Gurumauli Annasaheb More: अयोध्या येथे २२ जानेवारी २०२४ ला होणाऱ्या श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गातर्फे २० डिसेंबर ते २२ जानेवारीदरम्यान श्रीरामरक्षा स्तोत्र व हनुमान चालिसाचे सामुदायिक ११ कोटी पठण केले जाणार आहे, अशी घोषणा सेवामार्गाचे प्रमुख गुरुमाउली आण्णासाहेब मोरे यांनी केली.
उपस्थित हजारो सेवेकऱ्यांनी टाळ्यांच्या गजरात त्याचे स्वागत केले. जयजयकाराच्या घोषणा देऊन गुरुमाउलींना जोरदार प्रतिसाद दिला. (Gurumauli Annasaheb More Announced Shri Ram Raksha 11 Crore Recitation of Hanuman Chalisa news)
श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील गुरुपीठात शनिवारी (ता. १६) राज्यभरातून आलेल्या सेवेकऱ्यांना गुरुमाउलींनी संबोधित केले. ते म्हणाले, की अयोध्या येथे २२ जानेवारी २०२४ ला श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होत आहे. यानिमित्त सेवामार्गातर्फे श्रीरामरक्षा स्तोत्र व हनुमान चालिसाचे ११ कोटी सामुदायिक पठण केले जाईल.
जगभरातील सेवेकऱ्यांनी या सामुदायिक पठण कार्यक्रमात सहभागी व्हावे, जगभर रामराज्य यावे आणि जगातील दैन्य, दुःख, दारिद्र्य दूर होऊन जनता सुखी व्हावी व होऊ घातलेला कार्यक्रम सुरळीत व्हावा, या उद्देशाने सामुदायिक पठणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
दत्तजयंतीनिमित्त नामयज्ञ सोहळा
सध्या सुरू असलेल्या मल्हारी रात्रोत्सवासंदर्भात ते म्हणाले, की या काळात जास्तीत जास्त मल्हारी सप्तशती ग्रंथाचे पठण करावे आणि देवाला भरीत-भाकरीचा नैवेद्य दाखवून सांगता करावी. सेवामार्गातर्फे २० ते २७ डिसेंबर २०२३ या काळात श्री दत्त जयंतीनिमित्त नामयज्ञ सोहळा हजारो सेवा केंद्रांमध्ये होणार आहे. या सप्ताहातील विविध भागांच्या सेवांचे गुरुप्रसाद गुरुमाउलींनी स्पष्ट केले.
जानेवारीत कृषी महोत्सव
शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखाव्यात, बेरोजगार तरुणांना रोजगार मिळावा, सर्वांपर्यंत सेंद्रिय शेतीचे ज्ञान पोहोचावे यासाठी २४ ते २७ जानेवारी २०२४ या काळात नाशिकच्या डोंगरे वसतिगृह मैदानावर जागतिक कृषी महोत्सव आयोजित करण्यात आला असून, या उपक्रमात शेतकरी नागरिक व समाजातील सर्व घटकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
सर्वांचे आरोग्य निरामय राहावे आणि गरजूंवर उपचार व्हावेत, या उद्देशाने सद्गुरू परमपूज्य मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटलच्या कामाला आता लवकरच सुरवात होणार असून, बांधकामाची पायाभरणी झाली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
मुंबईत १३ ला सामुदायिक पठण
अयोध्या येथील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त गुरुमाउलींच्या आदेशान्वये मुंबई विभागातर्फे मुंबई येथे १३ जानेवारीला सामुदायिक श्रीरामरक्षा स्तोत्र व हनुमान चालिसा पठण होईल. या उपक्रमाला मुंबई विभागातील सेवेकऱ्यांनी उपस्थित राहून श्रींच्या चरणी सेवा समर्पित करावी, असे आवाहन गुरुमाउलींनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.