Gurumauli Annasaheb More : पितृ पंधरवड्याला प्रारंभ झाला असून, भारतीय संस्कृतीत पितरांच्या सेवेला अनन्यसाधारण महत्त्व आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे प्रमुख गुरुमाउली आण्णासाहेब मोरे यांनी केले.
दिंडोरी प्रधान क्षेत्री गुरुवारी (ता. २८) साप्ताहिक प्रश्नोत्तरे, मार्गदर्शन व सत्संग समारोह पार पडला. या वेळी राज्यभरातून आलेल्या सेवेकऱ्यांना गुरुमाउलींनी संबोधित केले. अनंत चतुर्दशीच्या पर्वावर मार्गदर्शन करताना गुरुमाउली म्हणाले, की पितृ पंधरवड्यात आपले पितर आपल्या वंशजांच्या घरी येतात, अशी मान्यता आहे. (Gurumauli Annasaheb More guidance about pitru paksha nashik news)
पितरांची सेवा कशी करावी, याविषयी आणि जननशोच व मृतशोच कशा पद्धतीने पाळावे, याविषयी धर्मसिंधू व निर्णयसिंधू या अमूल्य ग्रंथांमध्ये मार्गदर्शन करण्यात आले आहे. पितृ पंधरवड्यात आणि ज्यांना शक्य असेल, त्यांनी रोज सकाळी अंघोळ केल्यावर दक्षिणेकडे तोंड करून बाह्यशांतीसूक्त व पितृस्तुती वाचावी, तसेच पितृतर्पण करावे. दररोज पंचमहायज्ञ करावा. मृत व्यक्तीच्या तिथीला महालय श्राद्ध घालावे. या सेवेने पितरांचे आशीर्वाद लाभतात व अडलेली कामे मार्गी लागतात, असे गुरुमाउलींनी स्पष्ट केले.
श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या सेवेविषयी मार्गदर्शन करताना गुरुमाउलींनी सांगितले, की दररोज श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या अकरा माळा जप, श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे क्रमश: तीन अध्याय वाचन करावे. पंचमहायज्ञ करावा आणि शाकाहारी व निर्व्यसनी राहून परस्त्री मातेसमान मानून आध्यात्मिक सेवा करणाराच सेवेकरी श्री स्वामी समर्थ महाराजांना विशेष प्रिय आहे.
कोणाबद्दल द्वेष, निंदा, मत्सर करू नये. लोभ, मोह बाळगू नये. अंत:करण शुद्ध आणि पवित्र ठेवावे. सेवामार्गाचे नियम पाळावेत आणि आपल्याप्रमाणेच इतरांनाही सेवामार्ग सांगावा. मूल्यशिक्षण विभाग सक्षम करणे काळाची गरज आहे, असे त्यांनी नमूद केले. प्रपंच सुखी राहावा, यासाठी कमी खर्चात कोणत्याही मानपानाशिवाय विनासोने, हुंडा अल्प खर्चात विवाह करावा, असा उपदेश त्यांनी केला.
आयुर्वेदावर बोलताना त्यांनी कफ- वात- पित्त संतुलित ठेवण्यासाठी आहार महत्त्वाचा आहे, असे सांगितले. आदर्श वास्तू कशी असावी, याची माहिती सेवामार्गाच्या ग्रंथसंपदेतून प्राप्त होईल, असे त्यांनी नमूद केले. गुरुमाउलींच्या अमृततुल्य हितगूजनंतर पालखी सोहळ्यात सेवेकऱ्यांनी आनंदाने सहभाग घेतला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.