नाशिक : एकविसाव्या शतकात ग्रंथ समजून घेण्याची आवश्यकता निर्माण झालेली असताना ‘सावाना’ हे कार्य उत्तमपणे सांभाळत आहे.
लोकांना ग्रंथ समजले तर संत समजतील आणि संत समजले तर देवापर्यंत पोहोचणे सहज शक्य होईल, असे प्रतिपादन गुरूमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी केले. (Gurumauli Annasaheb More statement Saints will understand if they understand scriptures Nashik News)
माजी आमदार व पत्रकार कै. माधवराव लिमये यांच्या स्मृतीप्रित्यर्थ नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयातर्फे सोमवारी (ता.२९) परशुराम साईखेडकर नाट्यगृहात कार्यक्षम आमदार, खासदार पुरस्कारांचा वितरण सोहळा झाला.
यावेळी ते बोलत होते. कार्यक्षम आमदार म्हणून राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार व कार्यक्षम खासदार २०२४ हा पुरस्कार केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांना गुरूमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या हस्ते प्रदान झाला.
स्मृतिचिन्ह, मानपत्र व ५० हजार रुपयांचा धनादेश असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी ‘सावाना’चे अध्यक्ष प्रा. दिलीप फडके, उपाध्यक्ष वैद्य विक्रांत जाधव, कार्याध्यक्ष अभिजित बगदे, प्रमुख सचिव देवदत्त जोशी, सहाय्यक सचिव जयेश बर्वे, अर्थसचिव गिरीश नातू, सांस्कृतिक सचिव संजय करंजकर यांसह सावानाचे सदस्य प्रेरणा बेळे, धर्माजी बोडके, जयप्रकाश जातेगावकर, सुरेश गायधनी, सोमनाथ मुठाळ, प्रशांत जुन्नरे, मंगेश मालपाठक, उदयकुमार मुंगी व्यासपीठावर उपस्थित होते.
पुरस्कारास उत्तर देताना मंत्री मुनगंटीवार म्हणाले की, राज्यकर्त्यांच्या आयुष्यात पुरस्कार कमी आणि तिरस्कार जास्त असतो, परंतु सर्वसामान्य व्यक्तींच्या मनातील तिरस्काराची भावना हळूहळू कमी होत आहे.
केंद्र सरकार व राज्य सरकार प्रभावीपणे काम करत असल्याची भावना जनसामान्यांमध्ये निर्माण होत आहे. आमदार झाल्यानंतर पहिल्यांदा सार्वजनिक वाचनालयाची उभारणी केल्याचे त्यांनी सांगितले.
या पुरस्कारातून दहापट अधिक जोमाने कामाची ऊर्जा मिळाल्याचे ते म्हणाले. कुटुंबातील अकरा व्यक्ती डॉक्टर आहेत. परंतु, राजकीय जीवनात आपण सर्वाधिक व्यक्तींचे ऑपरेशन केल्याचा आनंद व्यक्त केला.
केंद्रीय राज्यमंत्री डॉ. पवार म्हणाल्या की, पुरस्कारांमधून कामासाठी ऊर्जा मिळते आणि हा पुरस्कार म्हणजे टॉनिकच आहे. देशातील ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार होण्याचे भाग्य लाभले हे आयुष्यातील संचितच आहे. जयप्रकाश जातेगावकर यांनी आभार मानले.
पुरस्काराची रक्कम 'सावाना'कडे सुपूर्द
कार्यक्षम आमदार व खासदार यांना पुरस्कार स्वरूपात दिलेला प्रत्येकी ५० हजार रुपयांचा धनादेश मंत्री सुधीर मुनगंटीवार व केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी सार्वजनिक वाचनालयाकडे साभार परत केला.
सोबत दोघांनीही ५१ हजार रुपयांची भर घातली. या निधीतून सार्वजनिक वाचनालयाने महिलांसाठी अभ्यासिका सुरू करावी, तसेच सार्वजनिक वाचनालयाची भरभराट व्हावी, अशा सदिच्छा दिल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.