नाशिक : शिक्षक व त्यांच्या पालकांनी वेळोवेळी ताकीद देवूनही हिप्पी बहाद्दर विद्यार्थ्यांनी शिक्षक व पालकांना न जुमानता वाढलेले केस तसेच ठेवल्याने वणी येथील के. आर. टी. हायस्कूलच्या क्रीडा शिक्षकाने शाळेतच केस कर्तन कारागीरांना बोलावून विद्यार्थ्यांना शोभेसे स्वखर्चाने केस कर्तन केले आहे. या उपक्रमाचे पालक व ग्रामस्थांनी कौतुक केले आहे.
त्याचे झाले असे की....
वणी येथे पंधरा दिवसांपूर्वी के. आर. टी. हायस्कूल मध्ये शाळा सुरु असतांना शाळेच्या आवारात शिरकाव केलेल्या शाळाबाह्य मुलांना मज्जाव केल्याने येथील के. आर. टी. हायस्कुलच्या क्रीडा शिक्षक शार्दुल यांना शिवीगाळ करीत डोक्यात दांडा घालून शाळाबाह्य मुलाने हल्ला केला होता. या घटनेचा पालक, ग्रामस्थ व विविध शिक्षक संघटनांनी निषेध व्यक्त केला होता. याबाबत ग्रामस्थांनी पोलिसांनी रोडरोमियोंचा बंदोबस्त करण्याबरोबरच शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांना शालेय शिस्तीची कडक अमंलबजावणी व्हावी याबाबत भूमिका मांडली होती. दरम्यान गेल्या चार महिन्यांपासून शाळेतील काही विद्यार्थी वेगवेगळया केस रचना करुन शाळेत येवू लागले होते. अशा हिप्पी बहाद्दर विद्यार्थ्यांना शाळेचे क्रीडा शिक्षक विवेक पवार यांनी विद्यार्थ्यांना शालेय शिस्त राखण्यासाठी वेगवेगळी केसरचना असलेले व वाढलेली डोक्याची केस काढण्याबाबत वेळेवेळी सुनावले होते. याबाबत काही विद्यार्थ्यांच्या पालकांनाही याबाबत संबधीत क्रीडा शिक्षकाने संपर्क करुन सुचना केल्या होत्या. मात्र काही विद्यार्थ्यांनी हिप्प्या व वेगवेगळया केस रचना करुन शाळेत येणे चालू ठेवल्याने, विवेक पवार यांनी मुख्याध्यापक डी. बी. चंदन यांची परवानगी घेत केस कर्तन करणाऱ्या कारागीरांना शाळेत बोलावून घेतले. व स्टाईलबाज केस रचना असलेल्या विद्यार्थ्यांना शालेय पटांगणावर जमा करुन त्यांची विद्यार्थी म्हणून शोभेल असे नीटनेटके केस कर्तन करुन घेतले. यावेळी काही वसतिगृहात राहाणारे विद्यार्थ्यांचे तसेच गरीब विद्यार्थ्यांचेही विवेक पवार यांनी स्व खर्चाने केस कर्तन करुन दिले.
सर्वांचा पाठिंबा...
विवेक पवार यांनी शालेय शिस्त राखावी यासाठी मोठया हिंमतीने राबविलेल्या उपक्रमाचे ग्रामस्थ व पालकांनी स्वागत केले असून शालेय शिस्तीसाठी सर्व ग्रामस्थ व पालक क्रीडा शिक्षक व शाळेच्या पाठींबा दर्शविला आहे. सध्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे लक्ष अभ्यासापेक्षा इतर गोष्टींकडे जास्त असते. काही विद्यार्थी शाळेत परवानगी नसतांनाही मोबाईल घेवून येतात. तर काहीकंडून गुटख्याच्या पुड्याही शिक्षकांना आढळतात. पालकांचे असहकार्य व शासनाच्या काही नियमांवलीमूळे उलट शाळा प्रशासन व संबधीत शिक्षकांवर विद्यार्थ्यांवर चुकीची कारवाई केली म्हणून अंगलट येण्याचे प्रकार घडतात. त्यामूळे शिक्षक व विद्यार्थी यांच्यातील दरी काही प्रमामात वाढत चालली आहे. विद्यार्थ्यास शिस्तप्रिय, संस्कारी व उद्याचा समाजातील आदर्श नागरिक घडण्यासाठी विवेक पवार यांच्या सारख्या शिस्तप्रीय शिक्षकही शाळेत असणे तितकेच महत्त्वाचे असल्याची भावना व्यक्त होत आहे. दरम्यान मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे संचालक दत्तात्रय पाटील, स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विलास कड व सदस्य यांच्यासह विविध संस्था व ग्रामस्थांनी या उपक्रमाचे स्वागत केले आहे.
पाल्यांना शिस्त कशी लागेल याची काळजी घ्यावी
क्रीडा शिक्षक विवेक पवार यांनी जिल्ह्यात सर्वप्रथम शिस्त लावण्याची हिंमत दाखवली आहे. तिचे आपण सर्व ग्रामस्थांनी स्वागत करुन त्यांचे पाठीशी उभे राहायला पाहीजे. यात कोणतेही राजकारण न करता सर्व समाजाच्या लोकांनी आणी विविध संघटना तसेच पत्रकार बांधवांनी सुद्धा अशा शिक्षकांचे मनोधैर्य वाढवून आपल्या पाल्यांना शिस्त कशी लागेल याची काळजी घ्यावी. - तुषार देशमुख, युवा कार्यकर्ते, वणी
काही मुले पालकांचे ऐकत नाही, त्यामूळे शिक्षकांनीच पुढाकार घेवून आपल्या मुलाप्रमाणेच शिस्त लावण्यासाठी प्रयत्न करणे गरजे आहे. त्यासाठी शालेय समिती पदाधिकारी नेहमीच शिक्षकांच्या पाठीशी राहील.- विलास कड, अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती, केआरटी हायस्कूल, वणी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.