात जायकवाडी धरणाची आहे. तिकडे धरणात ४० टक्के इतकाच साठा आहे. त्यामुळे नाशिकप्रमाणे मराठवाड्याला पाण्याची गरज आहे. मेंढेकर समितीच्या शिफारसीनुसार नाशिकला ८४ टक्क्यांहून अधिक साठा असला तरच खाली पाणी सोडता येईल. नाशिकला तेवढे पाणी नाही. तिकडे जायकवाडीत ६५ टक्क्यांपेक्षा कमी पाणी असल्याने त्यांनाही पाण्याची गरज आहे. अशा दोन्हीकडची पिण्याची गरज प्राधान्याने पाहावी लागणार आहे.
धरणे भरली तरच
जिल्ह्यातील धरण रिकामे असल्याने सध्या तरी सिंचनाच्या आवर्तनासाठी कितीही मागणी असली तरी पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्याच्या नियमाचा प्रत्येकाला आदर करावा लागणार आहे. राज्यात २१ ऑगस्टनंतर पाऊस होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे पाऊस पडावा, अशी सगळ्यांचीच अपेक्षा आहे. पाऊस नसल्याने नद्या-कालवे कोरडेठाक पडले आहेत. त्यातून पाणी नेताना पाण्याच्या अपव्ययाचा मुद्दा येणार आहे. सुक्या नद्या कालव्यातून पाण्याची नासाडी टाळावी लागणार आहे. त्यामुळे तूर्तास तरी, पाऊस झाला तरच सिंचनाचा विचार करावा लागणार आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.