वीरगाव : पोटाला चिमटा देवून पै पै जमा करत संसार उभा केला. रोजच्या कष्टातून मिळणाऱ्या तुटपुंज्या मजुरीतून भाकरीची धडपड सुरू होती. मात्र अचानक होत्याचे नव्हते झाले. रात्री झोपेत असताना कुटुंब असताना झोपडीत लावलेली चिमणी पडल्याने झापाला लागलेल्या आगीत संपूर्ण संसार आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. सुदैवाने या परिवाराची जीवित हानी झाली नाही, हे सुदैव. आगीमुळे उघड्यावर आलेल्या कुटुंबाला आधार देत तनिष्का व्यासपीठाने केलेल्या आवाहनाला माणुसकी धावली.
दहिवड (ता.बागलाण) येथील रवींद्र पवार यांच्या आदिवासी गरीब कुटुंबाच्या झापाला आग लागून घर जाळून खाक झाल्यामुळे घरातील नवरा, बायको, तीन मुले उघड्यावर पडली. एका झोपडीत राहणाऱ्या या कुटुंबावर उदरनिर्वाहाचा मोठा पेच उभा राहिला. घरातील भांडी, कपडे, मुलांचे वह्या पुस्तके, पांघरून असे सर्व साहित्य जाळून गेल्याने पुन्हा हे सर्व साहित्य उभे करणे त्यांच्यासाठी त्रासदायक ठरणारे होते.
मोलमजुरी करून कसेतरी घराचा गाडा हाकणारे हे कुटुंब पूर्ण उद्ध्वस्त झाले. सदरील माहिती मेशी येथील तनिष्का सदस्यांनी तनिष्का व्यासपीठाचे जिल्हा समन्वयक विजयकुमार इंगळे यांना कळविली. सामाजिक कार्यकर्ते ॲड. सोमदत्त मुंजवाडकर व ‘सकाळ’ चे वीरगावचे बातमीदार रणधीर भामरे यांनी पुढाकार घेत तातडीने बागलाण परिसरातील गुरुकुल ग्रुपला याबाबत माहिती देत आवाहन केले.
हेही वाचा: Credit Score :असा वाढवा तुमचा ‘क्रेडिट स्कोअर’
गुरुकुल ग्रुपचे प्रमोद रौंदळ, जितेंद्र आहेर, सोपान खैरनार, डॉ. सतीश साळुंखे, तुषार जाधव, ॲड. मुंजवाडकर यांनी निधी जमा करत एकाच दिवसात सर्व सदस्यांनी संसार उपयोगी साहित्य घेण्याचे ठरविले. या साहित्यासाठी सर्व निधी जमा झाला. संसाराला लागणारी सर्व भांडी घेऊन या कुटुंबापर्यंत पोहोचवली. यावेळी दहिवड येथील वस्तीवर ॲड. सोमदत्त मुंजवाडकर, रणधीर भामरे, तनिष्का गटप्रमुख सरला सोनवणे यांच्यासह तनिष्का सदस्या तसेच गुरुकुल परिवाराचे सदस्य उपस्थित होते. आजही माणुसकी जिवंत असल्याचे गुरुकुल ग्रुपच्या सदस्यांनी दाखवून दिले.
''गुरुकुल परिवार नेहमीच सामाजिक कार्यात मदतीला धावून जात असतो. सोशल मीडियावरील आवाहनाला प्रतिसाद देत ‘सकाळ’ च्या तनिष्का व्यासपीठामुळे आगीत संसार जळालेल्या आदिवासी कुटुंबाला मदत देत सामाजिक योगदान देण्याची संधी सर्व सदस्यांना मिळाली.'' - ॲड. सोमदत्त मुंजवाडकर, सटाणा.
''तनिष्का व्यासपीठानिमित्ताने सामाजिक कार्यातील योगदान देतानाच समाजाच्या तळागाळात पोहचण्याची संधी मिळते आहे. तनिष्का असल्याचा अभिमान वाटतो.'' - सरला सोनवणे, गटप्रमुख, तनिष्का व्यासपीठ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.