Nashik News : सिन्नर तालुका हा अध्यात्माकडून कर्माकडे वाटचाल करणारा तालुका आहे. तालुक्यातील सर्व कर्मयोगी आहेत. या तालुक्याने दुष्काळाचा सामना केलेला असून, या तालुक्यात उद्योग व्यवसाय आहे.
तालुक्यातील सर्वांत चांगला सद्गुण म्हणजे, या तालुक्यात नाशिक जिल्ह्यातील सर्वांत जास्त कीर्तनकार लाभले आहेत.
यामागे संबंधितांनी केलेला त्याग महत्त्वाचा आहे, असे उद्गार मुसळगाव येथील सुवर्णमहोत्सवी अखंड हरिनाम सप्ताह येथे झालेल्या कार्यक्रमात श्री स्वामी समर्थ सेवामार्ग दिंडोरीप्रणीत प्रधान केंद्रप्रमुख गुरुमाउली अण्णासाहेब मोरे यांनी काढले. (Gurumauli Annasaheb More say Sinnar Taluka moving from spirituality to karma Musalgaon Golden Jubilee Akhand Harinam week Nashik News )
गुरुमाउली अण्णासाहेब मोरे, डॉ. रामकृष्णदास महाराज लहवितकर, दौलतदास महाराज, गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे आदी उपस्थित होते. गुरुमाउली अण्णासाहेब मोरे म्हणाले, की युवा पिढी बिघडली नाही. आपण त्यांना घडविण्यात कुठेतरी कमी पडलो आहोत. सुसंस्कृत निर्व्यसनी युवा पिढी निर्माण व्हावी, ही काळाची गरज आहे.
तसे झाले तर घराघरांत, मनमनांत आई-वडिलांचे महत्त्व राहील. त्यामुळे भावी पिढीवर चांगले संस्कार करण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. सामाजिक स्वास्थ्य बिघडणार नाही, याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे.
भारतीय संस्कृती आध्यात्मिकतेच्या माध्यमातून टिकवून ठेवली आहे. श्रावणबाळ, संत पुंडलिकाप्रमाणे तयार व्हावे. आई-वडिलांची सेवा करावी, त्यानंतर अध्यात्माकडे वळावे. मुलांचे प्रथम आई-वडील, नंतर प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, उच्चशिक्षण, व्यावसायिक शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे करणारे शिक्षक व आध्यात्मिक गुरू असे पाच गुरू आहेत.
जबाबदारी आली, की मनुष्य गृहस्थाश्रमात जातो. मनःशांतीसाठी मग शोध घेतला जातो. आध्यात्मिक गुरू महत्त्वाचे आहेत. अमेरिका सेवामार्गाचे संस्कार बघून अभ्यासक्रमात बदल करते.
कारण त्यांना बालपण व वृद्धापकाळ यामध्ये ताळमेळ साधायचा आहे, हे त्यांच्या लक्षात आले आहे. निर्व्यसनी पिढी घडावी, यासाठी मातृ-पितृ व राष्ट्रभक्ती समृद्धीसाठी अध्यात्म मार्ग प्रयत्न करत असतो. मुसळगावला सप्ताहकाळात विवाह संस्कार विभागामध्ये ११५ नोंदणी झाली आहे. या अगोदरच ३६ जिल्ह्यांत २६ हजारांपेक्षा जास्त नावनोंदणी झाली आहे. प्रश्न मुलांच्या लग्नाचा आहे. यासाठी घरातील मंडळींनी रुसवेफुगवे टाळावेत, असे आवाहनही त्यांनी केले.
मुसळगाव येथील सुवर्णमहोत्सवी अखंड हरिनाम सप्ताह सुरू होता. सप्ताहात कीर्तन, प्रवचन झाले. मुसळगाव येथील ग्रामस्थांनी अतिशय सुरेख असा हा अखंड हरिनाम सप्ताह व्यवस्थितरीत्या पार पाडला. बुधवारी (ता. ३१) सकाळी गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांचा सत्संग मेळावा व हितगूज ठेवण्यात आले होते.
मिरवणुकीच्या मार्गावर सुरेख अशी रांगोळी काढण्यात आलेली होती. सकाळी गावातून ग्रामस्थांनी संवाद मिरवणूक काढून राष्ट्रीय महासंग सोहळा झाला. मिरवणुकीदरम्यान ग्रामस्थ व महिला सेवेकऱ्यांनी गावातून डोक्यावर तुळशी वृंदावन घेत श्री स्वामी समर्थ महाराज नामजप केला. तसेच गुरुमाउली अण्णासाहेब मोरे व रामकृष्णदास महाराज लहवितकर यांची रथातून मिरवणूक काढण्यात आली.
या वेळी सर्व भक्तगण भक्तिनामात तल्लीन झाले होते. उपस्थित मान्यवरांचा मुसळगाव ग्रामस्थ व श्री स्वामी समर्थ सेवेकरी यांनी सन्मान केला.
डॉ. रामकृष्ण महाराज लहवितकर यांनी श्री स्वामी समर्थ मार्गामध्ये पंधरा कोटी भाविक सहभागी झाले असून, महाराष्ट्र सरकारने गुरुमाउलींना ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्कार द्यावा, असे आवाहन केले.
दरम्यान, मुसळगाव ग्रामस्थांनी आलेल्या भाविकांना एकादशीनिमित्त महाप्रसादाचे वाटप केले. या वेळी हजारो संख्येने भाविक उपस्थित होते.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
मूल्य शिक्षणातून शेतीकडे वळा
अन्न हे ब्रह्म आणि ब्रह्म निर्माण करणारे शेतकरी म्हणून आपण त्या शेतकऱ्याला ब्राह्मण म्हणतो. बळीराजा हा देशाचा प्रमुख घटक असून, आज राज्यात शेतकरी आत्महत्या करतो. तरी सरकार त्याची दखल घेत नाही.
खरंतर ज्याप्रमाणे उद्योग-व्यवसायाला योग्य दर्जा दिला जातो. उद्योगांमध्ये नुकसान झाले तर त्यांना भरपाई मिळते. त्याप्रमाणे शेती क्षेत्राला भरपाई मिळावी. यासाठी सरकारने कायदा करावा. शेतीला राष्ट्रीय उद्योगाचा दर्जा द्यावा.
श्री स्वामी समर्थ परिवाराने ३६ जिल्ह्यांमध्ये कृषी मेळावे घेतले आहेत. पाच लाख उपस्थिती असणारे कृषी मेळावे झाले आहेत. मूल्य शिक्षणातून शेतीकडे वळावे, असेही गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी सांगितले.
मोरेदादा चॅरिटेबल धर्मादाय रुग्णालयाला लाखाची देणगी
गुरुमाउली अण्णासाहेब मोरे यांनी त्र्यंबकेश्वर येथील मोरेदादा चॅरिटेबल धर्मादाय रुग्णालय आता मोफत सेवा देत असून, यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन करतान सिन्नर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे यांनी आपल्या निवृत्तीच्या पीएफ फंडातून रुग्णालयास एक लाख रुपये देण्याचे जाहीर केले.
दिंडोरी प्रधान केंद्रात आज खुला संवाद
गुरुमाउली अण्णासाहेब मोरे नित्यनियमाने गुरुवारी व रविवारी दिंडोरी प्रधान केंद्र व शनिवारी त्र्यंबकेश्वर गुरुपीठ येथे सेवेकऱ्यांशी खुला संवाद साधत असतात. या नित्य नियमानुसार उद्या (ता. १) प्रधान केंद्रात मुक्त संवाद साधणार आहेत.
प्रधान केंद्रात गुरुमाउली अण्णासाहेब मोरे यांच्या उपस्थितीत सकाळी सात ते साडेदहा यादरम्यान प्रश्नोत्तर व शंकांचे निरसन, सकाळी साडेदहा ते पावणेअकरादरम्यान नैवेद्य आरती, सकाळी पावणेअकरा ते सव्वाअकरा : हितगूज, सव्वाअकरा ते बारा : पालखी सोहळा, दुपारी बारा ते साडेबारा : भाविकांशी संवाद, साडेबारा ते दोन विश्रांती, दुपारी दोन ते तीन : प्रश्नोत्तरे, तीन ते चार : पालखी सोहळा, चार ते साडेसहा : प्रश्नोत्तरे व सायंकाळी साडेसहा ते सात : महाआरती होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.