Nashik Dada Bhuse : शहरातील ढासळलेली कायदा व सुव्यवस्था, रस्त्यांवरील खड्डे यासंदर्भात आठ दिवसात नाशिककरांना रिझल्ट दिसून येईल. पार्किंग व्यवस्थेवर तोडगा काढण्यासाठी छत्रपती शिवाजी स्टेडिअम ‘पे ॲन्ड पार्क’ तत्त्वावर वापरात आणण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाशी चर्चा करून निर्णय घेवू, असे आश्वासन पालकमंत्री दादा भुसे यांनी दिले.
शहरात कायदा व सुव्यवस्था ढासळली आहे. खुलेआम कोयते घेऊन गुंडाकडून जाळपोळ होत आहे. पोलिस आहे की नाही, अशी स्थिती आहे.
दुसरीकडे पायाभूत सुविधांसंदर्भातदेखील बोंब आहे. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने नागरिक त्रस्त आहे, तर प्रशासन सुद्धा संकट संधी म्हणून रस्त्यांवर दरवर्षी करोडो रुपये खर्च करतं आहे. (guardian minister dada bhuse assured that citizens will see result in 8 days nashik news)
स्मार्टसिटीमार्फतदेखील रस्ते कामाच्या नावाखाली चांगले रस्ते खोदून ठेवले आहे. वाढते अतिक्रमण, बिघडलेली आरोग्य व्यवस्था, पार्किंग व्यवस्था नसल्याने रस्त्यावर उतरणारे नागरिक या नैराश्याच्या परिस्थितीत पालकमंत्री दादा भुसे यांनी शनिवारी (ता. ५) व्यवस्थेची पाहणी करण्याचा निर्णय घेतला.
पोलिस अकादमी येथील नियोजित कार्यक्रम आटोपल्यानंतर सिटी सेंटर मॉल, सिडकोतील त्रिमूर्ती चौक येथील रस्त्यांची पाहणी केली. चोपडा लॉन्स येथे स्मार्टसिटी कंपनीच्या कामासाठी रस्त्यावर पेव्हर ब्लॉक ठेवल्याने त्यावर मोटारसायकल आदळून झालेल्या अपघातात एका युवकाचा मृत्यू झाल्याने त्या जागेची पाहणी करण्यात आली.
त्यानंतर देवळाली गावातील दुचाकी ज्या भागात जाळल्या गेल्या, तेथेदेखील पाहणी करतं नागरिकांशी संवाद साधला. बिघडलेल्या आरोग्याच्या पार्श्वभूमीवर बिटको रुग्णालयात भेट देवून रुग्णांची विचारपूस केली व वैद्यकीय व्यवस्थेचा आढावा घेतला. जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, सहसंपर्क नेते राजू लवटे आदी या वेळी उपस्थित होते.
पालकमंत्र्यांचा चकवा, ठेकेदारांना काळी यादी
रस्त्यांच्या दयनीय अवस्थेची पाहणी करण्यासाठी कार्यक्रम ठरवून दिला होता. महापौरांचा रामायण बंगला, शरणपूर रोड सिग्नल, तसेच उंटवाडी रोड येथे नियोजन होते. परंतु मायको सिग्नलवरून थेट सिडको भागाकडे पालकमंत्र्यांनी वाहन वळवून सिटी सेंटर मॉलकडे वळविल्याने यंत्रणेची धावपळ उडाली.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनादेखील नियोजित जागेवरून सिटी सेंटर मॉल येथे यावे लागले. खड्डेमय रस्त्यांची पाहणी केल्यानंतर पालकमंत्री भुसे यांनी पंधरा दिवसात खड्डे बुजविण्याचे आश्वासन दिले. यासंदर्भात प्रशासनाला सूचना केल्या आहेत.
रस्ते तयार करताना नवीन तंत्रज्ञान वापरण्याबरोबरच टप्प्याटप्प्याने काँक्रिटीकरण करण्याच्या, रस्त्यांची गुणवत्ता न राखणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याच्या सूचना दिल्या. माजी नगरसेवक श्यामकुमार साबळे, स्मार्टसिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे उपस्थित होते.
पार्किंग समस्येवर तोडगा
शहरात पार्किंग समस्या गंभीर होत असून महात्मा गांधी रस्त्यावर दोन दिवसांपूर्वी झालेल्या आंदोलनाचा दाखला देत सीबीएस, शालीमार, मेहेर, अशोकस्तंभ तसेच महात्मा गांधी रस्त्यावरील पार्किंगची समस्या सोडविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मालकीचे छत्रपती शिवाजी स्टेडिअममधील जागा पे ॲन्ड पार्कसाठी देण्यासंदर्भात निर्देश दिले जातील.
त्याचबरोबर महात्मा गांधी रस्त्या सन्मुख असलेले स्टेडिअमचे प्रवेशद्वार खुले करण्यासंदर्भात चर्चा करणार असल्याचे पालकमंत्री भुसे यांनी सांगितले. स्टेडिअम कॉम्प्लेक्स मधील तळमजल्याचे पार्किंगचा वापर करणे अपेक्षित असल्याचे मत व्यक्त केले.
महापालिकेत पुढील आठवड्यात आढावा
महापालिका संदर्भात अनेक तक्रारी असून, नगरसेवक नसल्याने प्रशासकीय कामकाजात हलगर्जीपणाच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर पुढील आठवड्यात महापालिकेच्या कामकाजाचा आढावा घेतला जाणार असल्याचे पालकमंत्री भुसे यांनी सांगितले. बैठकीत स्मार्टसिटीच्या कामांचा आढावा, ‘एमएनजीएल’ कडून सुरू असलेली रस्ते खोदाई, स्मार्टसिटी कंपनीने मुळ कामांच्या आराखड्यात केलेले बदल यासंदर्भातील समस्यांचा ऊहापोह होईल.
घंटागाडी अन् रस्ते बदल
स्मार्टसिटी कंपनीकडून गावठाणातील रस्त्यांची कामे अन्य रस्त्यांकडे वळविल्याच्या मुद्द्यावर स्मार्टसिटी कंपनीला जाब विचारला जाणार आहे. त्याचबरोबर घंटागाडी संदर्भातील तक्रारींच्या अनुषंगाने चौकशी केली जाणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.
महापालिकेची अशीही खड्डे दुरुस्ती
शहरात पालकमंत्र्यांचा दौरा सुरू असताना बांधकाम विभागाकडून रस्त्यांवरील खड्डे तात्पुरते दुरुस्त करण्याची धावपळ सुरू होती. जागोजागी वाहतूक थांबवून कच, दगड मिश्रित मातीने खड्डे बुजविले जात होते. आयुक्त डॉ. करंजकर यांनी तात्पुरती डागडुजी असल्याचे स्पष्टीकरण दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.